अ डॉट कॉम मॉम : भिन्न संस्कृतींचे परिणामकारक प्रतिबिंब…!

अ डॉट कॉम मॉम : भिन्न संस्कृतींचे परिणामकारक प्रतिबिंब…! विषयी आणखी काही

cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

अ डॉट कॉम मॉम : भिन्न संस्कृतींचे परिणामकारक प्रतिबिंब…!

- राज चिंचणकर​

कुठलीही आडवळणे नाहीत, सस्पेन्स नाही, रोमान्स नाही, थ्रील नाही, संदेश नाही, सामाजिक भाष्य नाही; एवढेच काय, नावाजलेले कलाकारही नाहीत; असे असतानाही एखादा चित्रपट निर्माण करण्याचे धाडस केले जाईल का, या शक्यतेला 'अ डॉट कॉम मॉम' या चित्रपटातून चपखल उत्तर मिळते. 

या चित्रपटात हा सगळा मसाला नाही; तर मग यात आहे तरी काय, या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटाच्या गोष्टीत दडलेले आहे. दोन भिन्न संस्कृतींचा मिलाफ घडवत एका मध्यमवयीन आईची गोष्ट मांडताना हा चित्रपट अनपेक्षित असा धक्का देऊन जातो. 

हा चित्रपट फार मोठ्या अपेक्षांचे ओझे मुळातच वागवत नसल्याने त्याचा सकारात्मक फायदा थेट चित्रपटाला झाला आहे. नव्हे; पूर्वार्धात रेंगाळणाऱ्या या चित्रपटाने उत्तरार्धात गाठलेली उंची महत्त्वाची आहे आणि त्याचे पडणारे प्रतिबिंब परिणामकारक आहे. भारतात राहणारी एक साधीसुधी आई तिच्या मुलाकडे अमेरिकेला जाते आणि तिथे तिची प्रचंड त्रेधातिरपीट उडते. 

अपराधीपणाची भावना तिच्या मनात रुजत जाते आणि ती भारतात परतते. मात्र पुन्हा काही कारणाने तिला अमेरिकेला जावे लागते आणि नव्याचा स्वीकार केलेली ही आई तिथे काळानुरूप ज्या पद्धतीने जुळवून घेते त्याचा आलेख या गोष्टीत आहे. 

आता या स्टोरी-लाईनमध्ये फार काही विशेष आहे असे वाटत नसले, तरी यातले हेच 'फार काही नसणे' जेव्हा चित्रपटात स्पष्ट दिसू लागते; तेव्हा आश्चर्य वाटते. सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने हा आलेख उत्तरोत्तर रंगत जातो आणि याचे श्रेय या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संवादलेखन, गीतलेखन व नृत्यरचना अशी सबकुछ धुरा वाहणाऱ्या मीना नेरुरकर यांना जाते. 

A Dot Com Mom

मध्यंतरापर्यंत चित्रपट बऱ्यापैकी साधारण पातळीवर रेंगाळतो; परंतु त्यानंतर मात्र तो अनपेक्षित असा यू-टर्न घेतो. पाण्यात लोटलेली नाव अचानक हिंदकळायला लागली की नावाडी जसा कौशल्य पणाला लावून ती स्थिर करतो; त्याचप्रमाणे मध्यंतरापर्यंत डळमळणारी या चित्रपटाची नाव त्यानंतर मात्र सुखरूप धक्क्याला लागते. पण दिग्दर्शिका म्हणून मीना नेरुरकर यांनी पूर्वार्धावर अधिक काम केले असते तर चित्रपटाला परिपूर्णता आली असती, असे मात्र राहून राहून वाटते. 

जुन्या मराठी चित्रपटांतली दोन गाजलेली गाणी या चित्रपटात घेतली आहेत. हा प्रयोगही दखल घेण्याजोगा आहे. 'धुंद एकांत हा' आणि 'हलके हलके जोजवा' या मराठी गाजलेल्या गाण्यांना यात इंग्रजी साज चढवला आहे. या गाण्यांचे मुखडे मराठी, तर अंतरे इंग्रजीत केले आहेत. मात्र असे असूनही ही गाणी कानांना खटकत नाहीत, हे विशेष. उलट त्यांचा गोडवा अधिक वाढलेला दिसतो. चित्रपटाचे बहुतांशचित्रीकरण अमेरिकेत केले आहे; मात्र त्याचे कुठेही अवडंबर न माजवल्याने हे अमेरिका दर्शन प्रसन्न झाले आहे. चित्रपटातले काही संवादही इंग्रजीत आहेत; परंतु ते रसभंग करत नाहीत.   

घर आणि नवरा एवढेच विश्व असलेली साधीभोळी, थोडीशी वेंधळी आई साकारताना मीना नेरुरकर यांनी घेतलेले परिश्रम सत्कारणी लागले आहेत. एकूणच गबाळे ध्यान वठवताना त्यांनी घेतलेले बेअरिंग मस्त आहे. उत्तरार्धातला त्यांचा कायापालट झाल्यावरही त्यांनी आवाजात ठेवलेला आधीचा बाज लक्षणीय आहे. या भोळ्या आईचा मुलगा रंगवताना साई गुंडेवार याने सहजाभिनयाचा प्रत्यय आणून दिला आहे. या दोघांची केमिस्ट्री चांगली जुळली आहे. सूनेच्या भूमिकेत अपूर्वा भालेराव लक्ष वेधून घेते. दीप्ती लेले हिने शेजाऱ्यांची मुलगी उभी करताना या भूमिकेत चपखल रंग भरले आहेत. यात वडील साकारताना विक्रम गोखले यांना फार काही विशेष करण्यासारखे नव्हते; मात्र त्यांनी त्यांचे अस्तित्व दाखवून दिले आहे.

एकूणच चित्रपटाची ही भट्टी बऱ्यापैकी जुळली आहे; फक्त पूर्वार्ध तेवढा सावरता आला असता तर या 'डॉट कॉम मॉम'ची मजा अधिक वाढली असती. 

दर्जा :   * * १/२   (अडीच स्टार) 

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :