रेमो डिसोजाला मिळाला असा झटका

प्रसिद्ध नृत्य व सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाकडे पंधरा वर्षांपासून निष्ठेने काम करणारा एक सहकारी आनंदकुमार उर्फ ॲण्डी एक दिवस अचानक गायब झाला.

रेमो डिसोजाला मिळाला असा झटका
Published: 23 Mar 2018 05:28 PM  Updated: 23 Mar 2018 05:28 PM

प्रसिद्ध नृत्य व सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाकडे पंधरा वर्षांपासून निष्ठेने काम करणारा एक सहकारी आनंदकुमार उर्फ ॲण्डी एक दिवस अचानक गायब झाला. उत्कृष्ट डान्सर असलेला, सुपरस्टार रजनीकांत, सलमान खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय-बच्चन ते अगदी अलिकडचे वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ पर्यंत सर्वांना व्यक्तिगत नृत्याचे धडे देणारा आणि रेमो डिसोजाचा उजवा हात म्हणून फिल्म इंडस्ट्रीत ओळखला जाणारा ॲण्डी संपूर्ण ग्रुपमध्ये कुणालाच काहीही न सांगता 2017 पासून काम सोडून गेला. रेमोने अनेकांकडे त्याच्या न येण्याबद्दल विचारले पण कुणालाच त्याचा थांगपत्ता नव्हता. मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण नंबर बदललेला होता त्यामुळे हतबल झालेल्या रेमोने अखेर त्याचा नाद सोडला. पण, अत्यंत हुशार आणि विश्वासू सहकारी असल्याने रेमोचे मन त्याला सतत बेचैन करत होते.

अखेर वर्षभरानंतर म्हणजे फेब्रुवारी 2018 मध्ये ॲण्डीने गुरूवर्य रेमो सरांना फोन केला. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रेमोनेही त्याला तातडीने बोलावून घेतले. तो गेला. रेमो काही बोलण्याच्या आधी तो गुरू रेमोच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, “सर! मैने एक फिल्म डीरेक्ट की है| सालभर उसमेंही व्यस्त था|” ॲण्डीचे हे वाक्य ऐकून रेमोची अवस्था म्हणजे ‘जोरका झटका धीरेसे लगे’ अशीच झाली. अचानक गायब झालेला जीवाभावाचा सहकारी वर्षभर काहिही थांगपत्ता लागू न देता सिनेमाचे दिग्दर्शन करत होता, हे समजल्यावर रेमो काही क्षण नाराज झाला. पण, त्याच क्षणी आपला विश्वासू शिष्य आपल्याच पावलावर पाऊल ठेवून चाललाय, ह्या गोष्टीचा त्याला मनोमन आनंद झाला. कारण, रेमो हा अतिशय सहृदयी माणूस आहे, हे अवघी फिल्म इंडस्ट्री जाणते.  त्याच बरोबर रेमो डिसोजा यांना ॲण्डीचे एक स्वभाव वैशिष्ट्यही चांगलच माहित आहे. ॲण्डी म्हणजेच आनंदकुमार कोणतीही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय जवळच्या व्यक्तींना कळू देत नाही. कारण, ती गोष्ट कळली की पूर्ण होत नाही, अशी ॲण्डीची एक धारणा आहे. त्यामुळेच त्याने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली असल्याने रेमो डिसोजाने न रागवता त्याला मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या.

रेमोने त्याला मिठी मारून त्याचे अभिनंदन केले आणि तातडीने चित्रपट दाखविण्यासाठी सांगितले. पूर्णत: तयारीनिशी गेलेल्या ॲण्डीने रेमोला फिल्म दाखवली. ही फिल्म म्हणजे येत्या 30 मार्च रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ‘गावठी’. फिल्म पाहून रेमोने ॲण्डीला घट्ट मिठी मारली. केवळ कोरीयोग्राफीच नव्हे तर उत्तम दिग्दर्शन आणि पटकथाही लिहिलेल्या चित्रपटातील इमोशन्स, रोमान्स, कॉमेडी आणि एकूणच फिल्म उत्तम झाल्याने रेमो भलताच खुष झाला. रेमोने आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढून सिनेमाचे ‘दिसू लागलीस तू’ ह्या सध्या जोरदार व्हायरल झालेल्या गाण्याचे संगीत प्रकाशीत केले.

आनंदकुमार उर्फ ॲण्डी हा वयाच्या चौथ्या वर्षी कुटुंबासह तामीळनाडू येथून मुंबईत मुंलुंड येथे स्थायिक झाला. मुलुंडच्या वाणी विद्यालयात त्याने दहावी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. कारण, प्रभुदेवाच्या डान्स स्टाईलने झपाटलेला ॲण्डी रोज टीव्ही लावून एकलव्याप्रमाणे गुरू प्रभुदेवाकडून नृत्याचे धडे गिरवत होता. रोज सकाळ-संध्याकाळ केवळ अंगात संचारल्याप्रमाणे ॲण्डी नाचतच राहायचा. चार वर्षे त्याने भरपूर स्ट्रगल करून कसेबसे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा यांच्या ग्रुपमध्ये साईड डान्सर म्हणून स्थान मिळविले. पण, नंतर ॲण्डीने मागे वळून पाहिलेच नाही. साईड डान्सर, डान्स ट्रेनर, असिस्टटन्ट कोरीयोग्राफर ते बड्या सुपरस्टार्सना तो व्यक्तिगत डान्स स्टेप शिकवू लागला.

गुरू रेमो डिसोजा यांनी दिग्दर्शित केलेल्या ए बी सी डी,  ए बी सी डी-२ आणि फ्लाईंग जाट या सिनेमासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. संपूर्ण आत्मविश्वास आल्यावर त्याने कथालेखक आणि निर्माते सिवाकुमार रामचंद्रन यांच्या ‘गावठी’ ह्या कथेवर पटकथा रचली आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. गावठी...हा शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आत्मविश्वास देणारा, मनोरंजनाचा पावर पॅक असलेला ‘गावठी’ हा चित्रपट येत्या 30 मार्च रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :