छोटा पडदा खूप बदलला आहेः सुकन्या कुलकर्णी

सुकन्या कुलकर्णी यांनी आभाळमाया या मालिकेत काम केले होते. या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता त्या घाडगे अँड सूनमध्ये झळकणार आहेत.

छोटा पडदा खूप बदलला आहेः सुकन्या कुलकर्णी
Published: 16 Aug 2017 05:41 PM  Updated: 02 Sep 2017 01:43 PM

सुकन्या कुलकर्णी यांनी मराठी चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता त्या घाडगे अँड सून या मालिकेत झळकणार आहेत. त्यांच्या या नव्या मालिकेबाबत आणि त्यांच्या एकंदर करियरविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत आहात, छोट्या पडद्यावर किती बदल झाला आहे असे तुम्हाला वाटते?
पूर्वी तीन दिवसांत आम्ही एका भागाचे चित्रीकरण करत असू. पण आता एका दिवसात दोन-तीन भाग चित्रीत केले जातात. काम करण्याचा स्पीड खूपच वाढला आहे. पण या सगळ्यात संहिता, कथा या गोष्टींवर कमी लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे. जुन्या पिढीने आजवर काय केले आहे याचा अभ्यास नवीने पिढीने करणे गरजेचे आहे असे मला वाटते. तसेच तांत्रिकदृष्ट्या आपण आणखी प्रगती करण्याची गरज आहे. तसेच पेपरवर्क करण्याची अधिक गरज आहे. सध्या अनेक वेळा शेवटच्या क्षणी निर्णय बदलले जातात. या काही गोष्टी बदलल्यास खूप फरक पडेल.  

तुम्ही नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केले आहे, या तिन्ही क्षेत्रांचे वेगळेपण तुम्हाला काय जाणवते?
चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांची बलस्थानं ही वेगवेगळी आहेत. चित्रपट आणि नाटक करत असताना आपल्याला कथेचा मध्य, शेवट सगळे काही माहीत असते. पण मालिकांमध्ये तसे नसते. मालिकेमध्ये शेवट माहीत नसल्याने प्रत्येक भागात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवायची असते. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे मालिकांमध्ये महत्त्वाचे असते. त्यामुळे मालिका अधिकाधिक काळ चालवणे सोपे नसते. नाटक ही प्रत्येक कलाकारासाठी एक प्रयोगशाळा असते. प्रत्येक कलाकाराने नाटकात काम केले पाहिजे असे मला वाटते तर मालिका या छोट्याशा गावात देखील पाहिल्या जातात. त्यामुळे तुम्ही राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचता. तसेच मालिकेत काम करताना तुमचे पाठांतर हे चोख असणे गरजेचे असते तर चित्रपटांमध्ये तुम्ही मोठ्या पडद्यावर काम करत असल्याने तुमच्या बारीक सारिक गोष्टी देखील टिपल्या जातात. पण एक कलाकार म्हणून मला तिन्ही माध्यमात काम करायला आवडते.

घाडगे अँड सून या मालिकेत तुमची भूमिका काय असणार आहे?
या मालिकेत मी एक कणखर पण तितक्याच प्रेमळ आईची भूमिका साकरत आहे. ही स्त्री परंपरा जपणारी आहे. स्त्रीने आपले घर आणि कुटुंब एवढेच सांभाळले पाहिजे असे मानणारी ती आहे. नव्या पिढीसोबत तिचा असलेला विचारांचा वाद प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक मालिकेत तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळता, तुम्ही भूमिका खूप चोखंदळपणे निवडता का?
आज इतक्या वर्षांनी अतिशय चांगल्या भूमिका माझ्याकडे स्वतःहून येत आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. प्रत्येक भूमिका पहिल्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी असणे यात खरी गंमत असते. प्रत्येक भूमिकेत मी काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करते. भूमिकेत तोचतोच येऊ नये असे मला वाटते. त्यामुळेच प्रेक्षकांना मी नेहमीच वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळते.  

तुम्ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करण्याचे प्रमाण खूप कमी केले आहे, त्यामागे काही कारण आहे का?
चित्रपटांमध्ये काम करत असताना खूप चांगल्या भूमिका असल्यासच काम करायचे असे मी ठरवले आहे. ती सध्या काय करते, व्हेंटिलेटर यांसारख्या चित्रपटातील माझी भूमिका खूपच चांगली असल्याने मी या चित्रपटांमध्ये काम केले होते. नायिका ही सडपातळ, तरुणच असली पाहिजे असे मानणारे आपल्या चित्रपटसृष्टीत आहेत. त्यामुळे थोड्याशा स्थूल नायिकेसाठी अथवा वयानुसार आजही कथा लिहिल्या जात नाही. या सगळ्यामुळे खूपच कमी चांगल्या भूमिका आमच्यासारख्या कलाकारांच्या पदरी येतात. बॉलिवूड आणि हॉलिवूडप्रमाणे आपल्याकडे देखील प्रत्येक कलाकाराला केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिल्या गेल्या तर निश्चितच प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतील.

चूक भूल द्यावी घ्यावी ही तुमची मालिका खूपच गाजली होती, या मालिकेने खूपच लवकर प्रेक्षकांचा निरोप घेतला असे तुम्हाला वाटत नाही का?
प्रेक्षक मला भेटल्यावर ही मालिका अजून काही काळ सुरू राहायला हवी होती असे मला आवर्जून सांगतात. कोणतीही गोष्ट अर्जीण होईपर्यंत खाऊ नये असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे ही मालिका लोकांमध्ये लोकप्रिय असतानाच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे ही एक खूपच चांगली गोष्ट असल्याचे मला वाटते.   

Also Read : परंपरेच्या बंधनात रंगत नात्यांची ‘घाडगे & सून’ लवकरच रसिकांच्या भेटीला!


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :