सचिन खेडेकर म्हणतायेत, पोलिसच खरे हिरो

मराठी आणि विविध हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार अभिनय तसेच दमदार आवाजाची जादू असणारे अभिनेता सचिन खेडेकर या मालिकेशी जोडले गेलेत. 'शौर्य – गाथा अभिमानाची' या मालिकेतून पोलिसांच्या अतुलनीय शौर्यगाथा सचिन खेडेकर आपल्या आवाजाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचणार आहेत.

सचिन खेडेकर  म्हणतायेत, पोलिसच खरे हिरो
Published: 19 Jan 2017 11:21 PM  Updated: 23 Jan 2017 09:58 AM

पोलीसच आपले खरे नायक असून त्यांच्यावर आधारित कार्यक्रमाशी जोडले जात असल्याचा सार्थ अभिमान सचिन खेडेकर यांनी व्यक्त केलाय. निमित्त आहे छोट्या पडद्यावरील 'शौर्य – गाथा' अभिमानाची ही मालिका.या मालिकेतून पोलिसांच्या अतुलनीय शौर्यगाथा रसिकांच्या भेटीला येतायत. आजच्या तरुण पीढीला पोलिसांचे शौर्य समजावे आणि पोलिसांचा अभिमान प्रत्येकाच्या मनामनात निर्माण व्हावा असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श अशा मराठी आणि विविध हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार अभिनय तसेच दमदार आवाजाची जादू असणारे अभिनेता सचिन खेडेकर या मालिकेशी जोडले गेलेत. या मालिकेतील जबाबदारी, पोलिसांविषयीच्या आपल्या मनातल्या भावना, समाजातील घटना अशा विविध पैलूंवरील आपले मत व्यक्त केले आहे.   
 
'शौर्य-गाथा अभिमानाची' या मालिकेतून घराघरात तुमचा आवाज जाणार आहे. या मालिकेसाठी आवाज देण्याची विचारणा झाली त्यावेळी काय भावना होत्या ?
 

शौर्य- गाथा अभिमानाची ही मालिका म्हणजे महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला सलाम करणारी मालिका आहे. तरुणाईला प्रेरणा देणा-या पोलिसांच्या कथा या मालिकेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत. शौर्यगाथा म्हटले की सामान्यपणे आपण इतिहासात जातो. मात्र सध्याच्या युगात आपल्याला प्रेरणा देणारे आपले पोलीस आहेत असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या शौर्याची गाथा दाखवली जाणार असे मला सांगण्यात आले. या मालिकेसाठी सूत्रधाराचा आवाज देण्यासाठी मला विचारणा करण्यात आली. रियल लाइफमध्ये घडलेल्या वास्तवदर्शी घटना या मालिकेच्या माध्यमातून समोर येतायत आणि त्यासाठी सूत्रधार म्हणून माझा आवाज दिला जातोय याचा मला अभिमान आहे. पोलीस आपले खरे हिरो आहेत. या हिरोंना सॅल्युट करण्याची यानिमित्ताने संधी मिळाली आहे. या मालिकेचा खरेपणा, या मालिकेसाठी करण्यात आलेले रिसर्च भावले. या मालिकेत शौर्यगाथा दाखवली जाणार आहेच. शिवाय या शौर्यामागचे चेहरेसुद्धा रसिकांसमोर येणार आहेत. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता सूत्रधार म्हणून आवाज देण्यासाठी तयार झालो.
 
समाजात घडणा-या गोष्टींवरील कार्यक्रम रसिकांच्या भेटीला आले आहेत. तर अशा कार्यक्रमांचं स्वरुप कसे असावे असे आपल्याला वाटते ?
 

सध्या प्रसिद्ध होणा-या बातम्यांचं स्वरुप पूर्वीपेक्षा बदलले आहे. काहीशा भीषण स्वरुपात काही बातम्या समोर येतात. आधीच्या काळी बातम्या वाचून धक्का बसेल असं त्यात काहीही नव्हते. आता तशा बातम्या यायला लागल्यात. सिनेमा, मालिकांमध्ये जे घडते, जे चालते तेच समाजात घडते. ही माध्यमं म्हणजे समाजमनाचा आरसा असतात. मात्र कधी कधी असं दाखवले जाते की ते नंतर समाजातही घडते. ते फक्त एकतर्फी घडत नसते. दोन्हींकडून ते होत असते. अशा विषयांवर काम करताना जबाबदारी काम व्हायला पाहिजे. सिनेमात पोलिसांची प्रतिमा अतिरंजित आणि वेगळी दाखवली जाते याची खतं वाटते. यात अतिरंजितपणा असू नये. अशा विषयांवर काम करताना जबाबदारीने काम झाले पाहिजे. सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल अशा मालिकांमध्ये जबाबदारीपूर्वक योग्य रिसर्च करुन त्याचे इनपुट्स टाकत स्क्रीप्ट्स लिहील्या जातायेत. तरुणाईला, मुलांना आणि सर्व रसिकांना शिकवण देणारे, प्रबोधन करणारे असे कार्यक्रम असावेत. कार्यक्रम सर्वाभिमुख असले पाहिजेत असे माझे मत आहे.
 
अनेकदा वेगळे करण्याच्या नादात मालिका म्हणा किंवा सिनेमा भरकटले जातात. अशा कार्यक्रमांचा भाग होताना काय काळजी घेतली पाहिजे ?
 

रसिकांच्या कायम लक्षात राहावे असे काम व्हावे हाच माझा नट बनण्याचा मुख्य हेतू आहे. आपल्याकडे इंग्रजीमध्ये एक शब्द आहे इन्फोटेन्मेंट. याचाच अर्थ एंटरटेन्मेंट विथ इन्फॉर्मेशन म्हणजेच मनोरंजनासह माहिती. मात्र आपल्याकडे तसे फार अभावानेच होते. जे लोक असे धाडस करतात त्यांच्यांसोबत मी कायम उभा राहतो. त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे शौर्य – गाथा अभिमानाची. आपल्याकडे ख-या गोष्टी, खरा अपराध, पोलिसांनी केलेली धरपकड, त्यांनी वापरलेली बुद्धीमत्ता, हे तरूण पिढीसाठी चार पुस्तके देऊन शिकवले जाणार नाही इतका मोठा हा धडा आहे. असे काम कुणीतरी करायला हवे. दहा गोष्टी जिथे चालत असतात त्यातून काही वेगळेपणा आणून काहीतरी काम करायचे असेन तर त्यासाठी थोडे वेगळे प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांना खरंतर माझा हातभार आहे.
 
आगामी काळातील तुम्ही करत असलेल्या प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल?
आगामी काळात मी चार प्रोजेक्टवर काम करीत असून, चारही प्रोजेक्ट दर्जेदार आहेत. कारण यातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार हे नक्की. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’, वरून नार्वेकर यांचा ‘मुरब्बा’ सिनेमा यासह आणखी दोन प्रोजेक्टवर मी काम करीत आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत यातील काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचबरोबर हिंदीमधील काही प्रोजेक्टमध्येही काम करीत आहे.  


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :