कम्फर्ट सोडून आव्हानात्मक भूमिका भावतात - संग्राम साळवी

ब्लॅक टाईप अशा प्रकारची कथा या सिनेमात रसिकांना पाहायला मिळेल.याशिवाय स्वप्ना वाघमारे यांच्या सिनेमातही काम करणार असल्याचे संग्रामने सांगितले.

कम्फर्ट सोडून आव्हानात्मक भूमिका भावतात - संग्राम साळवी
Published: 13 Jun 2017 10:39 AM  Updated: 13 Jun 2017 10:39 AM


तुमच्यासाठी काय पण... या डायलॉगमुळे छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला अभिनेता संग्राम साळवी आता नव्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला आला आहे. कुलस्वामिनी या नव्या मालिकेतून संग्राम नव्या अंदाजात रसिकांसमोर आला आहे. या भूमिकेमुळे रसिकांना तिरस्कार वाटत असला तरी हेच भूमिकेचं यश असल्याचं संग्रामनं सांगितलं आहे. याच मालिकेच्या निमित्ताने संग्राम साळवीशी साधलेला हा संवाद.

देवयानी मालिकेतील यशानंतर नवी मालिका, नवी भूमिका तर याविषयी जाणून घ्यायला आवडेल ?

देवयानी या मालिकेनं मला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेतील भूमिका माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. या भूमिकेनं मला सारं काही दिलं. रसिकांचं भरभरुन प्रेम आणि ओळख या भूमिकेमुळेच मिळाली. या मालिकेतील तुमच्यासाठी काय पण हा डायलॉगही चांगलाच हिट झाला होता. आता देवयानी या मालिकेनंतर कुलस्वामिनी या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलो आहे. देवयानी आणि या नव्या मालिकेतील भूमिका पूर्णपणे वेगळ्या आहेत. कुलस्वामिनी या मालिकेत राजस नावाची भूमिका साकारत आहे. राजस हा श्रीमंत घराण्यातील आहे. तो कुणालाही आदर देत नाही. इतकंच काय तर आपल्या वडिलांशीही तो उद्धटपणे बोलतो, वागतो. राजसचे हे वागणं पाहून कुणालाही त्याचा तिरस्कार वाटेल. रसिकांनाही त्याचा प्रचंड राग येतो. त्यांची अशी प्रतिक्रिया म्हणजेच ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते असं म्हणावे लागेल. असाच वेगळा प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न होता. तसंच मला आव्हानात्मक भूमिका साकारायची होती. या मालिकेच्या एका सीनमध्ये मी वडिलांशी उद्धटपणे बोलतो. हा सीन पाहून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. माझ्या आईलाही राजसचं वागणं काही आवडलं नव्हतं. मात्र हेच माझ्या भूमिकेचं यश आहे असं मला वाटतं. सोशल मीडियावरही रसिकांच्या या भूमिकेबाबत रसिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

कलाकारांना एखादा सीन साकारताना विविध कठीण प्रसंगातून जावं लागतं.असाच तुझ्याबाबत अवघडलेला किंवा तुला भावुक करुन गेलेला प्रसंग कोणता आहे ?

देवयानी मालिकेतील माझ्या भूमिकेला रसिकांनी अक्षरक्षा डोक्यावर घेतलं. ही भूमिका पाहून रसिक मला भेटण्यासाठी थेट साता-यावरुन येत असत. आताही असंच काहीसा वेगळा प्रयत्न मी केला आहे. मूळात कम्फर्ट सोडून आव्हानात्मक भूमिका साकारणं मला आवडतं. राजस या भूमिकेबाबतही हेच म्हणता येईल. कुलस्वामिनी या मालिकेतील एका सीनमध्ये म्हातारी बाई भेटायला येते. तिच्या हातात फोटो असतो. त्यावेळी तिला राजस उडवून लावतो. मात्र हा सीन चित्रीत झाल्यानंतर माझं मला वाईट वाटलं. मी त्या बाईंना जाऊन भेटलो. हा सीन होतो त्यामुळे असा वागावं लागल्याचं मी त्यांना सांगितलं. 

'देवयानी', 'कुलस्वामिनी' या मालिकेतून छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावरही तुझं दर्शन लवकरच होणार आहे असं कळतंय तर याविषयी काय सांगशील ?

या मालिकेसोबत लवकरच मी नागेश भोसले यांच्या संचार या सिनेमात भूमिका साकारत आहे. राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असेल. या सिनेमातील कथा ही गावातील गोष्ट असून त्यात मी सुधाकर नावाची भूमिका साकारणार आहे. ब्लॅक टाईप अशा प्रकारची कथा या सिनेमात रसिकांना पाहायला मिळेल.याशिवाय स्वप्ना वाघमारे यांच्या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमाचं नाव अजून ठरलेलं नाही. 

नव्या मालिकेसह तुझ्या जीवनातील नवी इनिंग म्हणजेच वैवाहिक इनिंगही लवकरच सुरु होणार आहे, तर या गुड न्यूजबाबत काय सांगशील ?

अभिनेत्री खुशबू तावडेसोबत मी लवकरच रेशीमगाठीत अडकणार आहे. नुकतंच आम्हा दोघांचा साखरपुडा पार पडला. हा साखरपुडा काही तरी वेगळ्या पद्धतीने करण्याचं खुशबूने ठरवलं होतं. त्यामुळे डोंबिवली-बदलापूर या दरम्यान असलेल्या घरकुल या संस्थेत जाऊन आम्ही आमचा साखरपुडा केला. घरकुल या संस्थेत गतिमंद व्यक्तींचा सांभाळ केला जातो. या संस्थेतील अशा 60-65 वयोगटातील व्यक्तींसह आम्ही आमचा साखरपु़डा साजरा केला. अशाच वेगळ्या आणि हटक्या पद्धतीने लग्न करण्याचाही आमचा मानस आहे. याच वर्षी आम्ही विवाहबंधनात अडकणार असून लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही. 

देवयानी, कुलस्वामिनी यानंतर आगामी काळात तुला वेबसिरीज किंवा नाटकात काम करायला आवडेल का ?

आगामी काळात मला वेबसिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मध्यंतरी वेबसिरीजमध्ये कामाची ऑफर आली होती. मात्र काही कारणांमुळे ती करता आली नाही. याशिवाय शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे. खुशबू तावडेसोबत सांजबहर नावाची शॉर्टफिल्म केली आहे. चंद्रशेखर गोखले यांनी ही शॉर्टफिल्म लिहली होती. याशिवाय आगामी काळात नाटकात काम करण्याचीही इच्छा आहे. एखाद्या नाटकात चांगली भूमिका मिळाल्यास काम करायला नक्की आवडेल. 

RELATED ARTICLES


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :