वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला आवडते नाशिकची मिसळ, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ पाहा!

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याला नाशिकची मिसळ खूप आवडते. याबाबतचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तो त्याची ही इच्छा व्यक्त करताना दिसतो.

वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला आवडते नाशिकची मिसळ, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ पाहा!
Published: 07 Apr 2018 08:33 PM  Updated: 07 Apr 2018 08:55 PM

सतीश डोंगरे

पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि जागोजागच्या मिसळ परंपरांनी आपापले स्थान तयार केले असले तरी नाशिकच्या झणझणीत पण तितक्याच चटकदार मिसळीचा तोरा काही औरच असतो. एका भल्या मोठ्या वाडग्यात लालबुंद रश्शाचा तवंग मिरवणारी खमंग तर्री, ऐसपैस ‘ट्रे’च्या प्लेटमध्ये जिभेला खुणावणारे चटपटीत मिश्रण, पापड, लिंबू, कांदा, मिरची आणि खास मिसळस्नेही पावाची लुसलुशीत लादी असा चवदार जामानिमा असलेली नाशिकची मिसळ हा कोणत्याही सुग्रास भोजनाएवढाच ऐटदार थाट असतो. त्यामुळे नाशिकला येणाºया कोणत्याही पर्यटकाची वा प्रवाशाची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळीलाच असते. आता तर नाशिकच्या मिसळीचा डंका सातासमुद्रापार वाजत असून, चक्क एका विदेशी क्रिकेटपटूला नाशिकच्या मिसळची भुरळ पडली आहे. 

होय, वेस्ट इंडिजला अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने चक्क मराठीत बोलत नाशिकच्या मिसळीचे कौतुक केले. ‘मला नाशिक खूप खूप आवडतं आणि नाशिकची मिसळ-पावदेखील खूप खूप आवडतं. आणि माझ्या नाशिकचे लोक खूप खूप छान आहेत,’ असे तो चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. ब्राव्होचे या शब्दांनी कोण्याही नाशिककरांचा ऊर अभिमानाने भरल्याशिवाय राहणार नाही. सध्या ब्राव्हो आयपीएलनिमित्त भारतात आला असून, यंदाच्या सीजनमध्ये तो चेन्नई सुपरकिंगकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना आपलेसे केले होते. 

दरम्यान, नाशिकचे नृत्य दिग्दर्शक सचिन खैरनार यांनी मुंबईतील नरिमन पॉर्इंट येथील ट्रायडेन्ट ओबेरॉय हॉटेलमध्ये ब्राव्होची भेट घेतली. यावेळी ब्राव्होसोबत बोलतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्येच ब्राव्हो नाशिकची मिसळ आवडत असल्याचे सांगत आहे. सचिन खैरनार ब्राव्होला नाशिकची मिसळ मला खूप खूप आवडते असे मराठीत बोलण्यास सांगतात, तोदेखील त्यांच्या मागे मराठीत बोलत नाशिकचे कौतुक करतो.
 


खरं तर ब्राव्होला त्याच्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखले जाते. किक्रेटच्या मैदानावरच नव्हे तर डान्सच्या व्यासपीठावरही त्याने आपला जलवा दाखवून दिला आहे. कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन ९ मध्ये तो सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या नृत्याने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली होती. दरम्यान, याचनिमित्ताने त्याची नाशिकचे नृत्य दिग्दर्शक सचिन खैरनार यांच्याशी ओळख झाली होती. सहायक नृत्य दिग्दर्शक म्हणून सचिनने ब्राव्होला विविध गाण्यांवर नृत्याचे धडे दिले. पुढे त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. 

दरम्यान, सचिनबद्दल सांगायचे झाल्यास मी मराठी वाहिनीवरील ‘खल्लास डान्स एकच चान्स’ या शोद्वारे सचिन घराघरात पोहोचला. या शोच्या अंतिम आठव्या स्थानी त्याने मजल मारली होती. त्यानंतर त्याने नाशिकमध्ये एक नृत्य अकादमी सुरू करीत येथील तरुणांना नृत्याचे धडे दिले. ‘काव्या’ नावाच्या शॉर्ट फिल्मचीही त्याने निर्मिती केली. या फिल्ममध्ये सचिनने एक गाणेही गायिले आहे. टाटा स्कायवरील ‘हॅपी डान्सिंग शेफ’ या आगळ्यावेगळ्या कुकिंग शोमध्ये प्रसिद्ध शेफ हरपालसिंग सोखी यांनाही त्याने नृत्याचे धडे दिले. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :