समाजव्यवस्थेवर भाष्य करणारी कथा...!

समाजव्यवस्थेवर भाष्य करणारी कथा...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - अरुण नलावडे, संजय शेजवळ, गौरी कोंगे, देवेंद्र दोडके
  • निर्माता - डॉ. शरयू पाझरे दिग्दर्शक - अरुण नलावडे
  • Duration - १ तास ३० मिनिट Genre - इमोशनल ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

समाजव्यवस्थेवर भाष्य करणारी कथा...!

राज चिंचणकर

आधुनिक जगात अजूनही जातीपातीची मूळे घट्ट कवटाळून बसणारी काहीजण असतात आणि त्यातून आजही अनेकदा संघर्ष निर्माण होताना दिसतो. प्रेम आणि कला या दोन गोष्टी मात्र अशाप्रकारच्या बंधनांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेल्या असतात. या सर्व अनुषंगाने एकूणच समाजव्यवस्थेवर 'ताटवा' हा चित्रपट भाष्य करतो. 

पाथरवट समाजातला धोंडिबा त्याचा पारंपरिक व्यवसाय करत कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतो. त्याची मुलगी शिल्पा त्याला या कामात साथ देत त्यांनी तयार केलेले पाटे, वरवंटे आणि खेळण्यांची विक्री करत असते. या प्रवासात तिची गाठ एका शिल्पकाराशी पडते. शिल्पाच्या हातातली कला ओळखून तो तिला शिल्पकलेचे धडे देतो. जात्याच हुशार असलेली शिल्पा त्यातही पारंगत होते. त्यातच परदेशातून फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतलेला  लिखित त्या शिल्पकाराच्या घरी येतो. जातपातीवर विश्वास न ठेवणाऱ्या लिखितचे शिल्पावर प्रेम जडते. पण त्याची डॉक्टर आई, विद्याताई मात्र त्याला कडाडून विरोध करते. लिखित पुन्हा परदेशी निघून जातो. काही काळाने शिल्पाला एका कलास्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळतो आणि विद्याताई तिचे लिखितशी लग्न लावून दयायला तयार होतात. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शिल्पा वेगळाच निर्णय घेते, ही या चित्रपटाची कथा आहे. 

एम.कंठाळे यांच्या कथेला अनेक फाटे आहेत आणि एकाचवेळी जातीव्यवस्था, समाज, प्रेम, कला यांची सरमिसळ त्यात झाली आहे. चित्रपटाची संकल्पना चांगली असली आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी तो वरवरचा वाटतो. चित्रपटाचा शेवट मात्र चांगल्या निर्णयावर आणून ठेवला आहे. दिग्दर्शक अरुण नलावडे यांनी या कथेचा परिणाम ठोस होण्यासाठी घेतलेले परिश्रम दिसतात; मात्र पटकथेतले काही कच्चे दुवे तसेच राहून गेले आहेत. 

एक डॉक्टर असूनही आजच्या काळात जातीपातीच्या बंधनात ती व्यक्ती स्वतःला जखडून घेत असल्याचे दाखवत समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न चित्रपटात केलेला दिसतो. मात्र तो तेवढ्यापुरताच मर्यादित राहतो. शिल्पकलेच्या गुरुजींनी गमावलेल्या स्वतःच्या मुलीचा ट्रॅक चित्रपटात आहे; मात्र त्यावर ठोस प्रकाश पडत नाही. शिल्पाच्या प्रेमात पडलेला लिखित केवळ आईच्या नकारामुळे थेट तिला सोडून जातो, हेही पटत नाही. शिल्पकार असलेले गुरुजी तेवढ्याच ताकदीचे चित्रकारही असणे; किंवा फोटोग्राफर असलेला लिखित शिल्पकार आणि चित्रकारही असणे; तसेच केवळ एक पुरस्कार मिळाल्यावर आईचे अचानक मतपरिवर्तन होणे हे सहज पचनी पडत नाही. त्याचप्रमाणे चित्रपटात येणारे काही अनावश्यक प्रसंग रसभंग करतात.  

अरुण नलावडे आणि गौरी कोंगे यांचा अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. शिल्पकार गुरुजींची भूमिका अरुण नलावडे यांनी अनुभवाच्या जोरावर निभावून नेली आहे. या भूमिकेला फार काही कंगोरे नसल्याने त्यांच्यासाठी तो काही विशेष परिश्रमाचा भाग झाला असेल असे वाटत नाही. गौरी कोंगे या गुणी अभिनेत्रीने मात्र शिल्पाच्या भूमिकेत उत्तम रंग भरले आहेत. परिस्थितीचे चटके सोसणारी, प्रतिकूल स्थितीतही अंगभूत कला जोपासणारी, आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणारी, जिद्दीने मार्गक्रमण करणारी शिल्पा तिने छान रंगवली आहे. विद्याताईंची भूमिका साकारणाऱ्या डॉ. शरयू पाझारे यांची व्यक्तिरेखा मात्र लाऊड झाली आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा चित्रपटाच्या मूळ सांध्यापासून फटकून वागताना दिसते. देवेंद्र दोडके, संजय शेजवळ, सरिता घरडे आदी कलाकारांच्या भूमिका ठीक आहेत. एकूणच, समाजाला काही सांगू पाहण्याचा या चित्रपटाने प्रयत्न केला असला, तरी तो अजून दमदार असायला हवा होता असे वाटत राहते; जेणेकरून हा 'ताटवा' अधिक फुलला असता. 

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :