Manjha movie:वेगळ्या वाटेवरच्या भीतीची सफर...!

Manjha movie:वेगळ्या वाटेवरच्या भीतीची सफर...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - अश्विनी भावे,रोहित फाळके,सुमेध मुदगलकर
  • निर्माता - त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश दिग्दर्शक - जतिन वागळे
  • Duration - 2 तास Genre - कौटुंबिक
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Manjha movie:वेगळ्या वाटेवरच्या भीतीची सफर...!

राज चिंचणकर


प्रत्येकाच्या मनात कसली ना कसली भीती दडलेली असते. या भीतीचा अंश मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपलेला असतो. काहीवेळा ती प्रकट होते; तर काहीवेळा अव्यक्त राहते. या भीतीवर मात करणाऱ्या व्यक्ती मात्र कोणत्याही प्रसंगाला थेट भिडतात. पण काहीजण मात्र या भीतीचा कोष सतत जवळ बाळगत जगत असतात. त्यांच्या भीतीला अजून खतपाणी घातले गेले; तर ही माणसे मोहिनी घातल्याप्रमाणे वाहावतही जातात. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे 'मांजा' हा चित्रपट!  भीतीचा एक अनोखा पैलू मांडत या चित्रपटाने वेगळ्याच वाटेवरची सफर घडवली आहे. 

या चित्रपटाची कथा तीन प्रमुख व्यक्तिरेखांभोवती फेर धरते. पतीचा त्याग केलेली समिधा तिच्या मुलाला, म्हणजे जयदीपला घेऊन लोणावळ्याला आली आहे. तिथे जयदीपला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत, ती स्वतः तिच्या जवळच्या मित्राच्या हॉटेलमध्ये गेस्ट रिलेशन मॅनेजर म्हणून काम करते. कॉलेजमध्ये जयदीपची ओळख विकीशी होते आणि विकीच्या एकूणच बिनधास्त वागण्याची मोहिनी जयदीपवर पडते.पण जयदीप वरून दिसतो तसा नसतो; तर त्याच्या मनात बरेच काही उफाळून येत असते. हा नक्की काय प्रकार आहे आणि त्यात जयदीप व समिधा कसे ओढले जातात,याची कथा या चित्रपटात रंगवली आहे.

कथा, पटकथा व दिग्दर्शन करणारे जतीन वागळे यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळी वाट चोखाळली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध आणि मध्यंतरानंतरचा काही वेळ त्यांची या मांडणीवर असलेली हुकूमत प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे नेहमीच्या चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळे देऊ पाहणारा हा चित्रपट आहे, हे पक्के अधोरेखित होत जाते. परंतु, कथेच्या शेवटाला मात्र ही पकड सुटल्याचे दिसते आणि शेवटातही काहीतरी वेगळेपण हवे होते, असे राहून राहून वाटत जाते. यातले गाणेही अनावश्यक वाटते; कारण त्यामुळे चित्रपटाच्या जॉनरला थोडासा धक्का बसतो. चित्रपटाची लोकेशन्स अप्रतिम आहेत आणि शॅडो-प्ले वापरत केलेले छायाचित्रण भुरळ घालणारे आहे.

अश्विनी भावे यांनी यात रंगवलेली समिधा लक्षवेधी आहे. एका मोठ्या मुलाची आई साकारताना त्यांनी दाखवलेले आयाम छान जमून आले आहेत. त्यांच्या फ्रेश लूकमुळे चित्रपटाला आगळाच फील आला आहे. कथेला आवश्यक असलेल्या संयतपणाचे व्यवधान त्यांनी अचूक राखले असून ही भूमिका कदाचित त्यांच्यासाठीच लिहिली गेली असावी, असे वाटत राहते. रोहित फाळके याने यातला जयदीप मस्त उभा केला आहे. एकप्रकारचे दबलेपण वागवत त्याने ही भूमिका आश्वासकरित्या रंगवली आहे. तर, यात विकी साकारताना सुमेध मुद्गलकर याने चोख कामगिरी पार पाडली आहे. अंगात मुरलेला बेधडकपणा, चेहऱ्यावर हास्य आणत मनातली खळबळ लपवण्याची खुबी असे विविध विभ्रम त्याने उत्तम पेश केले आहेत. इतर भूमिकांमध्ये शिवानी टाकसाळे, मोहन कपूर, अपूर्वा अरोरा आदी कलावंतांनी चांगली साथ दिली आहे. मराठी चित्रपटांतला एक वेगळा प्रयत्न म्हणून मात्र या 'मांजा'ची दखल घेता येईल.  

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :