कच्चा लिंबूः ऋणानुबंध जपणारा मनस्पर्शी अनुभव...!

कच्चा लिंबूः ऋणानुबंध जपणारा मनस्पर्शी अनुभव...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर,मनमीत पेम,अनंत महादेवन,
  • निर्माता - मंदार देवस्थळी दिग्दर्शक - प्रसाद ओक
  • Duration - 2 तास Genre - कौटुंबिक
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

कच्चा लिंबूः ऋणानुबंध जपणारा मनस्पर्शी अनुभव...!

राज चिंचणकर
काही चित्रपट निर्माण होतानाच त्यांचे आगळे वैशिष्ट्य घेऊन येतात आणि त्याची पखरण पडद्यावर मुक्तपणे करत राहतात. 'कच्चा लिंबू' हा चित्रपट तर आजच्या जमान्यात थेट 'ब्लॅक अँड व्हाईट' फॉर्म घेऊन पेश झाला आहे. या चित्रपटातल्या काळ-काम-वेगाचे गणित हे जुने आहे आणि त्यात काहीही हस्तक्षेप न करता हा चित्रपट त्या काळाशी सुसंगती राखत सादर होतो. हृदय हेलावून टाकणारी कथा आणि तिची तितक्याच संवेदनशीलपणे केलेली मांडणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. मनस्पर्शी असे ऋणानुबंध चितारणारा चित्रपट म्हणून या 'कच्चा लिंबू'ची नोंद घ्यावी लागेल. 

आधुनिक जगाचा स्पर्शही न झालेला काळ या चित्रपटाने स्वीकारला आहे आणि काळाच्या पटलावर चार पाऊले मागे जाऊनच त्याची अनुभूती घेणे गरजेचे आहे. जुन्या काळातल्या मुंबईमधल्या गिरगावच्या चाळीत राहणाऱ्या अस्सल मध्यमवर्गीय अशा मोहन आणि शैला काटदरे यांच्या आयुष्याची ही गोष्ट आहे. त्यांचा मुलगा बच्चू हा 'स्पेशल चाईल्ड' आहे. शैला एका ऑफिसात काम करते, तर बच्चूजवळ कुणीतरी हवे म्हणून मोहन रात्रपाळीत काम करतो. बच्चू गतिमंद असला, तरी ऐन वयात आलेल्या बच्चूला त्याचे शरीर स्वस्थ बसू देत नाही. बच्चूसाठी स्वतःच्या वैवाहिक जीवनाकडे कळत नकळत दुर्लक्ष झालेल्या शैला आणि मोहन यांनी त्यांच्या सुखाची आहुती दिलेली आहे. नाही म्हणायला शैलाच्या ऑफिसचा बॉस श्रीकांत पंडित यांची सहानुभूती आणि पाठबळ शैलाच्या मागे आहे. या चौघांच्या आयुष्याचा वेध घेत या चित्रपटाने ठोस भाष्य केले आहे. 

 कथा, कादंबऱ्यांतून सर्वसामान्यांचे जीवन रेखाटणारे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या 'ऋणानुबंध' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. इतकी भक्कम कथा हाताशी असल्यावर त्यावरचे पुढचे सोपस्कार कसे केले गेले असतील हे महत्त्वाचे ठरते. पण पटकथा व संवादलेखक चिन्मय मांडलेकर याने त्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. दिग्दर्शनाचे सुकाणू स्वतंत्रपणे प्रथमच हाती धरलेल्या प्रसाद ओक याने या कथेची मांडणी मनस्वीपणे केली असून, त्याच्याकडून भविष्यातल्या अपेक्षा वाढवल्या आहेत. फक्त यातल्या बच्चूचा लाऊडनेस थोडा कमी करायला हवा होता. त्याचे अॅग्रेसिव्ह असणे जास्तच अंगावर येते. सोनाली कुलकर्णी व रवी जाधव यांना प्रमुख भूमिकेत आणून प्रसाद ओक याने आधीच बाजी मारली आहे. ही कथा बच्चूबद्दल बोलत असली, तरी त्याचे आई-वडील हे यात केंद्रस्थानी आहेत; याचे अचूक भान या सर्व मंडळींनी बाळगल्याचे स्पष्ट दिसते. हेच कशाला, पंडित या व्यक्तिरेखेलाही शैलाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्व आहे, याची पुरेपूर जाणीव चित्रपटाची ही मांडणी करून देते. 

'ब्लॅक अँड व्हाईट' फॉर्म या चित्रपटासाठी वापरला असला, तरी त्यात मधूनच रंग भरणारी कल्पकता स्तुत्य आहे. वर्तमानाला कृष्णधवल शेड आणि भूतकाळाला रंगीत; असा हा नाविन्यपूर्ण प्रयोग चांगला जमून आला आहे. याबाबत अमलेंदू चौधरी यांचे कॅमेरावर्क दाद देण्यासारखे आहे. संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन, जयंत जठार यांचे संकलन, तसेच राहुल रानडे यांची संगीतसाथ, ही सगळी भट्टी छान जुळून आली आहे. रवी जाधव यांनी उभा केलेला गतिमंद मुलाचा बाप असो, किंवा सोनाली कुलकर्णीने रंगवलेली बच्चूची आई असो; या व्यक्तिरेखांना त्यांनी त्यांचे स्वतःचे असे खास अस्तित्त्व मिळवून दिले आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखा टोकदार झाल्या आहेत. मनमीत पेम याने बच्चूची भूमिका प्रगल्भतेने साकारली असून तो यात फिट्ट बसला आहे. सचिन खेडेकर यांचा संवेदनशील बॉस भाव खाऊन जाणारा आहे; तर वेंकटच्या छोट्याश्या भूमिकेतले अनंत महादेवन सुद्धा लक्षात राहतात. अंतर्मुख करणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने, एक आगळावेगळा प्रयोग अनुभवण्याची मिळालेली संधी दवडून चालणार नाही.  

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :