रिक्त ओंजळीतल्या जीवनाचे रेखाटन...!

रिक्त ओंजळीतल्या जीवनाचे रेखाटन...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - मिताली जगताप, सायली गायकवाड, महेश शिंदे, राज गोरडे
  • निर्माता - सचिन जरे दिग्दर्शक - राज गोरडे
  • Duration - 2 तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

रिक्त ओंजळीतल्या जीवनाचे रेखाटन...!

राज चिंचणकर

पोटाची भूक कुणाला स्वस्थ बसू देत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकालाच कष्ट घ्यावे लागतात. यातल्या काहींचे श्रम सत्कारणी लागतात; तर काहींच्या हाती यशच येत नाही. अशावेळी दारिद्र्याचे विदारक दर्शन होत जाते. पोट भरण्यासाठी कायम आशेवर राहावे लागणे यासारखे दुर्दैव नाही; मात्र काहीजणांच्या नशिबी हेच भोग लिहिलेले असतात. रिक्त ओंजळीतून जीवनक्रम आखणे हाच त्यांचा दिनक्रम बनून जातो. अशीच आयुष्याची होणारी परवड 'घाट' हा चित्रपट चितारतो आणि त्याचवेळी दुःख, माया, मैत्री, संवेदना, रूढी, संस्कृती यांचेही रेखाटन करतो.  

ही गोष्ट आहे ती मन्या नामक १०-१२ वर्षाच्या मुलाची!  आळंदीच्या घाटावर तो, त्याची छोटी बहीण संगी, त्याची आजारी आई विमल आणि व्यसनी बाप जग्गू यांचे कुटुंब आडोशाला पथारी पसरून वास्तव्य करून आहे. घाटावर क्रियाकर्म करण्यासाठी येणाऱ्यांकडून मिळणारी बिदागी हे मन्याच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. पण क्रियाकर्म झाले नाही; तर पोट भरण्याचा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा ठाकतो. त्याची आई असाध्य आजाराने पीडित आहे; तर बाप हा या घाटावरचा दादा असला तरी व्यसनाच्या आहारी जाऊन पार बिघडलेला आहे. साहजिकच, त्या कुटुंबात चूल पेटण्यासाठी त्यांना मन्याचाच आधार आहे. घाटावर अनेक उपद्व्याप करून पैसे गोळा करणे, हा मन्या आणि त्याचा मित्र पप्या या दोघांचा उद्योग आहे. हा त्यांचा जीवनक्रम म्हणजेच 'घाट' हा चित्रपट आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण यात फार काही घटना घडत नाहीत आणि घाटावरचे या कुटुंबाचे जीवन चितारणे हाच या चित्रपटाचा उद्देश असल्याचे स्पष्ट होत जाते.  

घाटावर सुरु होणारी या चित्रपटाची कथा या घाटावरच संपते आणि 'घाट' हाच या कथेचा केंद्रबिंदू असल्याचे ठसवत राहते. ही कथा जरी मन्याची असली, तरी या कथेत विविध व्यक्तिरेखा येतात आणि हा चित्रपट विस्तारत जातो. कथा, पटकथाकार व दिग्दर्शक राज गोरडे यांनी चित्रपटातला हा घाट सजवला आहे. मात्र पूर्वार्धात त्याची गती संथ आहे. यात विशेष वळणे घेणाऱ्या घटना नसल्याने, जे आहे ते उत्तम मांडण्याचा केलेला प्रयत्न दिसतो. त्यादृष्टीने हा घातलेला घाट जमून आला आहे. वास्तविक, यात काही प्रसंगांची मांडणी करून ही कथा अधिक रंजक करता आली असती. या कथेचा जीव फारच छोटा आहे; त्यामुळे यात येणाऱ्या इतर व्यक्तिरेखा कथेला पुढे नेण्याचे कार्य करत राहतात. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव कसा उठून दिसेल, याकडे प्रकर्षाने लक्ष दिल्याचे दिसून येते. या व्यक्तिरेखांचे रेखाटन मात्र ठाशीव झाले आहे. 

प्रशस्त घाटाचे लोकेशन नजर खिळवून ठेवणारे आहे. या घाटावर अमोल गोळे यांचा कॅमेराही नजाकतीने फिरला आहे. काही फ्रेम्स तर नजरबंदी करतात. रोहित नागभिडे यांचे कथेला साजेसे असलेले संगीत, या चित्रपटाची उंची वाढवणारे आहे. प्रकाश बल्लाळ यांचे कला दिग्दर्शन, महावीर साबन्नावार यांचा साऊंड इफेक्ट; तसेच सागर वंजारी यांचे संकलन आश्वासक आहे. 

यश कुलकर्णी याने मन्याच्या भूमिकेत उत्तम रंग भरले आहेत. त्याला भूमिकेची समज चांगली असल्याचे त्याने यात ठसवले आहे. तोच या कथेचा हिरो असल्याचे व्यवधान त्याच्या ठायी आहे, हे यातून स्पष्ट  होते. यातल्या आईच्या भूमिकेसाठी मिताली जगताप या गुणी अभिनेत्रीची केलेली निवड चपखल आहे. या भूमिकेचे विविधरंगी कंगोरे तिने नजाकतीने उलगडले आहेत. उमेश जगताप यांनी मन्याच्या व्यसनी बापाची खलनायक सदृश्य भूमिका टेचात रंगवली आहे. दत्तात्रय धर्मे याचा पप्या सुद्धा लक्षात राहतो. रिया गवळी हिने छोटी संगी गोड रंगवली आहे. सायली गायकवाड, महेश शिंदे, राज गोरडे  हे सुद्धा त्यांच्या भूमिकेत छाप पाडून जातात. एकूणच, छोटा जीव असलेल्या कथाबीजाला घाटासारखे प्रशस्त करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचे दिसून येते.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :