ध्यानीमनी ः मनाला 'मोहित' करणारी गोष्ट…!

ध्यानीमनी ः मनाला 'मोहित' करणारी गोष्ट…! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - महेश मांजरेकर,अश्विनी भावे,अभिजित खांडकेकर,मृण्यमयी देशपांडे
  • निर्माता - अनिरूद्ध देशपांडे, मेधा मांजरेकर दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
  • Duration - 2 तास Genre - थ्रिलर
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

ध्यानीमनी ः मनाला 'मोहित' करणारी गोष्ट…!

राज चिंचणकर

मानवी जीवनात विविध प्रकारचे खेळ सुरूच असतात. काहींना त्याची जाणीव होते; तर काहीजण त्यापासून पार दूर असतात. सर्वसाधारण आयुष्य जगताना अशा खेळांची संगत सुरु असली, तरी अनेकांच्या जाणिवेच्या टप्प्यात ती येत नाही. पण हा खेळ जर गंभीर रूप धारण करू लागला, तर मात्र त्याच्या सोंगट्या आयुष्यात विखुरल्या जातात आणि या खेळाला भलतेच वळण लागते. 

अस्तित्त्वाची लढाई माणूस सतत लढत असतो; पण या अस्तित्त्वावरच कधी प्रश्नचिन्ह उभे राहिले तर काय होऊ शकते, याचा लेखाजोखा 'ध्यानीमनी' या चित्रपटाने मांडला आहे. या कथेत गूढता आहे खरी; मात्र ती मनोविश्लेषणाच्या पातळीवर तिचा रंग दाखवते. वास्तविक, 'ध्यानीमनी' या नाटकावर हा चित्रपट आधारित असला, तरी चित्रपट माध्यमाची खास ओळख घेऊन तो दृश्यमान झाल्याने, या चित्रपटाचे चांदणे अधिकच लख्ख झाले आहे. ज्यांनी दोन दशकांपूर्वी आलेले हे मूळ नाटक पाहिले आहे, त्यांना यातली गूढता कदाचित चक्रावून टाकणार नाही. परंतु नाटकाचा अनुभव न घेतलेल्यांसाठी हा चित्रपट म्हणजे एकप्रकारची 'ट्रीट' आहे आणि या 'ट्रीटमेंट'नेच या चित्रपटाचा दर्जा उंचावण्यास हातभार लावला आहे. 

वरकरणी रहस्यमय प्रकारात हा चित्रपट मोडत असला, तरी यातले हे रहस्य मानवी मनाचे कंगोरे उलगडणारे आहे. साहजिकच, आतापर्यंत पडद्यावर दिसलेल्या गूढरम्यतेपासून या चित्रपटाने स्वतःची अशी वेगळी वाट चोखाळली आहे. 'मोहित' ही व्यक्तिरेखा हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि त्याभोवती फिरणाऱ्या इतर व्यक्तिरेखा हा पट विस्तृत करतात. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय ही पंचसूत्री यात उत्तम जुळून आल्याने हा चित्रपट मनाला 'मोहित' करणारी गोष्ट सादर करतो. 

पाठक कुटुंबातल्या सदानंद, शालिनी व त्यांचा मुलगा मोहित यांची ही कहाणी आहे. ज्या कारणास्तव हे कुटुंब शहरातून गावात स्थलांतरित झाले आहे, तो या गोष्टीचा पाया आहे. तर, या तिघांच्या कुटुंबात पाहुणे म्हणून समीर व अपर्णा हे युवा जोडपे येते आणि पाठक परिवारातले एक रहस्य अनाहूतपणे उघडकीस येते. इथेच पहिला धक्का मिळतो आणि चित्रपटभर धक्कातंत्राची ही मालिका पाठ सोडत नाही. वास्तविक, ही गोष्ट तशी छोटी आहे; परंतु शेवटापर्यंत ती खिळवून ठेवते. भूत, भौतिक, विज्ञान, मानसशात्र अशा सर्व शाखांच्या माध्यमातून विचार करण्यास लावण्याची क्षमता या गोष्टीत दडली आहे. केवळ रहस्यच नव्हे; तर मातृत्वाशी संबंधित विषयही यात सहज मिसळल्याने या कथेला सामाजिक जाणिवेचाही स्पर्श झाला आहे. 

कथा, पटकथा व संवादलेखक प्रशांत दळवी यांनी अतिशय काटेकोर अशा साच्यातून ही गोष्ट लिहिली आहे. या गोष्टीची संकल्पनाच भन्नाट आहे आणि ती मांडण्याची त्यांची उत्तम हातोटी यात दिसून येते. चंद्रकांत कुलकर्णी यांची दिग्दर्शकीय साथ या गोष्टीला मिळाल्याने तिचे अवकाश अधिकच विस्तारले आहे. या दोघांची लेखक व दिग्दर्शक म्हणून केमिस्ट्री आतापर्यंत अचूक जुळल्याची अनेक उदाहरणे असताना, या चित्रपटाने त्यापुढची पायरी गाठली आहे. या दोघांच्या अफलातून ट्युनिंगमुळे हा कठीण विषय ठोसपणे पडद्यावर मांडला गेला आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी बारीकसारीक बाबींचा केलेला तपशीलवार विचार आणि त्याचे कडक सादरीकरण हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटाला दिग्दर्शकाचे माध्यम का म्हणतात, याचे प्रतिबिंब यात पडलेले दिसते. मर्यादित जागेत घडणाऱ्या या गोष्टीचा आवाका वाढवण्यासाठी केलेला बाह्य स्थळांचा उपयोगही चपखल आहे.   

कलावंतांनीसुद्धा ही अवघड कामगिरी ताकदीने पार पाडत या चित्रपटाला संस्मरणीय करण्याची जबाबदारी उचलली आहे. महेश मांजरेकर यांनी सदानंद पाठक ही भूमिका रंगवताना यात कमाल केली आहे. कथेच्या अनुषंगाने, नवरा आणि वडील साकारताना त्यांनी दाखवलेले विभ्रम अचंबित करणारे आहेत. शालिनी ही व्यक्तिरेखा या कथेचा कणा आहे आणि अश्विनी भावे यांनी त्याची प्रयत्नपूर्वक जपणूक केली आहे. त्यांचे प्रतिक्रियात्मक वागणे जसे अंगावर येते, तसेच त्यांनी काही प्रसंगात केलेली कामगिरीही लक्ष वेधून घेते. मात्र चित्रपटाच्या पूर्वार्धात त्यांची व्यक्तिरेखा ठसवण्यासाठी त्यांच्या तोंडी 'नॉनस्टॉप' देण्यात आलेले संवाद मात्र खटकतात. अर्थात, तो त्यांचा दोष नाही. 

यातली 'मोहित' ही व्यक्तिरेखा गूढत्वाचा सारा खेळ रंगवते, त्यामुळे तिची उकल करून सांगणे हे अर्थातच उचित नाही. अभिजीत खांडकेकर (समीर) आणि मृण्मयी देशपांडे (अपर्णा) हे दोघेही या कथेत सहज विरघळून गेले आहेत. त्यांच्यासह माधव अभ्यंकर (करंदीकर सर) यांची साथही लक्षात राहते. अजित रेड्डी यांचे कॅमेरावर्क नजरेत भरणारे आहे; तर परेश मांजरेकर यांचे संकलन अचूक आहे. पार्श्वध्वनी ही या चित्रपटाची मोठी गरज आहे आणि संदीप मोचेमाडकर यांनी ती जबाबदारी लक्षणीय पार पाडली आहे. नितीन नेरुरकर व अभिषेक विजयकर यांचे कलादिग्दर्शन योग्य मेळ घालणारे आहे. संदीप खरे यांच्या एकुलत्या एक गीताला, अजित परब यांनी चढवलेला संगीतसाज मनात रेंगाळणारा आहे. एक हटके अनुभव देणाऱ्या या चित्रपटाची, अलीकडच्या काळात पडद्यावर आलेली एक चांगली कलाकृती म्हणून निश्चितच नोंद होऊ शकेल.


RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :