Bandookya Movie Review:पालांच्या आड दडलेल्या वास्तवतेचे चटके...!

Bandookya Movie Review:पालांच्या आड दडलेल्या वास्तवतेचे चटके...! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - शशांक शेंडे,अतिशा नाईक,नामदेव मुरकुटे,निलेश बोरसे
  • निर्माता - राजेंद्र बोरसे आणि प्रतिभा बोरसे दिग्दर्शक - राहुल मनोहर चौधरी
  • Duration - 2 तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Bandookya Movie Review:पालांच्या आड दडलेल्या वास्तवतेचे चटके...!

नागरी जीवनाच्या पलीकडे भटक्या जमातीचे एक विलक्षण असे जग आहे आणि आधुनिक विश्वाच्या दृष्टीपल्याड असलेल्या या जगाचे वास्तव दर्शन 'बंदूक्या' हा चित्रपट घडवतो. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवरती, या उक्तीची सार्थ आठवण करून देणारी भटक्या जमातीची पाले यात आहेत आणि या पालांच्या आड दडलेल्या वास्तव जीवनाचे चटके या चित्रपटातून जाणवतात. या चित्रपटाला एक ठोस अशी गोष्ट आहे आणि त्यात या समाजाचे प्रतिनिधित्व करणारी काही माणसे आहेत. भटक्या जमातीतल्या काही व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ही गोष्ट या लोकांचे समग्र जीवन समोर ठेवते. 

 ही गोष्ट आधुनिक समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी तर आहेच; परंतु त्याचबरोबर मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्यास प्रवृत्त करणारीही आहे. नागरी समाजाचा विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीची समाजरचना या जमातीत आहे आणि आत्मसन्मान लयाला गेला आहे की काय, असे वाटावे अशी अवस्था या जमातीची आहे. पुढारलेल्या समाजाच्या अगदी विरुद्ध टोक असलेल्या अशा जमाती आजही या देशी आहेत; पण त्यांची कुणाला फिकीर नाही आणि या समाजात जे काही चालते त्याची गंधवार्ताही नाही. पैशांच्या बदल्यात माणूस गहाण ठेवणे, यासारखे रीतीरिवाज केवळ परंपरेच्या नावाखाली इथे बिनदिक्कत सुरु आहेत आणि बेगडी चकचकाटात मश्गुल असलेल्या जगाला त्याची काही खबरबात नाही, हे खरे यातले वास्तव आहे. या सगळ्यावर हा चित्रपट प्रखर प्रकाश टाकतो. 

 एका पालावर हातभट्टीची दारू विकणारी मध्यमवयीन सुरंगी आणि तिचा मुलगा आवल्या यांची ही गोष्ट आहे. आवल्याचे याच पालावर राहणाऱ्या तोलकवर प्रेम आहे. लग्नाच्या वेळी मुलाकडून हुंडा घेण्याची पद्धत असलेल्या या जमातीच्या रितीनुसार, तोलकचा बाप डोरल्या हा या लग्नासाठी सुरंगीकडे हुंडा मागतो. अर्धी रक्कम सुरंगी त्याला अदा करते आणि उरलेल्या रकमेसाठी वेळ मागून घेते. मधल्या काळात तिच्यावर काही आरोप लावून तिला तुरुंगात डांबले जाते आणि यात तिचा मृत्यू होतो. त्यामुळे उरलेली रक्कम डोरल्याला देण्याची जबाबदारी आवल्यावर येऊन पडते. लूटमार, चोरी, दरोडे घालून पोट भरणे ही या जमातीची परंपरा आवल्याला मान्य नसते आणि त्याच्या हाती दुसरा काही कामधंदा नसल्याने ही रक्कम उभी करणे त्याला शक्य होत नाही. परिणामी, जातपंचायत भरवली जाते आणि या पालावरचा अघोषित नायक बंदूक्या हा पैशांच्या बळावर ही बाजी जिंकतो. यात तोलकला गहाण ठेवले जाते आणि तिचा मुक्काम थेट बंदूक्याच्या घरी हलतो. 

 जुन्नर येथील रांगडी बोलीभाषा हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे आणि या भाषेचा लहेजा पुरेपूर मुरवत ही गोष्ट साकार होते. अस्सल मातीतल्या व्यक्तिरेखा यात उभ्या केल्याने या गोष्टीचा टोकदारपणा अधिकच वाढला आहे. काहीही आडपडदा न ठेवता यातली प्रत्येक व्यक्तिरेखा तिचा स्वभावधर्म या भाषेतून थेट स्पष्ट करत जाते. रामनाथ चव्हाण यांच्या मूळ कथेवरून, या चित्रपटासाठी कथा, पटकथा व दिग्दर्शन अशी जबाबदारी उचलणारे राहुल मनोहर चौधरी यांनी सुखासीनतेच्या पलीकडच्या जगातले जगणे या गोष्टीतून मांडले आहे. ठोस लेखणी आणि आश्वासक मांडणी यांची भट्टी चांगली जुळल्याचे उदाहरण या चित्रपटातून दिसून येते. पालावरच्या जीवनाचा घेतलेला धांडोळा आणि त्याचे प्रतिबिंब व्यक्तिरेखांतून सक्षमतेने उतरवण्याचा ध्यास त्यांनी घेतल्याचेही स्पष्ट होते. भाषेचा मुक्त आणि थेट वापर केलेले नामदेव मुरकुटे यांचे संवादलेखनही बाजी मारून जाते. वास्तविक, बंदूक्या हा या गोष्टीतला खलनायक आहे; मात्र नायक आणि खलनायक यातली सीमा पुसट करत तो साकार होतो. त्याची खलनायकी क्रूरतेने पेश होत नाही; तर तिच्यात सौम्यतेची पेरणी आहे. पण एक व्यक्तिरेखा म्हणून ती थोडी मागे पडते. गोष्टीचा शेवट कसा असेल याचा अंदाज जरा आधीच येत असल्याने, त्याबाबतची उत्सुकताही कमी होते. 

 संगीतकार परीक्षित भातखंडे यांच्या संगीतातून सजलेली यातली गाणी, या गोष्टीतल्या वास्तवतेला पुढे घेऊन जाणारी आहेत. कृष्णा सोरेन यांचे कॅमेरावर्क, नितेश राठोड यांचे संकलन, अजय पाटोळे यांचे कलादिग्दर्शन यांच्या साथीने चित्रपटाची उंची वाढली आहे. प्राजक्ता जोशी यांची वेशभूषाही महत्वाची आहे. अभिनयाचे खणखणीत चौकार आणि षटकार खेचत या चित्रपटातल्या कलावंतांनी कमाल सीमा गाठली आहे. शशांक शेंडे यांनी डोरल्याच्या भूमिकेत जान ओतली आहे आणि त्यांचा हा डोरल्या त्यांच्या कारकिर्दीतली महत्त्वाची भूमिका ठरू शकते. अतिशा नाईक यांनी सुरंगीचा ठसका दणक्यात दाखवला आहे. नामदेव मुरकुटे यांनी बंदूक्या रंगवताना सहजता आणि बिनधास्तपणाचे लक्षण कायम केले आहे. वासंतिका वाळके हिची तोलक लक्षवेधी आहे आणि तिच्याकडून भविष्यात अधिक अपेक्षा ठेवण्याजोगी कामगिरी तिने बजावली आहे. निलेश बोरसे याने आवल्या साकारताना चांगले ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या आणि इतर कलावंतांच्या दमदार अभिनयाने हा चित्रपट अधिकच भक्कम झाला आहे. एक अनोखा अनुभव म्हणून आणि सर्वसाधारण जनांच्या दृष्टीपल्याड असलेल्या जगाची ओळख करून देणारा म्हणून या चित्रपटाने काही सांगू पाहण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :