पूजा सावंतने क्षणभर विश्रांती, सतरंगी रे, दगडी चाळ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. आज एक अभिनेत्री म्हणून तिने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. पोस्टर बॉइज या चित्रपटात अनिकेत विश्वासरावसोबत तिची केमिस्ट्री खूपच चांगली जुळून आली होती. तिच्या या चित्रपटाची चांगली चर्चा देखील झाली होती. पूजा ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री आहे.
पूजाला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. तिला कुत्र्यांविषयी तर खूप प्रेम आहे. रस्त्यांवरील कुत्र्यांविषयी तर तिला प्रचंड आपुलकी आहे. तिने आणि तिच्या बहीणीने आतापर्यंत रस्त्यावरील अनेक कुत्र्यांचा सांभाळ केला आहे. दादर माहीम परिसरातील कुत्र्यांना या बहिणी अनेक वेळा डॉग फूड देतात. काही दिवसांपूर्वी तर तिने रस्त्यावरील एका कुत्र्याला चक्क घरी आणले होते. या अनाथ कुत्र्याला तिने आपलेसे केले होते.
पूजाच्या भावाला गटारात पडलेले एक कुत्र्याचे पिल्लू दिसले होते. त्याने ते घरी आणले होते. गटारात पडल्यामुळे त्याच्या पायाला चांगलीच दुखापत झाली होती. त्यामुळे पूजाच्या भावाने त्याला डॉक्टरांकडे नेवून त्याच्यावर उपचार केले आणि त्यानंतर त्या पिल्लाला पुन्हा रस्त्यावर सोडून न देता पूजाने ते पिल्लू त्याच्या घरातच ठेवले होते. आता तर हे कुत्र्याचे पिल्लू पूजाच्या घरात चांगलेच रुळले आहे.
प्राण्यांवर आधारित मी अँड पॉ ही बेवसिरिज नुकतीच सुरू झाली असून या वेबसिरिजच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना पूजा आणि तिच्या भावाने आणलेल्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाची ही गोष्ट पाहायला मिळणार आहे.