काय आहे आदिनाथ कोठारेचा माणुसकी क्रांती मोर्चा?

आपण देशाने, धर्माने, भाषेने, स्वभावाने आणि परिस्थितींमुळे कितीही वेगळे असलो तरीही आपल्या सगळ्यांची जात मात्र एकच... "माणुसकी."

काय आहे आदिनाथ कोठारेचा माणुसकी क्रांती मोर्चा?
Published: 14 Aug 2017 10:36 AM  Updated: 14 Aug 2017 10:36 AM

मागच्या वर्षी फ्रान्स मधील सुप्रसिद्ध कान्स आंतरराष्ट्रीय सिने सोहळ्यातील (कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल) प्रोड्युसर्स वर्कशॉप अटेन्ड करून मी परतत होतो. माझी नीस-इस्तांबूल-मुंबई अशी कनेक्टिंग फ्लाईट असून, इस्तांबूल इथे चार तासांचा हॉल्ट होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाऊन येण्याचा प्रवास हा माझ्यासाठी खरंच एक अविस्मरणीय आणि समृद्ध करणारा ठरला. जगभरातील देशातून-कानाकोपऱ्यातून येणाऱ्या निर्मात्यांना, अभिनेत्यांना आणि तंत्रज्ञानांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांचे निरनिराळे दृष्टिकोन, काही सामान अडचणी, त्यांच्या वेगवेगळ्या देशांच्या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या कल्पना, थोड्या आपल्यासारख्याच आवडी निवडी, तर थोडी विलक्षण व्यक्तिमत्त्वं. अशा भिन्न व्यक्तिमत्त्वांचे आणि विचारांचे लोक कुठलाही संकोच किंवा आव न आणता दिलखुलासपणे आणि आपुलकीने एकमेकांना नव्याने भेटून चित्रपटांच्या कल्पनांची आणि व्यवहारांची चर्चा आणि देवाणघेवाण करत मिसळत होते. इट वॉज ए लार्जर दॅन लाइफ फेस्टिव्हल ऑर रॅदर ए फेस्टिव्हल ऑफ लाईफ! त्या निरनिराळ्या लोकांना भेटून आणि त्यांच्याशी चर्चा करून मला एक खात्री मात्र पटली. आपण देशाने, धर्माने, भाषेने, स्वभावाने आणि परिस्थितींमुळे कितीही वेगळे असलो तरीही आपल्या सगळ्यांची जात मात्र एकच... "माणुसकी."
२८ मे २०१६ ला मी नीस वरून निघालो. तीन तासात मी इस्तांबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो. मुंबईला जाणारी माझी फ्लाईट तीन तासांनी होती. मी वेळेची संधी साधून तुर्की देशाच्या राजधानीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मर्यादित सीमेत या नवीन देशाची एक झलक बघण्याचा प्रयत्न करत होतो. तिथले खास जेवणाचे पदार्थ चाखत होतो. आदाना कबाब, शीश ताऊक, बक्लावा आणि टर्किश डिलाईट असे त्यातले माझे आवडते पदार्थ ठरले. टर्किश डिलाईटचे दोन डबे मी पॅकही केले. त्या देशाची आणखी एक खासियत म्हणजे त्या भागात सापडणारा दुर्मीळ फिरोजा मणी (टर्कीझाईट). आमची व्याकुळतेने घरी वाट पाहत बसलेल्या आमच्या सरकारसाठी आम्ही फिरोजाची एक छोटीशी आंगठी घेतली. इतके दिवस एकट्याने मजा करून परततो आहे म्हटल्यावर त्याची परतफेड नको का करायला?
सर सलामत तो ट्रिप्स पचास! तर असं जीवाचं इस्तांबूल एअरपोर्ट केल्यावर शेवटी थकून मी एका कॉफी शॉपमध्ये जाऊन बसलो. 
माझ्या फ्लाईटला आणखी दीड तास होता. फ्री वायफाय असल्यामुळे वेळ जात होता, पण आता एक दिव्य संकट समोर उभं राहिले होते. ते म्हणजे माझ्या फोनची बॅटरी फक्त ५ टक्के राहिली होती आणि माझा चार्जर मी चुकून चेक-इन लगेज मध्ये टाकला होता. आजूबाजूला शोधल्यावर मला पलीकडच्या टेबलवर एक मुलगी माझयासारखाच फोन घेऊन कॉफी पीत बसलेली दिसली. मी तिच्या जवळ जाऊन तिला सहज विचारलं, "तुमच्याकडे चार्जर असेल का?" त्या मुलीने माझ्याकडे बघत मंदहास्य करत खूपच अदबीने आणि आपुलकीने तिच्या टेबलावरच्या समोरच्या खुर्चीवर मला बसण्याचा इशारा करत तिच्या पर्समधून मला एक चार्जिंग वायर आणि पॉवर बँक काढून दिली. मी तिचे खूप आभार मानले आणि तिच्या टेबलवरच्या समोरच्या खुर्चीवर बसून फोन चार्ज करायला लावला. 
बसल्या बसल्या आम्ही बोलायला लागलो. एकमेकांना स्वतःची ओळख पटवून दिली. भारताच्या सिनेसृष्टीशी माझा संबंध आहे कळल्यावर तिला त्याचे कुतूहल वाटलं. भारतीय सिनेमे बघण्याची तिलाही फार आवड होती. तिने सत्यजित रे, राज कपूर आणि हृषिकेश मुखर्जी यांचे बरेच सिनेमे बघितले होते. भारतीय संस्कृती आणि कलाकृतींबद्दलची तिची फार उच्च मत होती. ती स्वतः परदेशात मानववंशशास्त्राचा अभ्यास पूर्ण करून तिच्या स्वतःच्या देशात तिच्या घरी परतत होती. तिला स्वदेशी जाऊन तिचा मानववंशशास्त्राचा अभ्यास सुरू ठेवायचा होता. तिच्या देशात ज्या भागात ती राहते, त्या भागाच्या सामाजिक इतिहासावर तिला पी.एच.डी. करायची होती. इतिहास आणि मानववंशशास्त्र हे माझेही आवडते विषय असल्यामुळे मी देखील तिला खूप कुतूहलाने आणि उत्सुकतेने प्रश्न विचारत होतो आणि तिच्या देशाबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आमची छान मैफिल रंगली होती आणि आमच्या गप्पांमध्ये एक तास कधी निघून गेला आम्हाला कळलंच नाही.   
त्या मुलीचे नाव किंवा तिच्या देशाचं नाव मला सांगावंसं वाटत नाही किंवा त्याची गरजही आहे असं मला भासवत नाही. "व्हॉॅट्स इन दी नेम" जे शेक्सपिअर म्हणाले होते ते याच अर्थाने म्हणाले असतील. आपण नावात धर्म शोधतो, मग त्यातून निर्माण होणारे राजकारण शोधतो, मग सीमा बांधल्या जातात, मग युद्ध सुरू होतात आणि मग आपण सगळंच हरवून बसतो. निसर्ग देखील. 
मी एवढंच म्हणेन की ७० वर्षांपासून उभं केलेलं आमच्या दोघांच्या नावातलं ते अंतर आम्ही त्या एका तासात व्यापून टाकलं होते. मिटवून टाकले होते. 
मला माझ्या फ्लाईटच्या बोर्डिंगची अनाऊन्समेंट ऐकू आली. तिला देखील तिच्या फ्लाईटच्या बोर्डिंग काऊंटरकडे निघायचं होतं. आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. फेसबुक आयडीज शेअर केले आणि संपर्कात राहू असं आश्वासन देऊन विरुद्ध दिशेने आपापल्या मार्गी निघालो. 
आमच्या कॉफी टॅबलेवर त्या क्षणी माणुसकीच्या धर्माचा एक छोटासा झेंडा फडकावत असावा. जो काही अनैसर्गिक लोकांना बघवला गेला नसावा. 
बरोबर एका महिन्यानी त्याच ठिकाणी, २८ जून २०१६ला इस्तांबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेकी हल्ला झाला. त्यात ४५ माणसांचा मृत्यू झाला आणि २३० माणसं जखमी झाली. 

Also Read : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात लवकरच येणार नवा पाहुणा


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :