‘घुमा’ चित्रपटाचा मुहूर्तमेढ

एक काळ होता, मराठी चित्रपटसृष्टीवर मुंबई-पुणे-कोल्हापूरचे राज्य होते. निर्माते, दिग्दर्शक, कलावंतांबरोबर सिनेक्षेत्रातील इतर मंडळीही इथलीच होती. त्यात तमाशाप्रधान, कौटुंबिक आणि विनोदी फार्स असलेल्या चित्रपटांचा भरणा जास्त होता.

‘घुमा’  चित्रपटाचा मुहूर्तमेढ
Published: 27 Sep 2017 04:23 PM  Updated: 27 Sep 2017 04:23 PM

एक काळ होता, मराठी चित्रपटसृष्टीवर मुंबई-पुणे-कोल्हापूरचे राज्य होते. निर्माते, दिग्दर्शक, कलावंतांबरोबर सिनेक्षेत्रातील इतर मंडळीही इथलीच होती. त्यात तमाशाप्रधान, कौटुंबिक आणि विनोदी फार्स असलेल्या चित्रपटांचा भरणा जास्त होता. पण, अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातून सामाजिक समस्यांकडे डोळसपणे पाहणारे, उत्तम वैचारीक बैठक असलेले आणि मनोरंजकतेची व सिनेतंत्राची उत्तम जाण असलेले तरूण सिनेसृष्टीत आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करत आहेत. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि भाऊ कऱ्हाडे यांचे. अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतलेल्या नागराज मंजुळे आणि भाऊ कऱ्हाडे या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या गावरान ठसक्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. स्थानिक सामाजिक प्रश्नांना सिनेमाच्या माध्यमातून वाचा फोडताना, दोघांनिही आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले आहे. आता याच अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशनचा तिसरा विद्यार्थी, दुरावस्था झालेल्या शालेय शिक्षण व्यवस्थेमुळे संभ्रमात असलेल्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायला सज्ज झाला आहे. त्याचे नाव आहे महेश रावसाहेब काळे.


वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी महेश काळे यांनी एकलव्याप्रमाणे नागराज आणि भाऊला गुरू मानून ‘घुमा’ या चित्रपटाती मुहूर्तमेढ रोवली. महेशने कॉलेज मध्ये शिकत असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ‘रुपया’ नावाची एक शॉर्टफिल्म बनवली आणि त्यासाठी त्याला 2014 या वर्षीचा कोलकात्याच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा नॅशनल स्टुडण्ट फिल्म ॲवॉर्ड मिळाला.  त्याआधीच डोक्यात घुमाची कथा घोळत असलेल्या महेशने फिचर फिल्म बनविण्याचा निर्धार केला आणि मंगेश जोंधळे, अविनाश मकासरे आणि विक्रम शंकपाळे या कॉलेच्याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन घुमा चित्रपटाच्या निर्मितीची तयारी सुरू केली.


“सधन बागायतदारांनी आपली मुलं नव्याने थाटलेल्या चकचकीत इंग्रजी शाळेत घातल्यानंतर गावातील आर्थिकदृष्ट्या जेमतेम आणि अशक्त असलेल्या इतर पालकांनाही इंग्रजी शाळेची स्वप्न पडू लागली. आणि मग जो तो आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी घुम्यासारखे वणवण भटकताना मी प्रत्यक्ष पाहिलंय. परिस्थिती इतकी चिघळली की काहीजण दागिने, वावर गहाण टाकून प्रवेश घेऊ लागले. गावाकडं जिथे जावं तिथं एकदुसऱ्याच्या शाळा प्रवेशाच्या यशापयाशाच्या कथा  मीठ-मसाला लावून चवीने चघळू लागल्या. आणि मला कथा सुचली!” .
 
एकुलत्या एक मुलाच्या चित्रपट बनविण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी वडिल रावसाहेब काळे यांनी शेतीवर कर्ज काढले. ड्रीमसेलर फिल्म्स ही संस्था स्थापन करून शुटींग सुरू झालं. पुढे लागेल तसं एकेक करून अठरा गायी विकून टाकल्या आणि आणखी पैसे उभे केले. परंतु, तितक्याने भागणारे नव्हते. मग, महेशचे मामा शरद कोठुळेंनी भाच्यासाठी थोडा हातभार लावला. इतर नातेवाईक, परिचितांकडून उधार-उसनवारी केली. तरीही, गणित काही केल्या जुळेना. अखेर नगर शहरातील मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सारंग बारस्कर आणि संतोष इंगळे हे चार तरूण उद्योजक पुढे आले. चित्रपटाच्या विषयाचे गांभिर्य ओळखून आणि आपल्याच नगर जिल्ह्यातून आणखी एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर यावी, या हेतुने या चौघांनी पूर्णपणे आर्थिक पाठबळ दिले. घुमा हा चित्रपट निर्मिती आणि प्रदर्शित करण्याचे या चौघांनी शिवधनुष्य उचलले. ख्वाडा या चित्रपटाचा पूर्वानुभव पाहता, पैशाअभावी ग्रामीण भागातील उत्तम कलाकृती आणि कलाकार दबून राहू नये म्हणून घुमाच्या निमित्ताने या चारही उद्योजकांनी मास फिल्म्स या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे.


आड्यात नसतानाही पोहऱ्यात जबरदस्तीने आणण्याच्या नादात, प्रस्थापितांच्या टाचेखाली दबलेल्या एका शेतकरी बापाची आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत दाखल करण्याची केविलवाणी धडपड घुमा या चित्रपटातून पडद्यावर आणण्यात महेश काळे यांनी आपल्या सिनेतंत्राचं कसब पणाला लावले आहे. एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्याचा उत्तम धांडोळा घेताना मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आणि घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांचं मनोबल उंचावणारा ‘घुमा’ प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावेल. या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट परिक्षक पसंतीचा पुरस्कार आणि राज्य पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर पासून प्रदर्शित होत आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :