आदिनाथ कोठारे म्हणतोय, 'तथास्तु !'

माझा देवाकडे आणि त्याच्या मागच्या श्रद्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वैज्ञानिक, तत्त्वज्ञानिक आणि वास्तविक आहे. अंधश्रद्धेकडे किंवा श्रद्धेचा व्यवसाय करणाऱ्यांकडे मी घृणेच्या भावनांनी बघतो. आज या जगातली सगळी युद्धं, सगळा आतंकवाद आणि सामाजिक-वैज्ञानिक प्रगतीच्या आड येणारे सगळे अडथळे हे धर्माच्या राजकारणामुळेच सुरू आहेत.

आदिनाथ कोठारे म्हणतोय, 'तथास्तु !'
Published: 16 Jul 2017 11:27 AM  Updated: 16 Jul 2017 11:28 AM

आज एका प्रख्यात, प्रतिष्ठित आणि प्राचीन देवस्थानाला जाऊन आलो. मी श्रद्धाळू जरी असलो तरी खूप देव देव करणाऱ्यातला नाही. माझा देवाकडे आणि त्याच्या मागच्या श्रद्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वैज्ञानिक, तत्त्वज्ञानिक आणि वास्तविक आहे. अंधश्रद्धेकडे किंवा श्रद्धेचा व्यवसाय करणाऱ्यांकडे मी घृणेच्या भावनांनी बघतो. आज या जगातली सगळी युद्धं, सगळा आतंकवाद आणि सामाजिक-वैज्ञानिक प्रगतीच्या आड येणारे सगळे अडथळे हे धर्माच्या राजकारणामुळेच सुरू आहेत. किमान २५०० वर्षं आपण या धर्माच्या राजकारणात घुटमळत आहोत. या धर्माच्या राजकारणामुळेच आपण खूप काही गमावून आणि नष्ट करून बसलो आहोत. 

असो. हे सगळं माझं वैयक्तिक मत असून सगळ्या धर्मांकडे आणि सगळ्या भक्तांकडे मी तितक्याच आदराने आणि श्रद्धेने बघतो. मला प्राचीन, ऐतिहासिक आणि पुरातन काळापासूनच्या वास्तूंमध्ये आणि त्यातल्या खास करून देवळं, मशिदी किंवा चर्चमध्ये जायला खूप आवडतं. एक वेगळीच ऊर्जा किंवा अनुनाद भासतो मला त्या पुरातन, कालीन वास्तूंमध्ये. माझ्या मनात असे विचार येतात की कदाचित त्या शेकडो शतकांपासूनच्या देवस्थानात अनेक शतकांपासून येणाऱ्या करोडो भक्तांच्या प्रार्थना, मंत्रोपचार आणि पॉजिटिव्ह एनर्जी  तिथे दुमदुमत असल्याने ती वास्तू जागृत होत असावी. विज्ञानाप्रमाणे ध्वनीच्या लहरी कधीही नष्ट होत नाहीत. त्या वाहतच राहतात. त्यांची तीव्रता फक्त काळाबरोबर कमी होत जाते. म्हणूनच कदाचित पूर्वीपासून लोक म्हणत आले आहेत, "शुभ बोल नाऱ्या! वास्तु पुरुष तथास्तु म्हणत असतो!"

ती शेकडो वर्षांपासूनच्या पॉजिटिव्ह एनर्जीने जागृत झालेली वास्तू, कदाचित आपल्यासाठी एक पॉजिटिव्ह एनर्जी डाऊनलोड आणि अपलोड करण्याचे एक हब झाली असावी. जिथे आपण प्रार्थना, मंत्रोपचार आणि श्रद्धा, पॉजिटिव्ह एनर्जीच्या स्वरूपात अपलोड करून तिथली शेकडो वर्षांपासूनची जागृत पॉजिटिव्ह एनर्जी आशा आणि आत्मविश्वासाच्या स्वरूपात डाऊनलोड करून निघतो. 

कदाचित ज्या ठिकाणी अनेक वर्षं खूप निगेटिव्ह एनर्जी निनादत असतात, त्या ठिकाणी गेल्यावर आपणही खूप निगेटिव्ह होत असतो. निगेटिव्ह विचार अशा वेळेस आपल्या मनात येत असावेत. कदाचित म्हणूनच काही जुन्या पडीक हवेल्या किंवा घरं आपल्याला भीतीदायक वाटत असतात. भूत, प्रेत अशा कल्पना कदाचित अशाप्रकारेच जन्म घेत असतील. 

अर्थात हे माझे वैयक्तिक काल्पनिक विचार आणि तत्त्वज्ञान आहे. ज्यावर कदाचित फक्त माझाच विश्वास असावा. मला अशा या दृष्टिकोनातून आत्मविश्वास आणि बळ मिळतं. मला अशा या तत्त्वज्ञानातून माझ्या श्रद्धेतून उगवलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मला अशाप्रकारे माझा देव भेटतो. माझे हे वैयक्तिक मत मी माझ्यापुरतेच ठेवतो. कुणावरही मी हे लादण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळे मी आपला खुश आहे आणि मला असं वाटतं की, सगळ्यांनीच जर आपापल्या मनाचे ऐकून एक स्वतःचे मत बनवून ते इतरांवर न लादता, स्वतःपुरतंच ठेवलं तर आपण सगळेच खुश राहू शकतो.  

तर मी आज एका प्राचीन, प्रतिष्ठित आणि प्रख्यात देवस्थानात गेलो. तिथलं बांधकाम, शिल्पकला आणि सगळं वातारवरण बघून थक्क झालो. जसा जसा मी त्या देवस्थानाच्या परिसरात शिरत जात होतो, तशी माझी उत्सुकता आणि कुतूहल वाढत होतं. त्या प्राचीन वास्तूतील बांधकाम, काही बंद दरवाजे, बुजवलेली भुयारं, कोरलेली शिल्पं आणि त्या मागचा सारा इतिहास आणि गोष्टी मला जाणून घ्यायची खूप इच्छा होती. पण मुख्य गाभाऱ्यात असलेल्या समाधीपर्यंत पोहचून दर्शन घेण्याव्यतिरिक्त इतर दुसरीकडे बघण्याची कुणाला अर्थात शुद्धच नव्हती. दर्शन घेणं हे माझेही ध्येय होतंच. पण त्या देवस्थानाच्या भवतालचा परिसर, त्यात दडलेला इतिहास आणि ती सगळी लीला समजून घेऊन मग मुख्य दर्शन घ्यावं असं मला सारखं वाटत होतं. पण तसं कुणी दाखवून आणि समजावून देणारं मला सापडलं नाहीच. 

नदीच्या प्रवाहात सापडल्यावर जसे आपण वाहत जातो तसाच मी त्या देवस्थानाच्या परिसरात पाऊल ठेवल्या ठेवल्या गाभाऱ्यापर्यंत धाडलेल्या प्रचंड लांब रांगेत वाहत गेलो. साधारण एक दोन किलोमीटरचं अंतर व्यापून जेव्हा गाभाऱ्याच्या  अलीकडच्या गृहात मी शिरलो, तेव्हा तिथे कुंपणाने सजवलेली नागमोडी वळणांची तितकीच मोठी रांग होती. हा सगळा व्यवस्था सोपा करण्याचा मानवी खटाटोप जरी असला तरीही त्या संपूर्ण वातावरणात त्या सगळ्या भक्तांची श्रद्धा आणि त्यातून उगवणारा त्यांचा जयघोष यातून एक संसर्गजन्य ऊर्जा उत्पन्न होत होती. त्या ऊर्जेने मी ही तल्लीन होऊन गेलो होतो. त्या तल्लीन आणि मंत्रमुग्ध अवस्थेत ती नागमोडी रांग कधी पार पडली हे कळायच्या आधीच मी गाभाऱ्याच्या उंबऱ्याशी येऊन पोहोचलो. त्या तल्लीन अवस्थेत मला पलीकडे गाभाऱ्यातल्या तेजस्वी मूर्तीचं दर्शन झालं. पण त्या तल्लीन अवस्थेला भंग करणारा एक तीक्ष्ण आवाज अचानक माझ्या कानी पडला. गाभाऱ्यातले दोन भटजी भक्तांवर ओरडून त्यांना सांगत होते, "चला! चला! पटकन माथा टेका आणि पुढे व्हा! वेळ घालवू नका!" असं सारखं सारखं ओरडून भक्तांना पुढे ढकलत होते. मी दुर्लक्ष करायचं ठरवलं. माझं ध्यान मी समाधीवरल्या मूर्तीकडे केंद्रित केलं. मी गाभाऱ्याचा उंबरा ओलांडून आता मूर्ती समोर पोहोचलो होतो. गुडघे टेकून मी हात जोडून मूर्ती समोर बसलो. भटजींचा "चला लवकर दर्शन घ्या!" असा कल्लोळ सुरूच होता. त्या कल्लोळात मला नीट सुद्रतही नव्हतं. समाधी आणि मूर्तीच्या समोरच एक मोठी दान पेटी होती. मी पाकिटातून पैसे काढून दान पेटीत टाकायला गेलो इतक्यात त्यातला एक भटजी अचानक मला संबोधून टोमणा मारू लागला, "बघा! माथा टेकायच्या आधी पैसे काढतायेत! माथा टेक आधी! पैसे काय टाकताय आधी! नंतर टाकायचे असतात पैसे! चला लवकर!" 

माझ्या सहनशीलतेचा आणि संयमाचा मला त्या क्षणी अभिमान वाटला. माझ्या तळपायाची आग मी तळपायातच ठेवली. लक्ष देवाकडेच ठेवून छान दर्शन घेतलं, पैसे पेटीत टाकले, समाधीवर माथा टेकला आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवून बाहेर पडलो. 
मी माझ्या देवाचं दर्शन घेताना मला वाटेल तसं दर्शन घेईन?  आधी नमस्कार करेन किंवा आधी पैसे पेटीत टाकेन किंवा शीर्षासन करून दर्शन घेईन. तुमचा व्यवसाय आणि तुमची व्यवस्था व्यवस्थित चालावी म्हणून भक्तांनी दोन तास रांगेत उभे राहिल्यावर त्यांना तुम्ही अशाप्रकारे दर्शन कसं देऊ शकता?
असो. मी याचा त्या क्षणी फार विचार नाही केला. खरं तर एका भटजींनी आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या चुका माफ करायच्या असतात. पण आज मीच त्या भटजीला माफ केलं. त्रासला असेल बिचारा गरमीने. शेवटी सामान्य माणूसच. 

पण मी माझी पॉजिटिव्ह एनर्जी सोडली नाहीच. शेवटपर्यंत पॉजिटिव्ह राहिलो. मनात थोडी खंत होतीच. हवं तसं दर्शन नव्हतं झालं. मनात त्या मंदिराबद्दलची सगळी उत्सुकता आणि कुतूहल अजूनही तसंच होतं. 
स्वतःचीच समजूत काढत मी मुख्य दाराच्या दिशेने निघालो. थोड्या पावलांच्या अंतरा नंतर मला जाणवलं की, मी चुकीच्या दिशेने चाललो होतो. थांबून आजूबाजूला बघितल्यावर मला एक मळकट सदरा लेहेंगा आणि गमछा घातलेला म्हातारा माझ्याकडे टक लावून बघताना दिसला. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारले, "बाहेर जायचा रस्ता कुठल्या बाजूने?" तो म्हातारा माझ्याकडे बघत सहजपणे म्हणाला, "या... तुम्हाला दाखवतो", असं म्हणून तो म्हातारा मला वाट दाखवत देवस्थानाच्या मुख्य दाराच्या दिशेने घेऊन गेला. वाटेत मला ते बंद दरवाजे, समाधीचं बुजवलेलं भुयार इत्यादी दिसत होतं. मुख्य दारापाशी पोहोचल्यावर मी त्या वयस्कर माणसाचे आभार मानले आणि बाहेरच्या दिशेने निघायला वळलो. वळताक्षणी माझ्या मनात काय आलं कुणास ठाऊक, पण मी पुन्हा आतल्या दिशेला वळलो. तो म्हातारा माझ्याकडे बघत तिथेच उभा होता. न राहावून मी पटकन त्याला विचारलं, "ते समाधीचं बुजवलेलं भुयार तेच आहे ना? तिथे पिंपळा खालचं?" तो म्हातारा गालातच हसला आणि मला म्हणाला, "या... तुम्हाला दाखवतो !"

तो म्हातारा मग मला त्या संपूर्ण देवस्थानाचे दर्शन करायला घेऊन गेला. भुयार, बंद दरवाजे, गुप्त खोल्या, मुर्त्या आणि त्या मंदिराचा संपूर्ण इतिहास त्या माणसाने मला समजावून सांगितला. त्यानंतर त्याने मला पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात नेलं. त्या म्हाताऱ्याला बघून तिथले दोन ओरडणारे भटजी आदराने उठून उभे राहिले. त्या वयस्कर माणसाने मला तिथे बसवून निवांत दर्शन घेऊन दिलं. पाच मिनिटं मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही दोघे तिथून बाहेर पडलो. मग पुन्हा मुख्य दारापाशी येऊन त्या वयस्कर माणसाने मला सोडलं. मी त्यांचे खूप खूप आभार मानले आणि निघायला वळलो. तेवढ्यात माझ्या मनात आलं की त्यांचा फोन नंबर जर आपण घेतला तर पुढच्या वेळेस आपण दर्शन घ्यायला येऊ तेव्हा त्यांची मदत होऊ शकेल. त्यांना विचारायला मी लगेच आतल्या बाजूला पुन्हा वळलो. पण तो मळकट सदरा लेहेंगा आणि गमछा घेतलेला म्हातारा मला दिसलाच नाही. त्यांचं नावही मी विचारायला विसरलो होतो. त्यांना खूप शोधलं पण ते कुठेच सापडले नाहीत. 

मला सतत वाटत होतं की, त्यांनी मला ओळखलं असावं, म्हणूनच माझी मदत केली असणार. पण त्यांच्या चालण्या बोलण्यातून असं कुठेच आढळत नव्हतं की त्याने कधी सिनेमा किंवा टी.व्ही. बघितला असावा.... 
मी सुरुवातीला जसं म्हणालो तसंच आताही म्हणतो. मी श्रद्धाळू जरी असलो तरी मी खूप देव देव करणाऱ्यातला नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा व्यवसाय करणाऱ्यांकडे मी घृणेच्या भावनांनी बघतो. पण एक गोष्ट नाकारता येत नाही की विज्ञानाची प्रगती होऊन फक्त २०० वर्षंच लोटली आहेत. अजून खूप संशोधन व्हायचे बाकी आहे आणि होणार आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे आज नाही आहेत, ती उद्या नक्कीच असतील. पण ती उत्तरं सापडेपर्यंत आपण मात्र पॉजिटिव्ह राहूया आणि पॉजिटीव्ह बोलत राहूया. "वास्तु पुरुष तथास्तु म्हणत असतो!"   
  
- आदिनाथ कोठारे 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :