कलाकारास इंडस्ट्रीपेक्षा व्यासपीठ महत्त्वाचे : नम्रता गायकवाड

कुठलाही कलाकार त्याच्यातील अभिनय क्षमता दाखविण्यासाठी व्यासपीठाचा शोध घेत असतो. त्यातच तुमच्यात मेहनत आणि जिद्द असेल तर तुम्हाला हे व्यासपीठ उपलब्धही होते.

कलाकारास इंडस्ट्रीपेक्षा व्यासपीठ महत्त्वाचे : नम्रता गायकवाड
Published: 01 Apr 2017 03:35 PM  Updated: 01 Apr 2017 03:36 PM

कुठलाही कलाकार त्याच्यातील अभिनय क्षमता दाखविण्यासाठी व्यासपीठाचा शोध घेत असतो. त्यातच तुमच्यात मेहनत आणि जिद्द असेल तर तुम्हाला हे व्यासपीठ उपलब्धही होते. त्यासाठी भाषेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागतो. असाच काहीसा प्रवास मराठमोळी अभिनेत्री नम्रता गायकवाड हिने केला आहे. मराठीत नाटक, चित्रपट केल्यानंतर तिने थेट मल्याळम इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तिच्या आगामी ‘अयाल जिवीचीरीपुंड’ या मल्याळम् चित्रपटानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : मल्याळम चित्रपटाचा प्रवास कसा सांगशील?
-खरं तर मी कधी विचारच केला नव्हता की मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल. फेसबुकवर मी बरेच फोटो अपलोड करीत असते, फेसबुकवरून माझे फोटो बघून मला फोन आला, एक तर या भाषेविषयी मला कसलाच गंध नव्हता, सर्वसामान्य व्यक्तीला जितकी माहिती असते तितकीच माहिती मला या भाषेविषयी होती. त्यामुळे मी त्यांना अगोदरच सांगितले होते की मला या भाषेविषयी माहिती नाही. खरंतर या आधीसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटांसाठी असे फोनकॉल्स मला आले होते, पण मी बºयाचदा नकार देत गेले. त्याचे कारण असे की, फोटो बघून कोणी कोणाला अभिनयाची संधी देत असतो का? पण या चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास सगळ्या गोष्टी जुळून येत गेल्या. 

प्रश्न : मल्याळम भाषेत काम करीत असताना तुला काही भाषिक अडचणी आल्या का?
- दक्षिण भारतातील मल्याळम ही सगळ्यात अवघड भाषा आहे. ही भाषा पटकन कळत नाही. तमीळ आणि तेलगू त्या माहोलमध्ये गेल्यानंतर थोड्याफार प्रमाणात कळते; पण तसं मल्याळम भाषेचं नाही. त्यामुळे जाताना हाच विचार यायचा की जमेल न मला सगळं? होईन ना माझं पाठांतर? नाही जमलं तर? असे असंख्य प्रश्न घेऊन मी साउथला गेले. वास्तविक तिकडे हिंदी कुणालाही येत नाही आणि इंग्लिश येणारी अगदी थोडी माणसं भेटली; हा अजून एक धक्काच होता. पहिल्याच दिवशी माझे इंग्लिश डायलॉग होते; त्यामुळे जरा बर्डन कमी होतं. दुसºया दिवशी माझे मल्याळम डायलॉग होते, पण पहिल्या दिवशी माझी सगळ्यांशी झालेली ओळख त्यामुळे मी बºयापैकी रिलॅक्स होते अन् आत्मविश्वासही थोडा वाढलेला होता. दिग्दर्शक, कॅमेरामन यांनी सगळ्यांनीच खूप सांभाळून घेतलं. त्यामुळे सगळं काही जमत आहे. 

प्रश्न : मराठी आणि मल्याळम चित्रपटात काम करताना कामाच्या पद्धतीत काय फरक जाणवला?
-तांत्रिकदृष्ट्या मल्याळम चित्रपट इंडस्ट्री अधिक मजबूत असल्याचे जाणवले. आपल्याकडे कॅमेरा वापरण्याची पद्धत आणि तिकडची पद्धत वेगळी आहे. खूप पद्धतशीरपणे काम केले जाते, ज्यावेळेला शूटिंग सुरू होणार असेल त्याचवेळेस सुरू होते अन् पॅकअपही वेळेनुसारच केले जाते. कलाकार पूर्ण दिवस आपल्याबरोबर आहे म्हणून वेळ असेल तर दुसरा एखादा सीन किंवा मोन्टाज करणे हा प्रकार इथे मला दिसला नाही. ज्या दिवशी माझा एकच सीन असायचा तितकाच व्हायचा. शूटिंग चालू असताना काम एकदम शांततेत चालायचं, कुठे आरडाओरडा नाही की अपशब्दांचा मारा नाही. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित व्हायचं. 

प्रश्न : अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली? 
-पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर एका नाटकाची आॅफर आली होती, नाटकाचे दिग्दर्शक अशोक समेळ हे माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. खरंतर आईने फोर्स केला, बाबांनी पण होकार दर्शविला आणि ‘ज्ञानोबा माझा’ या व्यावसायिक नाटकातून मी अभिनयास सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्र गोवा या ठिकाणाहून नाटकांचे दौरे झाले. नाटक करीत असताना अभिनयात परिपक्वता येत गेली. त्याचबरोबर आत्मविश्वास निर्माण झाला. मग, इतर ठिकाणी आॅडिशन देण्यास सुरुवात केली. पुढे मला ‘मंगळसूत्र’ ही मालिका मिळाली. अभिनेत्री अलका कुबल यांनी त्या मालिकेसाठी माझी निवड केली होती. पुढे मी ‘स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे’, ‘वंशवेल’ या चित्रपटांमध्ये काम केले. 

प्रश्न : पहिलं प्रेम कोणतं? अभिनय की भरतनाट्यम?
-अर्थातच पहिलं प्रेम अभिनय आहे. कारण भरतनाट्यम मी लहानपणी आठवीत असताना शिकले. त्याचा मला आता फायदाच होत आहे. अभिनय आणि नृत्य ही एकमेकांची पूरक बाजू आहे. कारण अभिनय करताना नृत्य कौशल्य असेल तर त्याचा फायदाच होतो. वास्तविक मी अभिनय क्षेत्रात येईल, याचा विचार केला नव्हता. परंतु मागे वळून बघितल्यास शालेय जीवनापासून अभिनयाची वाटचाल सुरू झाल्याचे आज जाणवते. भरतनाट्यम् शिकले नसते तर कदाचित कलेविषयीची आवड निर्माण झाली नसती. 

प्रश्न : भविष्यात मराठी, हिंदी, मल्याळम इंडस्ट्रीपैकी कुठे काम करायला आवडेल? 
- खरं सांगायचं म्हणजे या क्षेत्रात स्थिरत्व नाही. आज जर मी मल्याळम चित्रपटात काम करीत असेल तर उद्या मी याच इंडस्ट्रीमध्ये करिअर करणार असे नाही. कदाचित भविष्यात मला मराठी किंवा दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही संधी मिळू शकेल. वास्तविक कलाकाराने प्रत्येक संधीकडे सकारात्मकरीत्या बघायला हवे, असे मला वाटते. 

RELATED ARTICLES


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :