सिनेमांच्या विषयावरुन होणारा वाद हा बकवासपणा - सुषमा देशपांडे

राज्यातील महिला संतांच्या योगदानावर आधारित ‘संगीत बया दार उघड’ हे नाटकही त्यांनी रंगभूमीवर आणलं. त्यांची भूमिका असलेली एकपात्री नाटकं सातासमुद्रापारही गाजली. अत्याचार या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती. लवकरच त्यांची प्रमुख भूमिका असलेला आजी (AJJI) हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

सिनेमांच्या विषयावरुन होणारा वाद हा बकवासपणा - सुषमा देशपांडे
Published: 20 Nov 2017 12:12 PM  Updated: 19 Dec 2017 10:58 AM

‘थिएटर विद कमिटमेंट’ या वाक्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून अभिनेत्री सुषमा देशपांडे यांच्याकडे पाहिलं जाते. विविध सिनेमा आणि नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘व्हंय मी सावित्रीबाई’ या त्यांच्या एकपात्री नाटकाचे प्रयोग राज्यभर झालेत. राज्यातील महिला संतांच्या योगदानावर आधारित ‘संगीत बया दार उघड’ हे नाटकही त्यांनी रंगभूमीवर आणलं. त्यांची भूमिका असलेली एकपात्री नाटकं सातासमुद्रापारही गाजली. अत्याचार या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती.लवकरच त्यांची प्रमुख भूमिका असलेला आजी (AJJI) हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.   
 
आजी (AJJI) या सिनेमात आपण भूमिका साकारताय.या सिनेमा विषयी जाणून घ्यायला आवडेल?
 
आजी (AJJI) हा सिनेमा एक हिंदी सिनेमा असून विविध पुरस्कार सोहळ्यात त्याला गौरवण्यात आले आहे. या सिनेमाच्या कथेला मराठी बॅकड्रॉप आहे. या सिनेमात एका आजीची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या कथेचा विषय डार्क आहे. आजी आपल्या नातीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा सूड कसा उगवते हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सिनेमात वापरण्यात आलेल्या भाषेचा लहेजाही खूप वेगळा आहे. यातील हिंदीचा रिदमच खूप वेगळा आहे.
 
या सिनेमाला विविध पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. तरीही सिनेमाविषयी फार काही ऐकायला मिळत नाही. याचं काय कारण असावं असं आपल्याला वाटतं ?

 
सिनेमाची चर्चा नाही, थंड प्रमोशन याचं उत्तर देणं खरं तर खूप कठीण आहे. मूळात या सिनेमात कोणताही बडा स्टार नाही. ना आमिर आहे ना सलमान आहे. माझ्या मते या सिनेमाचा खरा हिरो या सिनेमाचा दिग्दर्शक देवाशिष मखीजा हाच आहे. कोणताही सिनेमा हा कलाकारांपेक्षा दिग्दर्शकाच्या नावाने ओळखला जावा. त्याला सिनेमाचं संपूर्ण श्रेय मिळायला हवं अशी माझी ठाम भूमिका आहे. देवाशिषचा हा तसा पहिलाच सिनेमा आहे. याआधीही त्याने एक सिनेमा केला आहे. मात्र त्याची फारशी चर्चा झाली नाही.
 
या सिनेमाच्या निमित्ताने तुमचं आणि दिग्दर्शक देवाशिषचं ट्युनिंग असल्याचं तुम्हाला जाणवलं असं आम्ही ऐकलंय त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.शिवाय हा सिनेमा का करावा वाटला?
 
खरं पाहायला गेलं तर मी इतकी क्रेझी नाही. देवाशिषला कुणीतरी माझं नाव सुचवलं आणि त्यानंतर त्याने मला फोन केला. त्यावेळी उडत उडतच त्याचं ते सगळं बोलणं ऐकून घेतलं. त्यावेळी त्याने तुम्हाला माहिमला घ्यायला गाडी पाठवतो असं सांगितलं. बोलल्याप्रमाणे त्यानं गाडी पाठवली आणि त्यावेळी त्याला भेटले. तेव्हा मी कोणतंही ऑडिशन दिलं नाही, ना लूक टेस्ट दिली. कारण देवाशिषनं स्वतःच माझ्याबद्दल बराच रिसर्च केला होता. माझ्या आधीच्या नाटकाचे प्रयोगापासून सगळं सगळं त्याने पाहिले होते. दिग्दर्शक म्हणून त्याने बारकाईने केलेला अभ्यास पाहून मीच आश्चर्यचकीत झाले. नवल आणखी एका गोष्टीचा वाटलं ते म्हणजे त्याला मी म्हटलं की मी एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि या कामासाठी वर्कशॉप लागतील. तोही त्यावेळी म्हणाला की वर्कशॉपशिवाय कोणतंच काम करत नाही. आम्ही एकमेकांना याआधी कधीही भेटलो नव्हतो. मला त्याच्याविषयी माहिती नव्हतं. तरीही आमचे बरेच विचार जुळत होते. तो नेहमी म्हणतो की आपलं काही तरी आधीचं नातं असेन त्यामुळेच आपले विचार इतके जुळतात. मला खरंच कल्पना नव्हती की हा सिनेमा मी करेन. मात्र एका नकार देणा-या सिनेमाला होकार दिला हे माझ्यासाठी खरंच सरप्राईज होतं.
 
महिला अत्याचारासारख्या घटना दिवसेंदिवस वाढतायत.कायदे होऊनही काही बदल झाला असं जाणवतं नाही. नेमकं काय केल्यानं अशा घटनांना आळा बसेल असं आपल्याला वाटतं?
 
 
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना आपली व्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे. मला हवं ती मिळालंच पाहिजे ही पुरुषी भावना मोडून काढायला हवी. काही दिवसांपूर्वी नागपुरातील एक घटना कानावर पडली. त्यावेळी तक्रारदार पोलीस स्टेशनला गेले. त्यावेळी पोलीस म्हणाले की बलात्कार झाल्यावर तक्रार करायला या. ही जी वृत्ती आहे ती राजकीय चौकट जपणारी आहे. नको त्या राजकारणाचे परिणाम समाज भोगतोय. आपल्याकडे व्यवस्था नावाची प्रशासकीय व्यवस्था चालते त्या राजकारणात क्रांती होणं अत्यंत गरजेचं आहे. मुळात स्त्रीच्या नजरेने जग बघता आलं पाहिजे.
 
 
सध्या प्रत्येक सिनेमा कोणत्या ना कोणत्या वादात सापडतो आहे.वाढती राजकीय सेन्सॉरशिप आणि तथाकथित संस्कृती-परंपरा रक्षकांमुळे चांगले सिनेमा वादात अडकतायत.यावर आपलं काय मत आहे?
 

 
सेन्सॉरशिप आणि वाद जे काही सुरु आहे ना तो सगळा बकवास प्रकार सुरु आहे असं मला वाटतं. सेन्सॉर काहीही निर्णय घेवो, लोकांच्या नजरा काय बंद झाल्या आहेत का ? एखाद्या शब्दावरुन उगाच आक्षेप घेतला जातो तो बालिशपणा वाटतो. खरंच असे वाद आणि या सगळ्याची गरज आहे का ? उडता पंजाबसारख्या सिनेमावेळी सेन्सॉर मनमानी करतं तेही तितकंच त्रासदायक आहे. पद्मावती सिनेमाच्या वादाबाबतत बोलायचं झालं तर या सगळ्याची आता संजय लीला भन्साळीलाही सवय झाली असावी. काहीही करण्याचं स्वातंत्र्यच राहिलेलं नाही.
 
 
आजवर आपण विविध नाटकांत भूमिका साकारल्या आहेत.सिनेमातही काम केलं आहे. मात्र टीव्हीपासून आपण दूर आहात. हा ठरवून केलेला प्रयत्न आहे का?
 
 
 
मी टीव्हीवर काम केलं नाही याचा अर्थ असा नाही की टीव्हीवर काम करायचंच नाही. एखादा चांगला विषय आला तर नक्कीच करेन. टीव्हीवरील ब-याच ऑफर्स येतात. मात्र भूमिका आवडली नाही की सरळ तारखा नसल्याचे सांगून टाकते. जेव्हा एखादी मनाला भावेल अशी उत्तम भूमिका येईल तेव्हा ती नक्की करायला आवडेल. मार्केटिंग ओरिएंटेड काम करण्यात मला तरी बिल्कुल स्वारस्य नाही. आपल्याला जे जमतं ते करत राहिन.
 
 
आगामी काळातील आपल्या प्रोजेक्ट्स आणि कामाबद्दल जाणून घ्यायला आवडेल?
 
 
व्यावसायिक नाटक करण्याची माझी इच्छा आहे. घटस्फोटित तरुणावर एक नाटकही लिहिलंय, मात्र निर्माताच मिळत नसल्यानं सगळं अडलं आहे. निर्माता मिळणं खूप कठीण आहे. जेव्हा निर्माता मिळेल तेव्हा हे नाटक रंगभूमीवर आणणार आहे.अजून बरीच चांगली कामं करायची आहेत. ग्रामीण पत्रकारिता, बचतगटांच्या महिलांसोबतही काम करायचं आहे.
 

RELATED ARTICLES


कपिल शर्माचा छोट्या पडद्यावरील कमबॅक हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :