‘राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत झळकायचंय!’ - सुरूची आडारकर

साधा, सोज्वळ, मनमिळाऊ अशा स्वभावाची सुरूची नाटक, मालिका, चित्रपट असा यशस्वी प्रवास करत आहे. ‘नारबाची वाडी’,‘मात’,‘आता बाटली फुटली’ अशा मराठी चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.

‘राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत झळकायचंय!’ - सुरूची आडारकर
Published: 08 Jun 2017 05:51 PM  Updated: 09 Jun 2017 05:42 PM

अबोली कुलकर्णी

‘आदिती’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सुरूची आडारकर ‘अंजली’ या नव्या मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. साधा, सोज्वळ, मनमिळाऊ अशा स्वभावाची सुरूची नाटक, मालिका, चित्रपट असा यशस्वी प्रवास करत आहे. ‘नारबाची वाडी’,‘मात’,‘आता बाटली फुटली’ अशा मराठी चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. ‘काम हीच पूजा’ मानणाऱ्या  सुरूचीने ‘सीएनएक्स मस्ती’ सोबत असा दिलखुलास संवाद साधला....

प्रश्न : ‘आदिती’ या भूमिकेने तुला नाव, ओळख मिळवून दिली, आता तुला कसं वाटतंय?
- ‘आदिती’ या व्यक्तिरेखेमुळे मी घराघरांत पोहोचले, याचा मला आनंदच आहे. खरं तर, एखादी मालिका सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी टीमवर्क लागते, ते आमच्या टीममध्ये अनुभवायला मिळायचे. ‘आदिती’ची मालिका संपल्यानंतर मला प्रत्येकजण विचारायचे की, मालिका का बंद केली? खुप छान होती. त्यानंतर मला वेगळ्या कथानकाच्या मालिकेत काम करण्याची इच्छा होती. ती ‘अंजली’ या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. 

प्रश्न: ‘अवघा रंग एकची झाला’ या व्यावसायिक नाटकापासून तू सुरूवात केलीस, नंतर तू मालिकांमध्ये व्यस्त झालीस, आता जर नाटकाची आॅफर आली तर तुला करायला आवडेल का?
- होय नक्कीच. नाटकांत काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नच असतं. ‘अवघा रंग एकची झाला’ नंतर मी ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटक केलं होतं. त्यानिमित्ताने दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळते. त्याचबरोबर चित्रपट, मालिका, नाटक माध्यम कुठलंही असो, मला फक्त चांगलं काम करायला आवडतं. प्रेक्षकांसमोर मी योग्य तेच प्रेझेंट करायला हवे, एवढंच मला वाटतं.

प्रश्न : भूमिकांची निवड करताना तू कोणत्या गोष्टींची काळजी घेतेस?
- अगोदरच्या भूमिकेपेक्षा काही वेगळी व्यक्तिरेखा आहे का? नव्या व्यक्तिरेखेत काही चॅलेंजिंग आहे का? याची फक्त मी काळजी घेत असते. प्रेक्षकांसमोर मी एका नव्या रूपात जातेय तर त्यांना ती भूमिका आवडेल का? हे पाहते. आत्तापर्यंत मिळालेल्या भूमिकांमधून मी काही ना काही शिकतच असते. त्यामुळे यासाठी मी निर्माते मंडळींची आभारीच आहे. 

प्रश्न : ‘अंजली’ आणि ‘सुरूची’ मध्ये काय साम्य आहे? 
- माझी मालिकेतील अंजली ही व्यक्तिरेखा डॉक्टर असून आमच्यात केवळ एकच साम्य आहे. अंजली ही लोकांना मदत करणारी आहे. खुप इमोशनल आहे. कुठल्याही व्यक्तीला लवकर आपलसं करण्याची तिच्यात क्षमता आहे. माझंही तसंच आहे. एखादी गोष्ट करताना थोडीशी जरी मदत करायला मिळाली तरी मला खूप छान वाटतं. 

प्रश्न :  ‘अंजली’ या व्यक्तिरेखेसाठी तुला काही खास तयारी करावी लागली का?
- होय, अगदीच. आमच्या प्रोडक्शन टीमने सेटवर काही डॉक्टर्सचे सेशन्स ठेवले होते. जेणेकरून आम्ही पडद्यावर काही वेळाकरिता तरी डॉक्टर वाटलो पाहिजेत. कारण डॉक्टरांची ड्यूटी काही सोपी नसते. आपण साधं कुणाला रक्त आलं तरी पाहू शकत नाही, त्यांना तर आॅपरेशन्स करावे लागतात. त्यामुळे मला डॉक्टरांचा खुप आदर आहे. डॉक्टरांची भूमिका करत असताना आपल्याकडून काही चुकीचा संदेश जाऊ नये, एवढीच खबरदारी मी घेत असते. 

प्रश्न :  चित्रपट आणि मालिका यांच्यामध्ये तुला काय फरक जाणवतो?
- चित्रपट, मालिका, नाटक हे तिन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत. मालिका तुम्हाला घराघरात पोहोचवते. चित्रपट, नाटकही मला करायला आवडतील. मला केवळ थीम चांगली असावी एवढंच वाटतं. आयुष्यभर चांगल्या भूमिकांमधून लोकांचे मनोरंजन करायला मला नक्की आवडेल. 

प्रश्न : तुझा ड्रीम रोल काय आहे? 
- राणी लक्ष्मीबाई आणि शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत कुठल्याही भूमिका करायला मला आवडतील. ऐतिहासिक घटना, इतिहास यांच्याबद्दल मला विलक्षण प्रेम, उत्सुकता आहे. 

प्रश्न :  ‘वुमन एम्पॉवरमेंट’ या उपक्रमाअंतर्गत तू सक्रिय सहभाग नोंदवला आहेस, त्याविषयी काय सांगशील? 
-जागृती ग्रुपतर्फे राबवला जाणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. ‘साद स्वत:ला, स्वत:ची’ अशी या उपक्रमाची टॅगलाईन आहे. खरंतर सध्याच्या महिला या त्यांचे जॉब, घरगुती कामे यांच्यात एवढी व्यस्त आहेत की, त्यांना स्वत:साठीच वेळ नाही. त्यामुळे ‘ती’ने स्वत:साठी वेळ काढावा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील त्या तुम्ही करा म्हणजे तुमचे कुटुंबही तुम्हाला सपोर्ट करेल. 

प्रश्न : ‘तथास्तु’ चित्रपटात तू संजय दत्त यांच्यासोबत काम केलं आहेस. आता जर तुला एखाद्या मोठ्या स्टारसोबत काम करायला मिळालं तर ते कुणासोबत करायला आवडेल?
- मी कलाकारांचं कधीच वर्गीकरण करत नाही. कारण, असं कधीच होत नाही की, एखादा कलाकार इंडस्ट्रीत आला आणि स्टार झाला. त्याच्या स्टार होण्यामागे त्याची खुप मोठा स्ट्रगल असतो. पण, हो मला संधी मिळाली तर शाहरूख खानसोबत काम करायला निश्चित आवडेल. कारण त्याची जर्नी मला खुप प्रेरणा देते.

प्रश्न :  तु एक उत्तम व्हॉलीबॉल प्लेयर आहेस. क्रिडा क्षेत्रात करिअर करावं असं तुला वाटलं नाही का? 
- मी शाळेत असल्यापासूनच खुप क्रिएटिव्ह होते. जिल्हा पातळीपर्यंत मी शाळेला व्हॉलीबॉल या कॅटेगरीत रिप्रेझेंट केलं आहे. पण, संधी मिळत गेली आणि मी अभिनय क्षेत्राकडे वळले. 


राणी मुखर्जीचा हिचकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :