‘आवली’ची भूमिका जगतेय - ऋजुता देशमुख

कलर्स वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ या संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यावर आधारित मालिकेत ती ‘आवली’च्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने आत्तापर्यंत टीव्ही, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या पातळ्यांतून तिची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे.

‘आवली’ची भूमिका जगतेय - ऋजुता देशमुख
Published: 30 May 2017 07:09 PM  Updated: 30 May 2017 07:11 PM


अबोली कुलकर्णी 

कपाळावर मोठ्ठं कुंकू, हातात भरगच्च हिरव्या बांगड्या, नऊवार साडी, डोक्यावर पदर असा साधा पण ग्रामीण पेहराव अभिनेत्री ऋजुता देशमुख ही आवलीच्या भूमिकेतून जगते आहे. कलर्स वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ या संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यावर आधारित मालिकेत ती ‘आवली’च्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने आत्तापर्यंत टीव्ही, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या पातळ्यांतून तिची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. मराठी, तेलुगू चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरही अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून नावलौकिक कमावला आहे. ती सध्या करत असलेल्या आवली या भूमिकेविषयीचा तिचा प्रवास तिच्याच शब्दांत....

* ‘तू माझा सांगाती’ मधील आवलीच्या भूमिकेविषयी काय सांगशील? 
- होय, मी तुकाराम महाराजांच्या पत्नीची म्हणजेच आवलीची भूमिका साकारते आहे. मला ही व्यक्तिरेखा अत्यंत मनापासून आवडली. अत्यंत वेगळी पण आव्हानात्मक अशी ही भूमिका आहे. कजाग, चिडचिडी असलेल्या आवलीचाही काही दृष्टीकोन असू शकतो, हे ती सतत दाखवून देत असते. ही भूमिका करत असताना मला सेटवर सर्वांनी खूप सांभाळून घेतलं. चुलीजवळ बसणं, ग्रामीण भाषेतून बोलणं, जुन्या काळातील स्त्री व्यक्तिरेखेतून रेखाटणं हे सर्व करताना मला ‘आवली’ मुळे करायला मिळतेय. 

*  वारकरी संप्रदायाची कथा आता मालिकेत उलगडणार आहे, त्याविषयी काय सांगशील?
- सध्या ‘तू माझा सांगाती’ मध्ये वारकरी संप्रदायावर आधारित तुकाराम गाथा सुरू करण्यात आली आहे. यात तुकाराम महाराज हे वेगवेगळया कथा सांगताना दिसत आहेत. या कथांचा परिणाम आवलीवरही होणार आहे. त्याचबरोबर आपण काय वाचावे, काय वाचू नये हे सर्व प्रेक्षकांनाही या माध्यमातून कळणार आहे. ही तुकाराम गाथा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, यात काही शंकाच नाही. 

* आवलीच्या भूमिकेतून तुला काय शिकायला मिळालं? तुझ्यात आणि आवलीमध्ये नेमकं काय साम्य आहे?
- आवली आणि माझ्यात काहीच साम्य नाही. पण, हो हे मात्र नक्की की, तिच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. त्याकाळी तुकाराम महाराजांनी तिला पत्नी म्हणून दिलेलं स्वातंत्र्य खरंच कौतुकास्पद आहे. चारचौघांत तिला बोलण्याचा, तिचं मत मांडण्याचा अधिकार त्यांनी तिला दिलाय. मुलं आणि नवरा यांच्याबाबतीत ती एकदम खमकी आहे. त्यांच्याबद्दल कुणीही अपशब्द उच्चारले तर ती ते सहन करू शकत नाही. अनेकदा महाराज घरातून निघून जातात. त्यांना परत संसारात आणण्यासाठी तिचा सुरू असलेला आटापिटा खरंच शिकण्यासारखा आहे. 

* सहकलाकारांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
 - नक्कीच खुप चांगला. मी अशातच मालिकेत सर्वांना जॉईन केलं आहे. पण, सेटवर सर्वांनीच मला खुप सांभाळून घेतलं. मी याअगोदरही चिन्मयसोबत काम केलं आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच स्पेशल असतो. माझ्या बोलण्यातून शहरी टोन येऊ नये, जास्तीत जास्त ग्रामीण भाषेचा लहेजा मी कशी सांभाळते? याकडे लेखकापासून ते दिग्दर्शकांपर्यंत सर्वांचेच लक्ष असायचे. त्यामुळे आता खुप मजा येतेय. 

* ‘सेल्फी’ या नाटकानंतर तूझा नाटकांत काम करण्याचा विचार आहे का?
- होय. प्रत्येक मराठी कलाकाराची सुरूवातच नाटकांपासून होते. नाटकांत काम करणं त्याला मनापासून आवडत असतं. त्यामुळे कलाकार फक्त आॅफरचीच वाट पाहत असतो. ‘सेल्फी’ या नाटकाचे माझे प्रयोग अजूनही सुरूच आहेत. पण, अजून तरी कुठल्या नाटकाची आॅफर मला आलेली नाहीये. आॅफर जर आली तर नक्कीच मला नाटकांत काम करायला आवडेल. 

* महिलाकेंद्रित चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली तर कोणत्या विषयासंदर्भात तुला चित्रपट करायला आवडेल?
- एकतर ग्रामीण भागात आजही स्त्रीभ्रूणहत्या खुप मोठ्या प्रमाणावर केली जाते. ‘मुलगाच हवा’असा हट्ट त्या पालकांचा असतो. त्यामुळे मुलींच्या जन्माचा घटता दर खुप चिंतेची बाब आहे. दुसरे म्हणजे शहरांत मुलींवर होणारे बलात्कार, अन्याय, अत्याचार, छेडछाड यांच्यावर आधारित एखाद्या चित्रपटांत काम करून समस्येला वाचा फोडता येईल. 

*  तुझा ड्रीम रोल काय आहे?
- असं अगदीच काही नाही. मी माझ्याकडे आलेल्या भूमिकेला योग्य न्याय देतेय की नाही? याकडे माझे नेहमी लक्ष असते. माझ्या वाट्याला आलेले काम मी किती चोखपणे करते यावर मी लक्ष देते. माझ्या प्रेक्षकवर्गाला मी नाराज तर करत नाही ना? हाच एक विचार माझ्या डोक्यात असतो. आपण केलेली भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटली पाहिजे, असे आपण काम केले पाहिजे. 

*  तू बिग बींसोबत काम केलं आहेस. त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
- मी म्हणेन की, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा ‘दैवी’ होता. आम्ही जवळपास ४-५ दिवस एकत्र काम के लं असेल पण, त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. सेटवर वेळेवर येणं, कामाबाबतीत शिस्त बाळगणं हे मी त्यांच्याकडून शिकले. सेटवर ते काम करत असताना लांब उभे राहून केवळ त्यांचं काम पाहत राहाणं यातच खुप मोठ्ठं यश सामावलेलं आहे. 

* वेबसीरिजमध्ये काम करायला आवडेल का?
- हो नक्कीच. कलाकारांसाठी जे वेगवेगळे प्रकार इंडस्ट्रीत दाखल होत असतात, ते प्रत्येक कलाकारांनी आत्मसात करायला हवेत. मला जर तशी संधी मिळाली तर नक्कीच मी वेबसीरिजमध्ये काम करेन. 

*  तुझे आगामी प्रोजेक्टस काय आहेत?
- आत्ता तरी काही नाही. मी सध्या ‘तू माझा सांगाती’ या मालिकेवर लक्षकेंद्रित केले आहे. त्यामुळे माझा संपूर्ण वेळ हा याच मालिकेसाठी मी देत आहे. 


राणी मुखर्जीचा हिचकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :