या कारणामुळे छोट्या पडद्यापासून दूर राहाणे पसंत केले होते - उपेंद्र लिमये

नगरसेवक या चित्रपटात उपेंद्र लिमये एका प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटासोबतच सध्या तो नकुशी या मालिकेत काम करत आहे. त्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत जोगवा, यल्लो यांसारख्या मराठी चित्रपटात तर पेज थ्री, चांदनी बार यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकरल्या आहेत

या कारणामुळे छोट्या पडद्यापासून दूर राहाणे पसंत केले होते - उपेंद्र लिमये
Published: 23 Mar 2017 05:28 PM  Updated: 23 Mar 2017 05:34 PM

उपेंद्र लिमयेने जोगवा, यल्लो यांसारख्या मराठी चित्रपटात तर पेज थ्री, चांदनी बार यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकरल्या आहेत. त्याचा नगरसेवक हा चित्रपटाला 31 मार्चला प्रदर्शित होत आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

नगरसेवक या नावावरून हा चित्रपट एक राजकियपट असल्यासारखे वाटत आहे. तू या चित्रपटाविषयी काय सांगशील?
हा चित्रपट नावावरून राजकियपट वाटत असला तरी तो राजकियपट नाहीये. सर्वसामान्य कार्यकर्त्याची खदखद या चित्रपटातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नेते आपल्या स्वार्थासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याचा वापर करतात, पण त्यांचा स्वार्थ संपला की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. असाच एक कार्यकर्ता चिडून उठतो आणि नगरसेवक या पदापर्यंत पोहोचतो अशी या चित्रपटाची कथा आहे. हा एक तद्दन कमर्शिअल सिनेमा आहे. या सिनेमात रोमान्स, मारामारी सगळे काही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तू आतापर्यंत अनेक ऑफ बीट चित्रपटांमध्ये काम केले आहेस, तू कमर्शिअल सिनेमाकडे कसा वळलास?
मी ऑफबीट सिनेमांमध्ये काम करत असल्याने त्याच भूमिकांसाठी मला ओळखले जात असे. पण या सगळ्यातून बाहेर पडून मला एखादा कमर्शिअल सिनेमा करायचा होता. त्यामुळे मी नगरसेवकची निवड केली. मी याआधी देखील प्यार वाली लव्ह स्टोरी या चित्रपटात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आलो होतो. एक कलाकार म्हणून एकाच साच्यातील भूमिका करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची गरज आहे असे मला वाटते. कोणत्याही भूमिकेचा शिक्का कलाकार म्हणून तुमच्यावर बसणे योग्य नाही असे मला वाटते. 

तू कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहेस, अनेक वर्षं छोट्या पडद्यापासून दूर राहाण्याचे कारण काय होते?
मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण पेज 3 या चित्रपटानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या. हिंदी, दाक्षिणात्य अशा अनेक सिनेमांमध्ये मला काम करण्याची संधी मिळत असल्याने मी काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहाण्याचे ठरवले. दरम्यानच्या काळात हिंदी, दाक्षिणात्य, मराठी चित्रपटात मी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. चित्रपटात व्यग्र असताना मला मालिकांच्या ऑफर येत होत्या. पण मालिकांमध्ये दाखवला जाणारा बटबटीतपणा मला पटत नव्हता. त्यामुळे मी छोट्या पडद्यापासून अनेक वर्षं दूर राहिलो. पण मी सध्या करत असलेल्या मालिकेचे कथानक मला भावल्याने मी मालिकेत काम करण्याचे ठरवले.

तू नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहेस. या तिन्ही माध्यमांमध्ये कोणते माध्यम तुला अधिक भावते?
नाटक, चित्रपट, मालिका या तिघांमध्ये तुलना केलेलीच मला आवडत नाही. तिन्ही माध्यमं ही एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. प्रत्येक माध्यमांमध्ये कथा सांगण्याची पद्धत ही केवळ वेगळी असते. चित्रपट अथवा नाटकात तुम्हाला कथा ही केवळ दोन ते अडीज तासात सांगायची असते. तेच मालिकेत कथा तुम्ही विस्तारीतपणे सांगू शकतात. तिन्ही माध्यमात अभिनयच करायचा असला तरी तिन्ही माध्यमांची बलस्थाने ही वेगवेगळी आहेत. 

तू दाक्षिणात्य सिनेमामध्येदेखील काम केले आहेस, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला आहे. तेथील प्रेक्षकांचे त्यांच्या चित्रपटांवर खूप प्रेम आहे. तेथील इंडस्ट्रीमधील लोक खूप प्रोफेशनल असतात. दिलेल्या वेळा पाळणारे असतात. तिथला चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा मी येथे आवर्जून सांगेन, मी दक्षिणेत एक चित्रपट करत होतो. चेन्नईत आमचे चित्रीकरण सुरू होते. आमचा कॉल टाइम सातचा असल्याचे मला सांगण्यात आले. त्यावर तुमच्या हॉटेलवर गाडी कधी पाठवू असे मला चित्रपटाच्या टीममधील एकाने विचारले. हॉटेल एकदम जवळ असल्याने पावणे सात वाजता पाठवा असे मी बोललो तर त्यावर नाही साडे पाचला तरी तुमच्याकडे गाडी पाठवावी लागेल असे त्यांनी मला सांगितले. कारण त्यांच्याकडे कॉल टाइमचा अर्थ आपल्यासारखा नाहीये. आपल्याकडे कॉल टाइमला कलाकाराने सेटवर पोहोचणे अपेक्षित असते तर त्यांच्याकडे कॉल टाइम म्हणजे त्या वेळात कलाकार रंगभूषा आणि वेशभूषेसह तयार झाला पाहिजे आणि सीनसाठी त्याने संवाददेखील वाचलेले असले पाहिजे. त्यांची ही गोष्ट मला प्रचंड भावली. त्यांच्याकडे वेळेला प्रचंड किंमत असते. 

तू गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहेस, आजच्या मराठी चित्रपटांविषयी तुला काय वाटते?
मराठीत सध्या खूप चांगले चित्रपट येत आहेत. मी जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला दिल्लीला गेलो होतो, त्यावेळेचा एक अनुभव सांगतो, प्रादेशिक भाषांमध्ये पूर्वी राष्ट्रीय पातळीवर बंगाली चित्रपटांचा दबदबा होता. पण आता ही जागा मराठी चित्रपटांनी घेतली आहे. ही आपल्या मराठी चित्रपसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचसोबत मराठीतील केवळ काही टक्केच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवत आहेत हे आपल्यासाठी खूपच वाईट आहे. आज कोणीही येऊन चित्रपटाची निर्मिती करत आहे. या लोकांना चित्रपटांविषयी काहीही अभ्यास नसतो. केवळ नफा कमवणे ही एक गोष्टच त्यांना माहीत असते. पण चित्रपटांचे ज्ञान नसल्याने चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतो. आज वर्षातून केवळ चार-पाचच चित्रपट हिट होत आहेत तर त्याहून कित्येक पटीने अधिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे इंडस्ट्रीचे नुकसान होत आहे. 


 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :