दिलखुलास संदीप कुलकर्णी

‘डोंबिवली फास्ट’ फेम अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून रसिकांचं मनोरंजन केलंय. डोंबिवली फास्ट या सिनेमासोबतच त्यांनी छोटा पडदाही गाजवला. आता जवळपास 7 वर्षांनंतर अनवरत थिएटर्स प्रस्तुत ‘नीळकंठी’ या हिंदी नाटकाच्या निमित्ताने ते रंगभूमीवर परततायत. याचनिमित्ताने संदीप कुलकर्णी यांच्याशी साधलेला हा संवाद.

दिलखुलास संदीप कुलकर्णी
Published: 05 Oct 2016 01:03 PM  Updated: 07 Oct 2016 01:37 PM

सुवर्णा जैन / मुंबई

‘डोंबिवली फास्ट’ फेम अभिनेता संदीप कुलकर्णीने विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून रसिकांचे मनोरंजन केले आहे. डोंबिवली फास्ट या सिनेमासोबतच त्यांनी छोटा पडदाही गाजवला. आता जवळपास 7 वर्षांनंतर अनवरत थिएटर्स प्रस्तुत ‘नीळकंठी’ या हिंदी नाटकाच्या निमित्ताने तो रंगभूमीवर परततो आहे. याचनिमित्ताने संदीप कुलकर्णीशी साधलेला हा संवाद.
 
कोणताही नवा सिनेमा, मालिका आणि नाटक म्हटलं की त्याची चर्चा होतेच. आपल्या नव्या नाटकाचीही चर्चा सुरू झालीय. मात्र सगळ्यात जास्त चर्चा आहे ती तुझ्या लुकची, तर हा लुक आणि या नाटकाविषयी काय सांगाल ?
 
‘नीलकंठी’ या नाटकातील भूमिका म्हणजे एका कॉमन मॅनचे प्रतीक आहे. ती भूमिका म्हणजे भगवान शंकराचेही प्रतीक आहे. या नाटकात ताकद, राजकारण आणि सामाजिक आशय अशा तिन्ही गोष्टींचा मेळ जुळून आला आहे. प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांच्या एका मंचित न झालेल्या 'एक कंठ विषपायी' या नाटकावर आधारित हे नाटक आहे. पुरातन काळात आणि देवलोकात जे घडत होते ते आजही घडते आहे. एखाद्या अन्यायकारक गोष्टीने देव जागा झाला तर तांडव होते. जे डोंबिवली फास्टमध्ये झाले. तसाच शिव आहे जो कॉमन मॅनचा प्रतीक आहे. सगळ्या काळातल्या व्यक्ती या नाटकात पाहायला मिळणार आहेत. 'एक कंठ विषपायी' या नाटकावर आधारित हे नाटक आहे. या नाटकाचा आत्मा तोच असला तरी ते वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना आसाममधील 'तांगठा' फॉर्म बघण्याची संधी मिळणार आहे. या फॉर्ममध्ये मार्शल आर्ट आणि लोकनृत्याची झलक अनुभवता येणार आहे. माझ्यासाठी हा प्रकार पूर्णपणे नवा आहे. दुसरी गोष्ट तरुण पिढी नाटकाकडे वळत नसल्याचे ऐकायला मिळते मात्र नीलकंठी हे नाटक या सगळ्या गोष्टींना अपवाद आहे. या नाटकात तरुण-तरुणींची संख्या जास्त आहे हे खूप सुखद आहे. दरवेळी तेच तेच कलाकार असण्यापेक्षा काही तरी वेगळं होणे गरजेचे असते. ते या नाटकात दिसून आले त्यामुळे हे नाटक मी स्वीकारले. या नाटकातील तरुण कलाकारांचा उत्साह, त्यांचे थिएटरबद्दल असलेले प्रेम आणि मतं सारं काही वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळा उत्साह आणि ऊर्जा मिळते. 
 
हिंदी नाटकानंतर तू मराठी नाटकात कधी येणार?
 
मराठी नाटकसाठी चांगल्या स्क्रिप्ट्ची वाट पाहतो आहे. सध्या काही मित्रांकडून स्क्रिप्ट आल्या आहेत. विजय केंकरेंचं एक नाटक आहे. त्याविषयी बोलणी सुरू आहे. तेही एक वेगळे नाटक आहे. त्यात मला वेगळा प्रयत्न आणि आव्हानं स्वीकारायला आवडतात त्या पद्धतीचे ते नाटक आहे. मात्र काही व्यावसायिक गोष्टींमुळे ते रखडले आहे.
 
हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये तसेच नाटक, सिनेमा, मालिका या विविध माध्यमांमध्ये तू काम केले आहेस. यापैकी तुला भावलेलं माध्यम कोणतं ?
 
सिनेमा हे माझे आवडते माध्यम आहे कारण ते सर्वाधिक रसिकांपर्यंत पोहचते. तेच नाटकाच्या बाबतीत सांगू शकत नाही. कारण नाटकाचा एक विशिष्ट रसिकवर्ग असतो. तेच रसिक नाटक पाहण्यासाठी येतात. मात्र सिनेमा आणि मालिकांचं तसे नाही. या दोन्ही माध्यमांमधून अगदी शेवटच्या स्तरापर्यंतच्या रसिकांपर्यंत पोहचता येते. थोडक्यात सांगायचं झालं तर 'गुंतता हृदय' ही मालिका पाहून अनेकांना वाटते की असं अफेअर करावे. भाषिक माध्यमाविषयी म्हणायचे झाले तर मराठीत रसिकांकडून भरभरुन प्रेम मिळते आहे. मात्र हिंदीला जास्त ऑडियन्स आहे. कारण देशभर ही भाषा बोलली जाते. सत्यदेव दुबेंकडे थिएटर करत असताना तिन्ही माध्यमांमध्ये नाटकं केली. त्यामुळे  वेगवेगळ्या रसिकांपर्यंत पोहचता येते. त्यांच्यासोबतचा वावर वाढतो.

 सिनेमामध्ये तुझे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत ?
 
सध्या 'सत्यशोधक' नावाचा सिनेमा करतो आहे. हा सिनेमा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित असून त्यात ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारतो आहे. सध्या हा सिनेमा पावसामुळे रखडला आहे. एकदा का पाऊस थांबला की याचं शूटिंग सुरू होईल. याशिवाय आगामी काळात एखादा विनोदी सिनेमा किंवा नाटक करायची इच्छा आहे. बासू चॅटर्जींसारखे सिनेमा करण्याची इच्छा आहे. तसंच एखादा 'गैर' या मराठी सिनेमासारखा थ्रिलर एक्शन सिनेमा आगामी काळात करायला आवडेल.
 
'डोंबिवली फास्ट' या सिनेमाच्या सिक्वेलच्या चर्चा सुरू होत्या? त्याविषयी ?
 
डोंबिवली रिटर्न नावाचा नवा सिनेमा येतो आहे. हा सिक्वेल नसून हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा सिनेमा असेल. डोंबिवली फास्ट या सिनेमाप्रमाणेच या सिनेमाची कथाही डोंबिवलीतल्या एका कॉमन माणसाची असून ती डोंबिवलीतच घडते. विशेष म्हणजे यात गाणी आहेत आणि ही गाणी या सिनेमाच्या कथेला अनुसरुन आहेत. हा सिनेमा पूर्णपणे तयार आहे मात्र यावर्षी रिलीज करायचा की पुढल्या वर्षी याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत.
 
संदीप कुलकर्णी छोट्या पडद्यावरसुद्धा झळकणार आहेस.  तर त्याविषयी काय सांगशील ?
 
छोट्या पडद्यावर 'पीडब्ल्यूओ' म्हणजेच प्रिसनर्स ऑफ वॉर नावाची सिरीज करतो आहे. निखील अडवाणीची ही मालिका असून '24' या सिरीजप्रमाणे या मालिकेतही मोठमोठे कलाकार आहेत. ही मालिका जवळपास 6 ते 8 महिने चालेल. सध्या डिजिटलवरील कन्टेंट तरुणाईला आवडतो आहे, त्यामुळे आगामी काळात छोट्या पडद्यावरही सीझनवाईज कंटेट रसिकांना आवडेल.  
 
 
 
 
 

RELATED ARTICLES


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :