Video प्रथम तुला वंदितो !

मंगेश बोरगावकरनं ‘सीएनएक्स लोकमत’च्या टिमसह गणेश मूर्तीशाळेचा फेरफटका मारला. यावेळी त्याच्यासह मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.

Video प्रथम तुला वंदितो !
Published: 03 Sep 2016 01:21 PM  Updated: 20 Oct 2016 12:15 PM

‘सा रे ग म प’ या सांगितीक शोमधून संगीतसृष्टीला सापडलेलं एक रत्न आणि आजच्या पिढीचा आघाडीचा गायक म्हणजे मंगेश बोरगावकर. 
संगीताचा वारसा घरातूनच लाभलेल्या मंगेशनं आजवर सिनेमा, मालिका, विविध अल्बम आणि म्युझिक शोमधून आपल्या सुमधूर आवाजानं संगीतप्रेमींच्या 
मनात अढळ स्थान मिळवलंय.सूरांची मोहिनी घालणारा मंगेश श्री गणरायाचाही मोठा भक्त आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. 
याच पार्श्वभूमीवर मंगेश बोरगावकरनं ‘सीएनएक्स लोकमत’च्या टिमसह गणेश मूर्तीशाळेचा फेरफटका मारला. यावेळी त्याच्यासह मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा. 


माझं आणि श्री गणेशाचं एक वेगळं आणि अतूट नातं आहे. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणेशवंदनेनं होते. 
तशी माझ्या सांगितिक जीवनाची सुरुवातही श्री गणरायाच्या नावानेचं झालीय. माझ्या घराला चार पिढ्यांचा संगीताचा वारसा आहे.
त्यामुळं घरात संगीताचं वातावरण.वयाच्या 3-4 वर्षापासून जेव्हा माझे काका आणि गुरु पंडीत बाबूराव बोरगावकर यांच्याकडे मी शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी मला भूप रागातील पहिली बंदिश शिकवली ज्यात गणपती बाप्पाचं वर्णन होतं. 
त्यामुळं एकप्रकारे माझ्या संगीत जीवनाची सुरुवातच गणेशाच्या आराधनेनं झालीय. त्यामुळं बाप्पाचं माझ्या जीवनात खूप खूप मोलाचं स्थान आहे. 
 
गणेशोत्सवातही घरी भक्तीमय वातावरण असतं. आमचं सगळं कुटुंबच गणेशाच्या भक्तीत लीन होतं. आमच्या घरीही गौरी गणपती असतात. त्यामुळं घरातलं वातावरण खूप छान आणि भक्तीमय असतं. गणरायाची अनेक रुपं आहेत. त्याचं प्रत्येक रुप आगळंवेगळं. हे प्रत्येक रुप डोळ्यात साठवून ठेवावं असंच असतं. बाप्पा माझ्यासाठी जणू एक मित्रच आहे. जो खूप खूप जवळचा वाटतो. त्याच्याकडे आपण कधीही मन मोकळेपणाने बोलू शकतो. देव असल्याचं कोणतंही दडपण वाटत नाही. मला मृदुंग वाजवत 
असलेल्या श्रीगणेशाचं साजरं रुप भावतं. लातूरला आमच्या गावी सरस्वती मंदिरमध्ये अशीच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ती बघतच राहावी अशी वाटते.   
 
सीएनएक्स लोकमतमुळं मला माझ्या जीवनातील एक अप्रतिम क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. गणेश मूर्तीशाळेत मूर्तीवर सध्या अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर या मूर्तीशाळेत जाण्याचा आणि मूर्तीकारांचं काम जवळून पाहण्याची तसंच अनुभवण्याची संधी सीएनएक्स लोकमतमुळं लाभली. 
त्या मूर्तीशाळेतलं वातावरण एकदम वेगळं होतं. तिथं गेल्यावर एकप्रकारची ऊर्जा आल्यासारखं वाटलं. लहान मोठ्या अनेक मूर्ती तिथं होत्या. तिथले मूर्तीकार प्रत्येक मूर्तीला जणू जिवंत करत होते. त्यांची मेहनत, त्यांची अदभुत कला पाहायला मिळाली. हे कलाकार मात्र मागेच राहतात, त्यांच्याबद्दल फारसं कुणालाही माहित नसतं याचं खूप वाईट वाटतं. मात्र या कलाकारांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत मूर्तीवर हात फिरवण्याची संधी मिळाल्याची भावना अवर्णनीय  होती. 
 
कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी त्याची साधना, मेहनत खूप गरजची असते. संगीत क्षेत्रात रियाजला अनन्यसाधारण महत्त्व आहे.तसंच मूर्ती कलेतही प्रचंड मेहनत
 आणि कित्येक वर्षाची साधना असते. एखादा मुरलेला कलाकार आणि मूर्तीकारच त्या मूर्तीमध्ये भाव आणि जीव ओतू शकतो. त्यांची कला बघताना खूप छान वाटलं. 
तिथं एक सिद्धेश नावाचा कलाकार होता. तो गेली दहा वर्षांपासून मूर्ती घडवण्याचं काम करतोय. कलेची ही एक सगळी एक प्रक्रिया आहे.
 मात्र ते आणि मूर्तीकार जे काही करतात ते खरंच अप्रतिम आहे. 
 
लोकमान्य टिळकांनी सर्व नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली.
 गणेशोत्सवाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतील आणि ब्रिटीशांविरोधात एक जनआंदोलन, 
एक मोठी ताकद उभी राहिल अशी भावना त्यामागे होती. 
आज मात्र गणेशोत्सवाचं रुप पूर्णपणे पालटलं. आजचं आधुनिक रुपही आवडतं.
आजच्या गणेशोत्सवाला भव्यता आली मात्र उत्सवाच्या नावाखाली काही गोष्टी होतात त्या मात्र खटकतात. कारण भव्यतेसोबत पर्यावरणाचं मोठं नुकसान होतंय.डीजेमुळं ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणावर पसरतंय. 
तसंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळेही पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान होतंय. 
त्यामुळं मला पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करणं योग्य वाटतं. 
 
गणेशोत्सव म्हटलं की खूप सारी धम्माल असते, त्यामुळं साहजिकच खूप सा-या आठवणी आणि किस्से असतात.
 आमचं सारं कुटुंब सांगितिक आहे. घरातला प्रत्येकजण कलाकार असून तितकाच मोठा गणेशभक्त आहे. 
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात 5-6 दिवस कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र यायचे.
 संपूर्ण महाराष्ट्रभर संगीताच्या कार्यक्रमासाठी दौरे व्हायचे. त्या सगळ्या आठवणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दाटून येतात. 
शिवाय माझे वडील खूप मोठे गणेशभक्त आहेत. त्यांच्याकडून गणेश अथर्वशीर्ष,गणेश कथा ऐकायला मिळायच्या. गणेशोत्सवाच्या या सगळ्या आठवणी आहेत.
 
गणेशोत्सवोच्या पार्श्वभूमीवर रसिकांना माझं सांगणं आहे की,
बाप्पाचा फेस्टिव्हल खूप खूप एनजॉय करा. मात्र माझी एवढीच विनंती आहे की ध्वनी प्रदूषण टाळा.
उत्सवाच्या नावावर होणारा गोंधळ, मस्ती आणि डीजे टाळा. 
पर्यावरणाला हानी पोहचवणाया प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकॉल आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
तसंच सांगितिक मैफिलीचा आनंद घ्या आणि बाप्पाच्या उत्सवात लीन व्हा. गणपती बाप्पा मोरया.  

शब्दांकन- सुवर्णा जैन      


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :