सनी पवार आणि सारिका मेणे सांगतायेत 'आरती - अननोन लव्हस्टोरी'

कमिटमेंटचा खरा अर्थ सांगणारी कथा म्हणजे 'आरती - अननोन लव्हस्टोरी' हा सिनेमा आहे.

सनी पवार आणि सारिका मेणे सांगतायेत 'आरती - अननोन लव्हस्टोरी'
Published: 18 Aug 2017 11:04 AM  Updated: 18 Aug 2017 11:04 AM

नात्याची समीकरणे बदलत चालली असताना प्रेम आणि विश्वास यापलीकडच्या माणुसकीच्या नात्यावर भाष्य करणारा 'आरती' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. प्रेम,रिलेशनशिप अशा गोष्टी आपण कायम ऐकतो, नात्याचं जुळणं,तुटणं या गोष्टीही आपल्या कानावर पडत असतात आणि पाहतही असतो. मात्र कोणत्याही नात्यात ही कमिटमेंट महत्त्वाची असते. याच कमिटमेंटचा खरा अर्थ सांगणारी कथा म्हणजे आरती - अननोन लव्हस्टोरी हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शिका सारिका मेणे आणि ज्याच्यावर सिनेमाची कथा आहे त्या सनी पवार यांच्याशी साधलेला हा खास संवाद

ही लव्हस्टोरी एका सिनेमाच्या रुपातच समोर आणावी असं का वाटलं?

सारिका - सनी आणि आरतीची लव्हस्टोरी रुपेरी पडद्यावर यावी हा विचार जरी माझा असला तरी ती कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सनी आणि आरतीच्या प्रेमाची साक्षीदार मी आहे. त्यांचं रियल प्रेम मी जवळून पाहिलंच नाही तर प्रत्येक क्षण मी स्वतः जगले आहे. सनी आणि आरतीच्या ख-याखु-या प्रेमाची कथा जगापुढे आणून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न होता.ही कथा सा-यांपुढे आणण्यासाठी सिनेमाच एक उत्तम पर्याय मला वाटला. त्याचवेळी कमर्शियल सिनेमा बनवण्याचं मी ठरवलं. या सिनेमातून मला माझ्या भावाच्या म्हणजेच सनीच्या फक्त भावना जगासमोर आणायच्या नव्हत्या तर काही गोष्टी समाजाला सांगायच्या होत्या. सध्या मुलं त्यांच्या कुटुंबापासून दूरावत असल्याचे पाहायला मिळतं. कुटुंबाशी ते फार काही शेअर करत नाहीत. मुळात संवाद हरवत चालला आहे. कोणत्याही समस्येवर उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाशी बोला, संवाद साधा, आई-वडिलांशी, भावाबहिणीशी चर्चा करा तर बदल घडेल असं मला वाटते. आरती सिनेमाची सत्य कथाही या सगळ्या गोष्टींच्या अवतीभोवती फिरते. या सिनेमाच्या माध्यमातून कुणाला काही शिकता आले तर ते उत्तम ठेरल. एक चांगला आणि सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात येणा-या सर्व पिढ्या ही कथा सिनेमारुपात पाहू शकतील असं मला वाटतं. त्यामुळेच सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. 

सनी - सारिकानं सांगितलं तसं सध्याच्या जगात संवाद हरवत चालला आहे. कुटुंबामधील हरवलेला संवाद पुन्हा निर्माण करण्यात सिनेमाच्या रुपात यश येईल असं मला वाटते. ही कथा फक्त रिलेशनशिप या विषयावरच आधारित नाही. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हेच रिलेशन नसून त्याला अनेक नात्यांची किनार लाभली आहे. घरातल्या विविध नात्यांची किंमत समजावून देणारा हा सिनेमा ठरेल असे मला वाटते. नातं मग ते कुठलंही असो प्रत्येक नाती आणखी घट्ट होतील. 

सिनेमाची प्रक्रिया कधीपासून सुरु झाली आणि यानंतर सगळ्याची जुळवाजुळव करणं किती अवघड होतं?

सारिका -  एकदा सिनेमा करायचं ठरवल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या सिनेमाची प्रक्रिया सुरु केली. स्टारकास्टसाठी ऑडिशन आणि कलाकारांची जुळवाजुळव सुरु झाली. ही एक सामान्य व्यक्तीची सत्यकथा होती. आमच्या नावापुढे कोणतंही ब्रँडचं लेबल नव्हतं. त्यामुळे ही स्टोरी साकारण्यात अनेकांनी रस दाखवलाच नाही. जेव्हा मोठ्या लोकांना भेटायचो तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यांनी सिनेमात काम करण्यास नकार दिला. तरीही आम्ही खचलो नाही. अखेर ऑडिशन्स घेऊन रोशन विचारे आणि अंकिता भोईरची प्रमुख भूमिकेसाठी निवड केली. मला एक सरळ, साधा सिनेमा बनवायचा होता. सनी हा गंमतीशीर मुलगा होता. बालपणापासूनच्या त्याच्या जीवनातील बदल या सिनेमातून पाहायला मिळतील. सिनेमातून रसिकांना फक्त रडवायचे नाही तर इतक्या मोठ्या संकटातूनही तो स्वतःला कसा सावरतो हे दाखवायचे आहे. 

सनी आरतीशी झालेली ओळख आणि त्यानंतर बहरलेलं ते नातं याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि घरच्यांशी तिची ओळख कधी झाली?

सनी - मी टी.वाय.ला असताना परीक्षाच दिली नव्हती. तसं पाहायला गेले तर शैक्षणिक आयुष्यातील माझ्यासाठी ते एक मोठं अपयश होतं. कारण शालेय जीवनात नेहमीच मी टॉपर असायचो. अपयशाच्या काळात कुणीही पाठिंबा देत नाही हे सा-यांनाच माहिती आहे. कॉलेजच्या अखेरच्या वर्षापर्यंत आपले घरात लाड होत असतात. मात्र कॉलेज संपलं की जबाबदारी नाही म्हणून  सुनावतात हे आपण पाहतो. कधी काळी मी सुद्धा या सगळ्यातून गेलो आहे. त्यावेळी वाटायचं की आतापर्यंत असे वागले नाहीत आत्ताच का असे वागतात. बाहेरच्या व्यक्तीचा सामना करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. त्याच दरम्यान काम करत असताना अचानक आरतीशी माझी ओळख झाली. मला तर तिची खूप सवय झाली होती. आमच्यात मैत्रीचं घट्ट नातं निर्माण होऊ लागलं. मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर होऊ लागलं. आमची प्रेमकहानी फुलू लागली. मात्र तिला प्रपोज करायची भीती वाटायची. प्रपोज केलं तर मैत्रीसुद्धा गमावून बसेन अशी धाकधुक मनात असायची. कधी कधी वाटायचं की तिच्याही मनात असेन पण लाजत असेल म्हणून व्यक्त होत नसावी. अखेर आमच्या दोघांच्या कॉमन मित्राच्या मदतीने आणि मध्यस्थीने आमच्या मनातील भावना एकमेकांना कळल्या. यानंतर आमच्यातलं प्रेमाचं नातं आणखी बहरलं. मीरा रोड, दहिसरमध्ये आम्ही सारखे भेटायचो. 

सारिका - सनी आणि आरतीच्या प्रेमाच्या नात्याबद्दल सुरुवातीला घरी काहीच माहिती नव्हतं. 2005 साली माझं लग्न झालं. त्यावेळी माझ्या लग्नात तो आरतीला घेऊन आला होता. त्याचवेळी सगळ्या कुटुंबाशी आरतीची ओळख झाली. तोपर्यंत घरात कुणालाच काहीही माहित नव्हतं. 

आरतीला झालेल्या अपघाताविषयी तुम्हाला कधी कळलं?

सारिका - एकेदिवशी मला सनीचा फोन आला. त्याने सांगितले की माझ्या मैत्रिणीचा अपघात झाला आहे. मला आधी वाटलं की सनीच्या गाडीवरुन तर पडली नाही ना. कारण सनी खूप रफ गाडी चालवतो. तेव्हा फोनवरच त्याला विचारलं, तेव्हा त्याने सांगितले की मी गाडी नव्हतो चालवत. यानंतर हॉस्पिटलमध्ये आरतीला पाहिलं तर तिचा चेहराही ओळखता येत नव्हता. 

त्या अपघातानंतर सनीचं संपूर्ण आयुष्यच पालटलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही?

सारिका - हॉस्पिटलमध्ये सनीची अवस्था खूप वाईट झाली होती. त्याच्याकडे पाहून सगळं कळत होतं. त्यानंतर आम्ही त्याला बिल्कुल रोखलं नाही. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. तिच्यासोबत तो पूर्णवेळ असायचा. हॉस्पिटलमध्ये संपूर्णवेळ आरतीसोबतच असायचा. तिची काळजी घ्यायचा. धीर द्यायचा. तिच्याकडून पाहून त्याला त्रासही तितकाच व्हायचा. आरतीचे आधी लांब केस होते. मात्र या दुर्घटनेनंतर ते केस कट करावे लागले त्यानंतर तिला ओळखणंही कठीण झालं होतं. सगळं काही खूप त्रासदायक होतं सनीसाठी. त्याचवेळी आरतीला काही झालं असतं तर सनी पुन्हा उभाच राहू शकला नसता. चार वर्षांत आरतीसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाने त्याला आणखी खंबीर बनवलं असं मला वाटतं. 

सनी - अपघातानंतर पहिले शंभर दिवस तर डोक्यात काही एक विचार नव्हता. डोळ्यासमोर फक्त अन् फक्त आरतीच होती. तिला कसं वाचवता येईल, काय करता येईल हा एकच विचार डोक्यात होता. यानंतर काही काळ गेल्यानंतर माझ्या डॉक्टर मित्रांनी मला स्पष्ट सांगितलं की पुढे जास्त दिवस आरती सोबत नसणार. मात्र अशा अवस्थेत तिला सोडणं मला बिल्कुल शक्यच नव्हते. तिची परिस्थिती कशी असली तरी तिची साथ मला सोडणं अजिबात मान्य नव्हतं. काहीही झालं तरी तिची काळजी घेत राहायचं ठरवलं होतं. 

या एका घटनेनंतर बहिण भावाचे ऋणानुबंध आणखी घट्ट झाले असं म्हणता येईल का?

सनी - या एका दुर्देवी प्रसंगामुळे मी पूर्णपणे खचून गेलो होतो. माझ्यातला आत्मविश्वासच गमावून बसलो होतो. मात्र त्याचवेळी माझ्या त्या परिस्थितीत माझी बहिण सारिका माझ्यासाठी धावून आली. तिने त्या कठीण प्रसंगी मला साथ दिली. माझ्या पाठिशी ती ठामपणे उभी राहिली. तिने दिलेल्या आधारामुळेच मला नव्याने स्वप्न पाहण्याचं बळ मिळालं आहे. 

सारिका - त्यावेळी सनीला आधाराची खूप गरज होती.तो पूर्णपणे खचला होता. त्यावेळी मी त्याला फक्त आधार देण्याचं काम केलं. एकमेकांसाठी जगणं, एकमेकांचं समाधान, आनंद जपणं भावाबहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवतात असं मला वाटतं. प्रेम आणि विश्वास याच्या भक्कम धाग्यात खूप ताकद असते असं मी मानते. 
 
आरती आज आपल्यात नाही मात्र ती मागे कोणत्या गोष्टी सोडून गेली ज्या सगळ्यांना शिकता येतील?

सारिका - आरती आपल्यात नसली तरी तिच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असं मला वाटतं. परिस्थिती कशीही असो तिचा सामना करायचा. कितीही मोठं संकट येवो त्यामुळे डगमगून जायचं नाही हे तिच्याकडून शिकण्यासारखं नक्कीच आहे. प्रत्येकवेळी आनंदी कसं राहावं ही गोष्टही तिच्याकडून शिकण्यासारखी आहे. कारण आरती नेहमी हसतमुख आणि उत्साही असायची. 

सनी - आरती ब-याच गोष्टी मागे ठेवून गेली आहे. तिने मला खंबीर बनवलं. मी एवढंच सांगेन की प्रेमात पडू नका तर प्रेमात उभे राहा. तिने दिलेली प्रेमाची देणगी माणुसकीच्या माध्यमातून पुढे न्यायची आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :