गुढीपाडवाच्या निमित्ताने नेह पेंडसे, स्नेहा वाघ साजरा करतायेत सण आनंदाचा... सण उत्साहाचा...

नवे संकल्प, नवी सुरुवात यामुळे सामान्यांसह मराठी कलाकार मंडळींच्या जीवनातही गुढीपाडव्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही मराठी कलाकारांच्या भावना जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

गुढीपाडवाच्या निमित्ताने नेह पेंडसे, स्नेहा वाघ साजरा करतायेत सण आनंदाचा... सण उत्साहाचा...
Published: 24 Mar 2017 05:11 PM  Updated: 24 Mar 2017 05:11 PM

सण आनंदाचा, सण उत्साहाचा, सण जल्लोषाचा आणि नव्या संकल्पांचा म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. थर्टी फर्स्टला इंग्रजी नववर्षाची दणक्यात सुरुवात होत असली तरी मराठी नववर्षाची सुरुवातसुद्धा त्याहून दणक्यात व्हावी यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. गुढीपाडवा हा सण केवळ नवर्षाची सुरुवात एवढ्यापुरता मर्यादित नाही. हा सण आहे नात्यांचा जल्लोष करण्याचा, एकमेंकांप्रती असलेलं प्रेम, आदर व्यक्त करण्याचा आणि एकमेकांप्रती असलेला विश्वास दृढ करण्याचा. त्यामुळे मराठी सणांमध्ये गुढीपाडवा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढीपाडवा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. नवे संकल्प, नवी सुरुवात यामुळे सामान्यांसह मराठी कलाकार मंडळींच्या जीवनातही गुढीपाडव्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही मराठी कलाकारांच्या भावना जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
 

स्नेहा वाघ
 



मराठी दिनदर्शिकेतील सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा. नव्या गोष्टी आणि नव्या संकल्पाचा शुभारंभ या दिवशी केला जातो. त्यामुळे माझ्यासाठी यंदाचा गुढीपाडवा थोडा खास आहे. छोट्या पडद्यावर दीड वर्षानंतर परतण्यासाठी यापेक्षा उत्तम क्षण कोणता असूच शकत नाही असे मला वाटते. शेर-ए-पंजाब महाराजा रणजितसिंग या मालिकेतून छोट्या पडद्यावर मी परतत आहे. त्यामुळे कलाकार म्हणून माझ्या आयुष्याची ही नवी सुरुवात असून इथूनच माझ्या अभिनयाचा नवा अध्याय सुरु होत आहे. यंदाचा गुढीपाडवा या मालिकेच्या सेटवर माझ्या सहकलाकारांसोबत साजरा करणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या आमगावमध्ये उभारण्यात आलेल्या मालिकेच्या भव्य सेटवर आम्ही शुटिंगमध्ये व्यस्त आहोत. असं असतानाही गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्याचं आम्ही ठरवलं आहे. इतकंच नाही तर पारंपरिक वेशभूषा करुन सेटवर येण्याचं आम्ही ठरवलं आहे. सेटवर मी एकमेव मराठी मुलगी असल्याने वेळ मिळाला तर माझ्या सहका-यांसाठी गुढीपाडव्यानिमित्त गोडधोड आणि मिठाई स्वतः बनवून नेण्याचं मी ठरवलं आहे.
 
नेहा पेंडसे
 



गुढीपाडवा साजरा करणं मला खूप खूप आवडतं. एकतर मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसापासून होते आणि वाईटावर चांगल्यानं मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे हा आहे. मला माझ्या कुटुंबीयांसोबत गुढीपाडवा साजरा करायला आवडतो. या दिवशी मी आणि माझी आई पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने नटून थटून तयार असतो आणि माझे बाबा गुढी उभारुन पूजा करतात. या दिवशी खाण्याचीही रेलचेल असते. गुढीपाडव्यासाठी आम्ही खास गोडधोड जेवण आणि मिठाई बनवतो. याशिवाय श्रीखंड-पुरी, ड्रायफ्रुट टाकून बनवलेली विशेष खीर हा गुढीपाडव्याचा खास बेत असतो. गुढीपाडवा हा माझा सगळ्यात आवडत्या सणांपैकी एक असून या दिवशी एक नवी ऊर्जा मिळते. माझ्या सगळ्या चाहत्यांना, रसिकांना आणि वाचकांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
 
श्वेता महाडिक
 


सध्या नागरिकांना आपल्या परंपरा, सण, संस्कृती याचा विसर पडत चालला आहे. मात्र याच गोष्टी टिकून राहाव्यात आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचणंही गरजेचं असते. त्यामुळेच प्रत्येक सण मी उत्साहात आणि आनंदात साजरा करते कारण त्यानिमित्ताने माझ्या मुलाला या प्रत्येक सणाचं महत्त्व कळते. गुढीपाडवा हा महाराष्ट्रीयन आणि मराठी नववर्षाची सुरुवात आहे. त्यामुळे या दिवशी माझा सगळा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी राखून ठेवते. माझ्या कुटुंबासह हा सण साजरा करते. गुढीपाडव्यासाठी मी खास पुरणपोळीचा बेत करते. गुढीपाडवा, नऊवारी साडी आणि महाराष्ट्रीयन नथ हे जणू काही समीकरणच. त्यामुळे या दिवशी मी पारंपरिक पद्धतीने तयार होऊन हा सण साजरा करते. फिटनेसच्या दृष्टीने यंदा माझ्या पतीला आणि मुलाला सायकल खरेदी करुन देण्याचं मी ठरवलं आहे.
 
अक्षय म्हात्रे
 



गुढीपाडवा म्हणजे नवे संकल्प, नवी सुरुवात. त्यामुळे या दिवशी सकाळी पाच वाजता उठून, आंघोळ करुन तयार असतो. त्याचवेळी माझे बाबा गुढी उभारुन तिच्या पूजनाची तयारी करत असतात. आई स्वयंपाक घरात गोडधोड लज्जतदार जेवण व्यस्त असते. यातील पुरणपोळीचा बेत म्हणजे तर क्या कहेने ? गुढीपाडव्याच्या दिवशी ढोलताशाच्या तालावर निघणारी शोभायात्रा, यातील पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी परिधान करुन नटलेल्या आणइ आसंमतात पसरलेला आनंद हे सारं सारं मला खूप भावतं. त्यानंतर संध्याकाळी कुटुंबासमवेत एकत्र येत एकत्र रात्रीच्या जेवणाचा आनंद घेतो. यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त सा-यांना खूप खूप शुभेच्छा. मराठी नववर्ष सा-यांना सुख-समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो या मनःपूर्वक शुभेच्छा. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :