‘बंदूक्या’ सिनेमाच्या टीमची लोकमतच्या ऑफिसला भेट

नवा विषय, नवी कथा, नवा दिग्दर्शक, नवा नट यांचं स्वागत करा, कारण क्रांती ही जनसामान्यांमधूनच होत असते” अशी अपेक्षा यानिमित्ताने नामदेव मुरकुटे याने रसिकांकडून व्यक्त केली आहे.

‘बंदूक्या’ सिनेमाच्या टीमची लोकमतच्या ऑफिसला भेट
Published: 01 Sep 2017 04:36 PM  Updated: 01 Sep 2017 04:36 PM

पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या एका समाजातील विशिष्ट प्रथेवर भाष्य करणारा सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बंदूक्या’ असे या सिनेमाचे नाव असून 1 सप्टेंबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. मात्र रिलीज होण्याआधीच त्यातील संवाद, रांगडी अन् शिवराळ भाषा, कलाकारांचा अभिनय, गाणी यामुळे या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच 54व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यातही या सिनेमाने विविध गटातील पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. याचनिमित्ताने बंदूक्या सिनेमाच्या टीमनं लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. बंदूक्या म्हणजे नेमकं काय, तो कोण आहे, त्याचा अर्थ काय इथपासून ते सिनेमाचा प्रमोशन फंडा, गावरान भाषा यासह विविध विषयावर या सिनेमाच्या टीमनं मनमोकळ्या गप्पा मारल्या. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केलं असून यांत अभिनेता शशांक शेडें, आतिषा नाईक, नामदेव मुरकुटे, निलेश बोरसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमा राहुल चौधरी आणि नामदेव मुरकटे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. “या सिनेमाआधी वेगळा विषय घेऊन काही तरी करायचं डोक्यात होतं. त्यासाठी गावागावात फिरलो. एक कॅरेक्टर घेऊन त्यावर सिनेमा करायचा होता. ठिकठिकाणी फिरलो आणि त्यातूनच या सिनेमाची कथा सुचली. याबाबत मग नामदेवला सांगितलं. तो सिनेमा येण्याआधी बराच काळ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. त्याने त्याचे इनपुट टाकले आणि सिनेमाची कथा साकारली” असं दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी सांगितले. संकल्पनेमागचं नामदेव यांनीही एक कारण यावेळी सांगितलं. ते म्हणतात “सिनेमा करायचा तर तो तरुणाईला घेऊन हे डोक्यात होतं. कारण बदल घडवू शकतात ते फक्त तरुण. त्यामुळे सिनेमाची तयार करण्यासाठी ब-याच आधीपासून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होतो. त्यातूनच राज्यातील कानाकोप-यात असणा-या तरुणाईशी संवाद साधता आला. यातूनच मग विविध नवनवीन गोष्टी उमगल्या आणि एक कलाकृती साकारली” असं नामदेव यांनी सांगितलं.
 
'बंदूक्या' या सिनेमात अभिनेता शशांक शेंडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.सिनेमा करण्यामागचं कारण यावेळी शशांक यांनी उलगडलं. “यातील भूमिका हटके वाटली त्यामुळे सिनेमात स्वीकारल्याचं शशांक यांनी सांगितलं. तसंच “कोणताही वेगळा आणि चाकोरीबाहेरील सिनेमा करण्याची धमक ही तरुण नवे दिग्दर्शकच दाखवू शकतो. तशी धमक मला यांत दिसली” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सिनेमातील भाषा, व्यक्तीरेखा मग ती निगेटिव्ह असली तरी ती भावली. ती करताना मजा आल्याचंही शशांक यांनी आवर्जून सांगितलं.सिनेमाचं बंदूक्या हे शीर्षक सध्या सा-यांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे. “बंदूक्या हे एका प्रवृत्तीचं नाव आहे. जी एका विशिष्ट प्रथेच्या नावावर अजूनही जिवंत आहे. बंदूक्याला बघताना तुम्हाला कधी राग येईल तर कधी त्याचं बोलणं पटेल असं नामदेव यांनी सांगितलं. आजही एक समाज असा आहे की जो नव्याने जन्माने येणा-या मुलांची नावं हातात येईल त्या वस्तूंच्या नावावरुन ठेवतो त्यावर आधारित हा सिनेमा आहे” असं त्यांनी सांगितलं.  

या सिनेमातील आणखी एक गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत ती म्हणजे यांतील शिव्या. या सिनेमाच्या निमित्ताने रसिक पहिल्यांदाच जुंदरी झटका अनुभवणार आहेत. या सिनेमातील शिव्यांमध्ये काहीही वावगं नसल्याचे अभिनेता शशांक शेंडे यांनी सांगितलं. “शिव्या या त्या त्या भागातील लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग घटक असतो. ते त्यांच्या बोली भाषेतले एक्स्पेशन असतात. त्याच्या वापरामुळे भाषा अधिक समृद्ध होते असं त्यांना वाटतं. शिवी ही त्या त्या भागातील नागरिकांची ओळख असते” असं नामदेव मुरकुटे यांनी सांगितलं. याबाबत सांगताना त्यांनी एक किस्सा सांगितला. “मुंबईतल्या 26-11 दहशतवादी हल्ल्यावेळी मंत्रालय परिसरात काही मुलं फिरत होती. त्यावेळी मंत्रालय परिसरात अलर्ट असल्याने पोलिसांनी त्यांना पकडलं आणि चौकशी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना मराठी आहेत का विचारलं. त्यांनी आपली मराठी ही ओळख पटवून देण्यासाठी शिव्या बोलून दाखवल्या आणि सुटका करुन घेतली. त्यामुळे शिव्यांमुळे त्या त्या भागाची ओळख बनते” असं नामदेव यांनी सांगितलं.या सिनेमाचं शुटिंग डोंगर द-या, जिथं व्हॅनिटी व्हॅनसुद्धा पोहचू शकत नाही अशा भागांमध्ये जमा झालं. गुजरातजवळच्या एका गावात या सिनेमाचं शूटिंग पार पडलं. हे गाव म्हणजे जणू काही चित्रकलेत काढतो तसं गाव होतं असं सिनेमाच्या टीमने सांगितले. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गावक-यांनी खूप मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं. 31 डिसेंबरच्या रात्री घडलेला किस्सा या टीमनं यावेळी आवर्जून सांगितला. “त्यादिवशी शूटिंगची सगळी तयारी पाहून या ग्रामस्थांना वाटले की तमाशा होणार, कोणी बडे स्टार कलाकार येणार. दूर दूरच्या भागातून गावकरी जमा झाले. मात्र तसं काही होत नसल्याचं पाहून काही ग्रामस्थांनी धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. मात्र ही बाब तिथल्या महिलांना रुचली नाही. आपल्या गावाचं नाव खराब होईल असा विचार करुन या महिला एकवटल्या. त्यांनी धिंगाणा घालणा-या दोघांना चांगलंच बदडलं. महिलांचा रौद्रावतार पाहून कुणीच धिंगाणा घातला नाही आणि शूटिंग व्यवस्थित पार पडलं”. या सगळ्याचं क्रेडिट बंदूक्या सिनेमाच्या टीमनं त्या गावातील त्या महिलांना दिलं.
 
“बंदूक्या हा सिनेमा केवळ बोलण्यापुरता वेगळा नसून ख-या अर्थाने वेगळा आहे. ज्याप्रमाणे बॉलिवूडच्या बाजीगर आणि डरमध्ये जसं दाखवलं तसंच काहीशी अँटी हिरो संकल्पना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. आता तो जे काही करतो ते चूक का बरोबर याचा विचार रसिकांना करायला लावणारा हा सिनेमा आहे. हसता हसता त्यांना अंतर्मुख करायला लावणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे तो नक्की पाहा” असं आवाहन अभिनेता शशांक शेंडे यांनी केले आहे. “हा सिनेमा मनोरंजनाचं उत्तम पॅकेज आहे. यातील कथा वेगळी आहे. हिरो तुम्हाला यातील वेगळा वाटेल, सिनेमाची गाणी तर तुफान हिट ठरत आहेत. आदर्श शिंदेच्या रांगड्या आवाजातलं माझा ईर हे गाणं तर तरुणाईला वेड लावत आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहा” असं दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्र कायमच नव्या प्रयोगांचं स्वागत करतो. त्यामुळे नवा विषय, नवी कथा, नवा दिग्दर्शक, नवा नट यांचं स्वागत करा, कारण क्रांती ही जनसामान्यांमधूनच होत असते” अशी अपेक्षा यानिमित्ताने नामदेव मुरकुटे याने रसिकांकडून व्यक्त केली आहे.  


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :