​पुण्याच्या पर्णिता तांदुळवाडकर यांची सीए ते "मिसेस इंडिया" पर्यंत गरुड झेप !

पर्णिता तांदुळवाडकर यांचा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करणारा संपूर्ण जीवन प्रवास, वाचा सविस्तर !

​पुण्याच्या पर्णिता तांदुळवाडकर यांची सीए ते "मिसेस इंडिया" पर्यंत गरुड झेप !
Published: 19 Sep 2017 01:39 PM  Updated: 19 Sep 2017 02:17 PM

-रवींद्र मोरे 
आपण आपलं करिअर एखाद्या चौकटीत राहून तयार करत असतो. भविष्य घडवताना निवडलेलं करिअर कधी कधी चुकीचंही ठरतं. त्यातून अनेकजणांना नैराश्य येतं. त्यात महिलांच्या बाबतीत हे नैराश्य फार काळ राहतं. कारण त्यांच्यामागे करिअरसोबतच संसाराचाही ससेमिरा मागे लागतो. पण या सार्‍या संकटाला मात करून करिअरच्या चौकटी मोडून कोणी वेगळ्या वाटा निवडत असेल तर? पुण्यात राहणार्‍या पर्णिता तांदुळवाडकर त्यातल्याच एक. सीएचा अभ्यास करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. अभ्यास करत असतानाचं त्यांचं लग्न झालं. त्यामुळे करिअर घडवण्याआधीच त्यांना संसाराची घडी लावण्यात वेळ द्यावा लागला. पण त्यातूनही सकारात्मक विचार करून काँगेनिअलिटी मिसेस इंडियापर्यंत बाजी मारण्यात त्या यशस्वी ठरल्या.लहानपणापासूनच हुशार असलेल्या पर्णिता यांनी बारावीनंतर सीए करायचं ठरवलं. सगळ्यात कठीण अभ्यास असला तरी यातच आपण आपलं भविष्य घडवायचं असा निश्चय करून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. सीएचा अभ्यास सुरू असतानाच त्यांचं लग्न झालं. लग्नानंतरही त्यांनी सीएचा अभ्यास सुरू ठेवला. पण काही केल्या यश मिळेना. अनेक वर्ष सीएसाठी घालवली. पण सीएची पदवी मात्र मिळेना. त्यातच त्यांच्या आयुष्यात एका चिमुकल्याचा जन्म झाला. संसार, मुलं-बाळं आणि त्यातच करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे पर्णिता फार चिंतीत होत्या. पण फक्त हातावर हात ठेवून आला दिवस ढकल असं करणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. पण यातून बाहेर पडण्यासाठी नक्की काय करावं याचा मार्गच त्यांना सापडत नव्हता. बाळंतपणामुळे वाढलेलं वजनही त्यांच्या नैराश्याचं कारण होतं. आत्मविश्वास कमविण्यासाठी त्यांनी आधी स्वतः फिट राहण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांनी भावाची जीम जॉईन केली. नियोजित व्यायामाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. सतत भविष्याच्या चिंतेत असलेल्या पर्णिता आता आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहू लागल्या. यातूनच त्यांना काँगेनिअलिटी मिसेस इंडियाचा पुरस्कारा मिळाला. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे असं त्या म्हणतात. 

मिसेस इंडियाचा किताब मिळाल्यानंतर त्यांनी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देणं चालू केलं . यातून एकंदरीतच पर्सनालिटी ग्रुमिंगकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. खरंतर जीम जॉईन केल्यानंतरच त्यांनी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली होती. मात्र मिसेस इंडियाचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी या ट्रेनिंगमध्ये अनेक बदल केले. यामध्ये मेकअप ग्रुमिंगपासून ते एकंदरीत देहबोलीतील बदल आणि वागण्याबोलण्यातील बदल कसे असावेत याविषयी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. सॉफ्ट स्किल ट्रेनर या क्षेत्रात त्या आता बर्‍याच स्थिरस्थावर झाल्या आहेत. याद्वारे कित्येकांना त्यांनी स्वतःचं आयुष्य परत केलं आहे. त्यांच्या मैत्रीपुर्ण स्वभावामुळे त्यांच्या अनेकजण लगेच एकरुप होतात. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यातून समोरच्याला असलेलं दुःख पर्णिता हेरतात आणि त्यांना योग्य तो सल्ला देतात. आपल्याकडे आलेला एखादा वैफल्यग्रस्त माणूस आपल्याशी बोलल्याने आणि आपल्या सल्ल्याने पुन्हा आनंदी जीवन जगत असेल तर यापेक्षा चांगलं काम या जगात दुसरं काहीच नाही. आपण शिकतो, कमवते होतो. पण या सर्व काळात आपण आपल्याकडे लक्ष द्यायला विसरतो. स्वतःवरील दुर्लक्षामुळे आपलं आपल्यावरचही नियंत्रण बिघडतं आणि आपण आपला आत्मविश्वास गमवून बसतो. त्यामुळे अशा सॉफ्ट स्किल काऊन्सिलची आपल्याला गरज भासते. यामधून आपण आपल्याला नव्याने खुलवू शकतो. जगासमोर एक नवं व्यक्तिमत्व तयार करून उभं राहू शकतो. 

आपण राहतो कसे, दिसतो कसे, इतरांशी संवाद साधण्याचा अभाव, अनोळख्यांशी बोलण्याची भीती, आपल्यातील कला सादर करण्याची भीती, एकलकोंडेपणा अशा विविध चिंतानी अनेकजण ग्रासलेले असतात. आत्मविश्वासाच्या अभावामुळे या गोष्टी घडत असतात. त्यांना वेळीच ट्रेनिंग देऊन, त्यांच्याशी संवाद साधूनच त्यांना या त्रासातून बाहेर काढणं गरजेचं असतं. आणि या सार्‍यांची सुरुवात शालेय स्तरापासून झाली पाहिजे असं पर्णिता यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांनाही सॉफ्ट स्किलचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शिवाय प्रत्येक शाळेत हा विषय असायला हवा. कारण अनेक लहान मुलं इतरांशी बोलायला घाबरतात, आपल्यातील कला सादर करायला घाबरतात. या ट्रेनिंगमुळे समोरच्याला मोकळं करता येतं, त्यांना आत्मविश्वास देता येतो, त्यामुळे शाळेतच त्यांच्यावर असे संस्कार झाले तर करिअर निवडताना त्यांना अडचणी येणार नाही. 

आपण नेहमी इतरांचा विचार करतो, विशेषतः महिलांना लग्नानंतर स्वतःचं वेगळं अस्तित्वतच उरत नाही. आपण आपल्याला महत्व दिलं तरंच इतर आपल्याला महत्व देतात. स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आपल्याला अनेक विकार जडतात. या विकारांपासून दूर राहायचं असेल तर आतापासूनच प्रत्येकांनी स्वतःकडे लक्ष द्यायाला सुरुवात करायला हवी. आपण आनंदी असतो तेव्हाच संपूर्ण घर आनंदी राहतं. त्यामुळे इतरांच्या आनंदासाठी आधी स्वतःकडे लक्ष देऊन थोडावेळतरी स्वतःसाठी देणं गरजेचं आहे असं पर्णिता सांगतात. 

सीएपासून सुरू झालेलं त्यांचं करिअर लग्नानंतर मिसेस इंडियाच्या किताबामुळे पुर्णपणे बदलून गेलं. आपल्याला आलेल्या अडचणी इतरांना येऊ नये आणि आल्याच तरी त्यांना त्यातून बाहेर काढता यावं यासाठी त्यांनी उचलेलं पाऊल फार मोलाचं आहे. दुसर्‍यांच्या आयुष्यात आलेलं दुःख आपण आपल्या कलेने हलकं केलं तर आपल्यालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला मिळतं, म्हणूनच या क्षेत्रात आल्यानंतर मी पूर्वीपेक्षाही फार आनंदी आहे असं पर्णिता अभिमानाने सांगतात.


कपिल शर्माचा छोट्या पडद्यावरील कमबॅक हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :