काय आहे ‘भावनिक प्रथमोपचार’ ?

आपल्याला प्रथमोपचार पेटी काय आहे, हे माहितच आहे. मात्र ‘भावनिक प्रथमोपचार’ हे ऐकून बुचकळ्यात पडल्यासारखं वाटतं, कारण ही संकल्पना आपल्यासाठी तशी नवीनच आहे

काय आहे ‘भावनिक प्रथमोपचार’ ?
Published: 12 Oct 2016 03:56 PM  Updated: 16 Oct 2016 03:05 PM

-रवींद्र मोरे 

आपल्याला प्रथमोपचार पेटी काय आहे, हे माहितच आहे. मात्र ‘भावनिक प्रथमोपचार’ हे ऐकून बुचकळ्यात पडल्यासारखं वाटतं, कारण ही संकल्पना आपल्यासाठी तशी नवीनच आहे. मग नेमके ‘भावनिक प्रथमोपचार’ म्हणजे काय आहे, कोणत्या परिस्थितीत या उपचाराची गरज भासू शकते, याविषयी आजच्या सदरात जाणून घेऊया...

नुकताच 10 आॅक्टोबर रोजी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ तर्फे ‘जागतिक मानसिक आरोग्यदिन साजरा करण्यात आला. याच दिवसी मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी ‘मानसिक आरोग्य दिन’ साजरा करून नवीन मोहीम जाहीर करण्यात आली. यावर्षी ‘भावनिक प्रथमोपचार सर्वांसाठी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कुणाला अकस्मात जखम झाली, शारीरिक त्रास किंवा भाजल्यास आपण दवाखान्यामध्ये जाण्याअगोदर घरच्या घरी उपचार करतो. यासाठी वापर केला जातो तो प्रथमोपचार पेटीचा. मात्र भावनिक प्रथमोपचार ऐेकल्यावर आपल्या मनात थोडे वेगळे विचार सुरू होतात आणि सहाजिकच बुचकळ्यात पडतो. म्हणूनच भावनिक प्रथमोपचार म्हणजे काय, सध्याच्या जगात त्याचं महत्त्व का वाढत आहे आणि भावनिक प्रथमोपचार कसे देता येऊ शकतात, याविषयी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. 

काही मानसिक त्रास किंवा आजार असल्यास डॉक्टरांकडे जाण्याअगोदर करायचे भावनिक उपचार म्हणजेच ‘भावनिक प्रथमोपचार होय. मात्र आपल्याकडे मानसिक आजारांविषयी अजूनही अज्ञान, गैरसमज आणि अंधश्रद्धा असल्यामुळं भावनिक प्रथमोपचार पासून खूप लांब राहावे लागते. आज आपल्या देशाने वैज्ञानिक प्रगती केली असली तरी मानसिक आजारी व्यक्तीला ‘भुतानं झपाटलं आहे’ असं समजून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात मांत्रिक-तांत्रिकांकडं नेलं जातं, हे वास्तव समजून घेतलं तर मग भावनिक प्रथमोपचार या संकल्पनेचं महत्त्व आपल्याला जाणवू लागतं.

वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या अहवालानुसार मानसिक आजार हा आता केवळ ‘तीव्र मनोरुग्ण’ व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नसून मानसिक ताणतणाव किंवा टेन्शन हा आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. हे झालं फक्त टेन्शनविषयी; पण दर पाच माणसांच्या मागं एका व्यक्तीला तिच्या आयुष्यात कुठल्या तरी मानसिक आजाराला सामोरं जावं लागतं आणि 2020 मध्ये ‘डिप्रेशन’ हा आजार हृदयविकारानंतरचा जगाला त्रास देणाºया आजारांच्या यादीत दुसºया क्रमांकावर असेल. 

मानसिक खच्चीकरण झाले की मनुष्य आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. दरवर्षी जगभरात दहा लाखांपेक्षा अधिक लोक आत्महत्या करून आपले आयुष्य संपवतात आणि या सगळ्यांच्या उपचारासाठी आपल्या देशात अवघे चार हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत आणि जवळपास तेवढेच समुपदेशक आहेत. या एवढ्या मोठ्या फरकामुळेच भावनिक आधाराची आणि उपचारांची गरज असलेल्या हजारो लोकांना ते अपेक्षित उपचार मिळू शकत नाहीत. यामुळेच कदाचित अंधश्रद्धेच्या आणि तथाकथित अध्यात्माच्या नावाखाली लोकांचं शोषण करणारे बाबा-बुवा फोफावत असतात, हे लक्षात घ्यायला हवं. 
मग अशा परिस्थितीत ही दरी भरून काढण्यासाठी सर्वांसाठी डब्ल्यूएचओ ने हाती घेतलेली ‘भावनिक प्रथमोपचार’ ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. कारण भावनिक प्रथमोपचार हे टेन्शनच्या पहिल्या टप्प्यावर दिले जातात; त्यामुळं छोट्या-मोठ्या टेन्शनचं मानसिक आजारांमध्ये रूपांतर होणं ते टाळू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भावनिक प्रथमोपचार देण्यासाठी खूप मोठ्या प्रशिक्षित व्यक्तीची गरज नसते. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ तर्फे  राबविण्यात येणाºया ‘मानसमित्र’ मोहीमेअंतर्गत प्रशिक्षित व्यक्तिही भावनिक प्रथमोपचार करू शकतात. या व्यक्तिंमार्फत अनेक जणांपर्यंत मानसिक आरोग्याच्या सुविधा पोचवता येतात, एवढंच नव्हे तर, शास्त्रीय भावनिक प्रथमोपचार मिळाले, तर अनेक रुग्ण आणि कुटुंबीय हे अंधश्रद्धांच्या कचाट्यातून सुटू शकतात आणि योग्य तज्ज्ञांकडे गेल्याने त्यांचे अनेक त्रास वाचतात. मात्र, भावनिक प्रथमोपचार देताना एक काळजी घेणं गरजेचे आहे. ती काळजी म्हणजे प्राथमिक पातळीवरचे भावनिक ताण कोणते आणि मानसिक आजारात रूपांतर झालेली लक्षणं कोणती याचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय भावनिक प्रथमोपचार करुच नये. मात्र प्रशिक्षण घेऊन भावनिक प्रथमोपचार करणे  तसे फारसे अवघड नाही. विशेष म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात तणावाच्या प्रसंगांना सामोरे जाताना आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यातील काही गोष्टी करतच असतो. मात्र भावनिक प्रथमोपचारांमध्ये ते शास्त्रीय पद्धती वापरणे अपेक्षित असते. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मानवी मन आणि त्याचे आजार’ याविषयी शास्त्रीय माहिती आपणास असायला हवी.  

‘भुतानं झपाटले आहे’ म्हणून मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात असंख्य व्यक्तिंना जीव गमवावा लागला आहे. भुतबाधा हा प्रकार अस्तित्वातच नाही तर हा एक मानसिक आजार आहे आणि त्यावर उपचार उपलब्ध आहे, हे सांगण्याचा भावनिक प्रथमोपचारदेखील कित्येकांचे आयुष्य वाचवू शकतो. यावेळी भावनिक प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समोरच्याला शहाणपण शिकविणाºयाच्या भूमिका नसावी तर एक मित्रत्वाच्या नात्याने माहिती द्यावी. दुसरी गोष्ट आहे, टेन्शन आलेल्या व्यक्तीला एकदम सल्ला देण्यापेक्षा त्या व्यक्तीचं म्हणणं जरी आस्थापूर्वक ऐकून घेतलं, तरी त्याद्वारे समोरच्या व्यक्तीची अस्वस्थता कमी होते आणि ती व्यक्ती स्वत:चा विचार स्वत: करायला लागू शकते. भावनिक प्रथमोपचारांमधली तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, मानसिक आधार देण्याचं कौशल्य. मानसिक ताण-तणाव (टेन्शन) आलेल्या व्यक्तीला अनेकदा खूप एकटं आणि आधारहीन वाटत असतं. अशा वेळी ‘कुणीतरी आपल्याला समजून घेऊ शकतं आणि आधार देण्यासाठी आपल्या समवेत कुणीतरी आहे,’ या भावनेनंदेखील आपण टेन्शनला पळवून लावू शकतो!

याचबरोबर मानसिक आरोग्याबाबत आपल्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात मोठी जनजागृती करुन आपण आपली ‘भावनिक प्रथमोपचार पेटी’ तयार करू शकतो. आणि यामुळे कुटुंब, समाज व देशाचे मानसिक आरोग्य सुदृढ होण्यास मोठी मदत होईल. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :