हरामखोर Review : कठिण विषयाची पद्धतशीर मांडणी

हरामखोर Review : कठिण विषयाची पद्धतशीर मांडणी विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - नवाजुद्दीन सिद्दीकी,श्वेता त्रिपाठी
  • निर्माता - गुनीत मोंगा प्रोडक्शन दिग्दर्शक - श्लोक शर्मा
  • Duration - 2 तास Genre - कॉमेडी
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

हरामखोर Review : कठिण विषयाची पद्धतशीर मांडणी

- जान्हवी सामंत

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘मसान’ फेम श्वेता त्रिपाठी स्टारर ‘हरामखोर’ हा गेल्या चार वर्षांपासून रखडलेला चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. १ कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बनलेला आणि १६ दिवसांत तयार झालेला ‘हरामखोर’ गत चार वर्षांपासून वादात सापडला होता. एक विवाहित शिक्षक आपल्याच एका किशोरवयीन वयाच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. या कथेमुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटास प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. बालभारतीनेसुद्धा या चित्रपटाच्या एका पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अखेर हा वाद चित्रपट प्रमाणन अपिलीय लवादाकडे पोहोचले होते. मात्र लवादाने चित्रपट पास केला आणि चार वर्षांनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. श्लोक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट अनुराग कश्यप, फिरोज आलमीर, चिन जैन व गुनीत मोंगा यांची निर्मिती आहे.

खरे सांगायचे तर  दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी ‘हरामखोर’ या चित्रपटासाठी अतिशय संवेदनशील विषय निवडला, असेच म्हणावे लागेल. पडद्यावर शिक्षक आणि विद्यार्थिनीमधला रोमान्स दाखवणे, शिवाय तो दाखवताना लोकांना पचेल अशा रूपात दाखवणे हे सोपे काम नक्कीच नाही. चित्रपटाचा विषयच अतिसंवेदनशील व पचायला जड जाणारा असल्याने, तो विषय तितक्याच संवेदनशीलपणे मांडणे हे खरे कसब आहे आणि दिग्दर्शक श्लोक शर्मा यात पूर्णपणे यशस्वी झालेत. वर्गातील एखादा विद्यार्थी शिक्षकाचा आवडता असतो किंवा शिक्षकाचे त्या विद्यार्थ्यावर विशेष प्रेम असते, हे आपल्यासाठी नवीन नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे. ‘हरामखोर’ चित्रपटाची कथा याच अंगाने पुढे सरकते आणि पुढे एक गणिताचा शिक्षक व त्याच्याकडे शिकवणीसाठी येणारी एक विद्यार्थीनी यांच्या प्रेमसंबंधांच्या वळणावर येते.

गुजरातमधील एका लहानशा गावातील ही कथा. या गावातील शाळेत श्याम टेकचंद (नवाजुद्दीन सिद्दीकी) हा तिचा गणिताचा शिक्षक असतो. उठता-बसता पोरांच्या पाठीत एखादा धपाटा घालणे, कान पिरगाळणे, चेष्टेच्या स्वरात मुलांना खडसावणे असा शिक्षक नवाजुद्दीने यात साकारलाय. त्याच्या वर्गात संध्या (श्वेता त्रिपाठी) नावाची उण्यापुऱ्या पंधरा वर्षांची विद्यार्थीनी असते. फावल्या वेळात श्याम गणिताची शिकवणी घेत असतो. संध्याही श्यामकडे शिकवणीसाठी येते. श्याम हा मुलांचा आवडता शिक्षक असतो आणि श्यामची संध्या ही आवडती विद्यार्थिनी असते. संध्याची आई तिच्या लहानपणी घरून पळून गेलेली असते आणि दारूच्या आहारी गेलेले तिचे पोलिस वडील एका परस्त्रीच्या प्रेमात असतात. त्यामुळे संध्या ही आई आणि वडील अशा दोघांच्याही प्रेमाला पारखी झालेली असते. संध्या प्रेमाची भूकेली असते. याच प्रेमाच्या लालसेतून गणिताच्या शिक्षकाबद्दल तिला आकर्षण वाटू लागते आणि याच आकर्षणातून संध्या व विवाहित श्याम परस्परांच्या जवळ येतात.  

चित्रपटाची सुरुवात काहीशी संथ होते. एका लहानशा शहरातील शाळा, तिथले रस्ते, तेथील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची मनोवस्था असे सगळे बारीक-सारिक तपशील दाखवत हा सिनेमा पुढे सरकतो. याचदरम्यान एका वळणावर संध्या व तिचा शिक्षक श्याम यांच्यात प्रेम फुलते आणि काहीच दिवसांत हे प्रेम शारीरिक संबंधातपर्यंत पोहोचते. संध्या तिच्या वडिलांचा आणि श्याम बायकोचा डोळा चुकवून एकमेकांना लपून भेटू लागतात. आपलं नातं जपण्यासाठी संध्या आणि श्याम दोघेही सतत खोटे बोलतात. यातून त्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणि कथेतील गुंतागुंतही वाढते. इथून पुढे चित्रपटाची कथा एका वेगळ्या आणि अनोख्या वळणावर येऊन पोहोचते. संध्याच्याच वर्गातील दोन मुले तिच्या आणि श्याममध्ये फुलत असलेल्या नात्याचे साक्षीदार असतात. यापैकी एकाला संध्या आवडत असते. याच दोन मुलांच्या नजरेतून चित्रपटाची अख्खी कथा उभी केली आहे. 

चित्रपटाची कथा ऐकायला अविश्वसनीय वाटत असती तरी पडद्यावर बघताना ती जराही अविश्वसनीय वाटत नाही. संध्याच्या केसांमधील तेलाचा वास किंवा मुलांच्या कपड्यांवरील मातीचा सुंगध जाणवेल, इतक्या संवेदनशीलपणे यातील अनेक दृश्ये चित्रीत केली गेली आहेत. त्यामुळे चित्रपटाची कथा एकदम खरीखुरी वाटते. श्वेता त्रिपाठीचा हा तसा पहिला चित्रपट. पण तिचा चित्रपटातील अभिनय अफलातून म्हणायला हवा. श्वेताने पडद्यावर रंगवलेली संध्या पाहून श्वेताचा हा पहिला चित्रपट असावा, हे सांगूनही पटणार नाही. श्वेताची अभिनयातील कारकीर्द सोनेरी आहे, याची हा चित्रपट खात्री देतो. नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणे या चित्रपटातही स्वत:तील बेस्ट दिले आहे. खरे तर नवाजुद्दीनने चित्रपटात रंगवलेला शिक्षक अक्षरश: ‘हरामखोर’ वर्गात मोडणारा आहे. अतिशय स्वार्थी आणि आत्मकेंद्रीत शिक्षक त्याने रंगवलाय. पण तरीही सरतेशेवटी या शिक्षकाबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटू लागते. संध्याच्याच वर्गातल्या दोन अल्लड मुलांच्या माध्यमातून  तिच्या आणि श्यामच्या नात्याची गोष्ट सांगितली गेलीय. त्यामुळे पडद्यावर पाहताना या कथेतील सगळी पात्रं निरागस वाटतात. हेच या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कदाचित याचमुळे एक संवेदनशील विषय पाहायला आणि समजायला ‘सोपा’ होतो.

सरतेशेवटी चित्रपट एक मोठा संदेश देऊन जातो. किशोरवयीन मुलांचे भावविश्व जपणे, त्यांना घडवणे ही प्रामुख्याने त्यांच्या पालकांची, शिक्षकांची आणि समाजाची जबाबदारी आहे. आपला समाज,  पालक आणि शिक्षक आपआपली जबाबदारी योग्यपद्धतीने पार पाडत आहेत का? असा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. किंबहुना यावर विचार करायला भाग पाडतो. काहीतरी हटके पाहायचे असेल तर ‘हरामखोर’ पाहायला हरकत नाही.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :