फाळणीची पार्श्वभूमी असलेल्या ‘बेगम जान’ या चित्रपटातील एक नवे गाणे ‘आजादियां’ आज रिलीज झाले. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान एका कुंठणखाण्यावर अचानक संकटाची वीज कोसळते. याच कुंठणखाण्याची कथा ‘बेगम जान’मध्ये दिसणार आहे. श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विद्या बालनसोबत दहा अभिनेत्रींची कथा यात दाखवली गेली आहे. आमचे काम केवळ नाच-गाणे नाही तर प्रसंगी देशासाठी लढायलाही आम्ही तत्पर आहोत, असा एक ‘मर्दानी’अंदाज या गाण्यात पाहायला मिळतो आहे. कौसर मुनीरने लिहिलेले आणि अनु मलिकने कम्पोझ केलेले हे गाणे सोनू मलिक आणि पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे.
अलीकडे एका टीव्ही शोदरम्यान सोनूने या गाण्याची एक छोटीशी झलक सादर केली होती. नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले. ‘प्रेम में तोहरे...’ असे शब्द असलेल्या या गाण्याला आशा भोसले यांनी शब्दसूरांचा साज चढवला आहे. गेली अनेक वर्षे आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाºया आशा दीदींच्या आवाजातील हे गाणे ऐकणे म्हणजे एक अनोखी आनंदयात्रा सिद्ध होत आहे.
ALSO READ: don't miss : पाहा, आशादींच्या सूरांनी सजलेले ‘बेगम जान’चे गाणे!
आशादींनी २०१३ साली चित्रपटासाठी शेवटचे गाणे गायले होते. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी ‘बेगम जान’च्या निमित्ताने चित्रपटामध्ये त्यांचा सुरेल आवाज आपल्याला ऐकण्यास मिळत आहे. आता ‘बेगम जान’च्या निमित्ताने सोनू निगम व राहत फतेह अली खान यांची जुगलबंदीही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही हे गाणे ऐकायलाच हवे. ऐका आणि खालील कमेंट बॉक्समध्ये हे गाणे कसे वाटले तेही कळवा.