पार्श्वगायक सोनू निगम आपल्याच ट्विटमुळे गोत्यात आला आहे. मशिदीतील अजानविरोधात ट्विट करत सोनूने वाद ओढवून घेतला होता. ‘मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावे लागते. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?’, असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. ‘मोहम्मद पैंगबर यांनी इस्लामची स्थापना केली होती, तेव्हा विजेची सोय नव्हती. तर मग, एडिसनच्या संशोधनानंतर असले चोचले कशाला ?, असा सवाल सोनूने उपस्थित केला होता. सोनूने या सर्व प्रकाराला धार्मिक बळजबरीचे नाव दिले होते. या ट्विटनंतर सोनूला अनेकांनी धारेवर धरले होते. सोशल मीडियावरील या टिवटिवीमुळे सोनू निगमला काही धमक्याही देण्यात येत असल्याचे कळते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त केला आहे.
दरम्यान मी लाऊडस्पीकरबद्दल बोललो. मी मंदिर व गुरूद्वारांवर कुठलीही टीका केलेली नाही. हे समजून घेणे इतके कठीण आहे का? माझे टिष्ट्वट मुस्लिमविरोधी आहे, हे दाखवून द्या. मी माफी मागेल, अशी भूमिका सोनूने घेतली आहे.
एफआयआर दाखल
याप्रकरणी सोनूविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात सोनूविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आलाआहे. याची अधिकृत प्रत जारी करण्यात आली आहे.
फतवा जारी
मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा काढला आहे. एवढेच नाही तर सोनूचे मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचीही घोषणाही त्यांनी केली आहे.
गायक सोनू निगम यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे. शिवाय, सोनू निगम हे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे वागत आहे, अशी टीका कादरी यांनी सोनू निगमवर केली आहे.
ALSO READ : सोनू निगमचे वादग्रस्त tweets; नेटिझन्सचा संताप
सेलिब्रेटींचीही आगपाखड
काही सेलिब्रिटींनीही सोनूच्या अजानसंदर्भातील ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे. या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री पूजा भट्ट, संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांचा समावेश आहे. ड्रग्जच्या नशेत धुंद असणाºयांना कोणताही आवाज सहन होत नाही. सोनूसारख्या लोकांविषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही, असे साजिद म्हणाला. तर वाजिदनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनू असे काही वक्तव्य करेल याची अपेक्षाही नव्हती, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. पूजा भट्टनेही तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन नाव न घेता सोनूवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.