अश्विनीच्या 'हिना'चा खुशरंग अजून कायम!

अभिनेत्री अश्विनी भावेने या चित्रपटाबाबतच्या तिच्या आठवणी खास सीएनएक्ससोबत थेट सॅन फ्रान्सिस्कोहून शेअर केल्या.

अश्विनीच्या 'हिना'चा खुशरंग अजून कायम!
Published: 30 Jul 2016 04:58 PM  Updated: 06 Nov 2016 10:43 AM

हिना या सुपरहिट चित्रपटाच्या प्रदर्शनाला नुकतीच 25 वर्षं झाली आहेत. ऋषी कपूर, अश्विनी भावे, झेबा बख्तियार यांची प्रमुख भूमिका असलेल्या हिना या चित्रपटाची लोकप्रियता आज इतक्या वर्षांनंतरही तितकीच आहे. अभिनेत्री अश्विनी भावेने या चित्रपटाबाबतच्या तिच्या आठवणी खास सीएनएक्ससोबत थेट सॅन फ्रान्सिस्कोहून शेअर केल्या.

हिना हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. हा चित्रपट मला कसा मिळाला ही एक गंमतच आहे. मी गौतम राजाध्यक्ष यांच्यासोबत फोटोशूट करत होती. गौतम आणि रणधीर कपूर म्हणजेच डब्बूचे संबंध अगदी घरगुती. डब्बू एक चित्रपट करत असून तो एका नायिकेच्या शोधात आहे हे गौतमला माहीत होते. आमचे फोटोशूट सुरू असतानाच डब्बूचा गौतमला फोन आला होता. तो गौतमला एखाद्या चांगल्या अभिनेत्रीसाठी त्याला विचारत होता. त्यावेळी मी समोरच बसली होती. रिसिव्हर थोडासा बाजूला ठेवून गौतमने मला विचारले, सांगू का तुझे नाव? त्यावर तुला योग्य वाटत असेल तर सांग, असे मी त्याला सांगितले. 

गौतमने लगेचच माझे माझे काही फोटो डब्बूला पाहाण्यासाठी पाठवून दिले. त्यानंतर काही दिवसांनी मला भेटायला बोलवण्यात आले. माझ्या स्क्रिन टेस्टचा तर किस्सा मी कधीच विसरू शकत नाही. मी नाशिकला वासूची सासू या नाटकाच्या दौऱ्यावर गेली होती. मी रात्री दोन वाजता घरी आल्यावर माझ्या आईने मला सांगितले की, उद्या सकाळी तुला आरकेमध्ये स्क्रिन टेस्टला बोलावले आहे. हे ऐकल्यावर तिथे जाताना घालून काय जायचे हा सगळ्यात पहिला प्रश्न मला पडला. कारण आरकेमध्ये जायचे तर तितके फॅन्सी कपडे घातले पाहिजेत. माझ्याकडे कोणते फॅन्सी कपडे आहेत याचा मी विचार करू लागले. माझ्याकडे असलेल्या कपड्यांपैकी मी एक फॅन्सी टी-शर्ट शोधला. मला आजही आठवते, मी गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि स्कर्ट घालून स्क्रिन टेस्टसाठी गेले होते. तिथे गेल्यावर मी कसा अभिनय करेन याचे मला काहीच टेन्शन नव्हते. केवळ मी कशी दिसतेय याचा मी सतत विचार करत होते. स्क्रिन टेस्टला मी थोडीही घाबरलेली नव्हती. मी माझे बेस्ट दिले आणि हिना या चित्रपटातील भूमिकेसाठी माझी निवड झाली. 

चित्रपटाचे चित्रीकरण करताना मी काम करतेय असे मला कधीच वाटले नाही. डब्बू हा या चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याने मला सुरुवातीला थोडेसे दडपण आले होते. पण डब्बू हा अतिशय गोड स्वभावाचा आहे. त्याला लोकांना अलिंगन द्यायला खूप आवडते. त्याच्यासोबत असताना कधीच कसलेच टेन्शन येत नाही. त्याच्यासोबत काम करताना आपण इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करतोय असे मला कधी वाटलेच नाही. ऋषीची तर मी फॅनच होती. चित्रपटाची टीम खूपच चांगली असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण कधी संपले हे मला कळलेच नाही.
आज गेली कित्येक वर्षं मी अमेरिकेत आहे.

आरके या बॅनरसोबत काम करून आता कित्येक वर्षं उलटली आहेत. पण आजही कपूर कुटुंबियांसोबत माझे नाते खूपच चांगले आहे. मी मुंबईत आल्यावर आरकेमध्ये जाऊन सगळ्यांची नक्कीच भेट घेते. ऋषीची मुलगी रिधिमाच्या लग्नालाही ऋषीने मला बोलावले होते. नीतू सिंग कपूर तर अतिशय आपुलकीने नेहमीच माझी चौकशी करते. माझ्या लग्नाला दोन-तीन वर्षं झाली असेल तेव्हाची ही गोष्ट आहे. मी नीतूला एका पार्टीत भेटले होते. तेव्हा ऋषीही तिच्यासोबतच होता. नीतू मला बाजूला घेऊन गेली आणि तिथे एखादी मैत्रीण ज्याप्रकारे आपली चौकशी करते, त्याप्रकारे माझ्या संसाराची चौकशी तिने केली होती. माझा नवरा चांगला आहे ना... मला चांगला वागवतो ना... असे तिने प्रश्न विचारले होते. नीतूची मी पूर्वी केवळ फॅन होते. पण तिचा सहवास लाभल्यानंतर ती एक माणूस म्हणूनही किती चांगली आहे याची मला जाणीव झाली. 

शब्दांकन : प्राजक्ता चिटणीस


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :