क्रिकेटर्स रूपेरी पडद्यावर क्लिनबोल्ड !

क्रिकेटर ज्यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची सेकंड इनिंग खेळली.

क्रिकेटर्स  रूपेरी पडद्यावर क्लिनबोल्ड !
Published: 09 Aug 2016 02:57 PM  Updated: 09 Aug 2016 02:57 PM

क्रिकेट आणि सिनेमा यांचं नातं काही वेगळंच. या दोन्ही गोष्टी अशा आहेत की ज्यावर रसिक सर्वाधिक प्रेम करतात. क्रिकेटर्स आणि कलाकारांवर तर रसिक जीव अक्षरक्षा ओवाळून टाकतात. कलाकारांना क्रिकेटच्या मैदानावर चौकारषटकारांचा आनंद घेताना अनेकांनी पाहिलंय. मात्र आपल्या खेळानं क्रिकेटचं मैदान गाजवणा-या काही क्रिकेटर्सनाही सिनेमा आणि बॉलिवुडची भुरळ पडते. आपल्या फास्ट बॉलिंगनं जगभरातल्या क्रिकेटर्सना नाचवणा-या ऑस्ट्रेलिन क्रिकेटर ब्रेट ली याच्यावरही बॉलिवुडनं जादू केलीय.ब्रेटलीचा 'अनइंडियन' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. ब्रेटली आधीही काही भारतीय क्रिकेटर्सनीसुद्धा चक्क सिनेमात काम केलं.पाहूया कोण आहेत असे क्रिकेटर ज्यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची सेकंड इनिंग खेळली.


 

बॉलिवुडच्या सिनेमात नशीब आजमावणा-या क्रिकेटर्सच्या यादीत पहिलं नाव येतं ते क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचं. आपल्या षटकारांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुर्रानी यांनी 1973 साली बी.आर. इशारा यांच्या 'चरित्र' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. या सिनेमात त्यांची नायिका होती परवीन बाबी. स्मार्ट, उत्तम बॉडी असणा-या दुर्रानी यांची अभिनयातील ही नवी इनिंग मात्र रसिकांना काही भावली नाही.यांच्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचे आणखी एक क्रिकेटर संदीप पाटील यांनाही रुपेरी पडद्याने आकर्षित केलं. 1985 साली आलेल्या 'कभी अजनबी थे' या सिनेमात अभिनेत्री पूनम ढिल्लोसह संदीप पाटील रोमान्स करताना पाहायला मिळाले.संदीप पाटील यांचे भारतीय टीममधील सहकारी आणि यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनीही कभी अजनबी थे याच सिनेमातून आपल्या अभिनयाची इनिंग सुरु केली. संदीप पाटील सिनेमाचे नायक असले तरी किरमाणी यांनी या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. यानंतर 2012 साली किरमाणी यांनी एका मल्याळी सिनेमातही काम केलं.


 
भारतीय क्रिकेट टीमचे विक्रमादित्य आणि लिटील मास्टर सुनील गावसकर यांनाही सिनेमाचा मोह आवरला नाही. 1980 साली रुपेरी पडद्यावर आलेल्या 'सावली प्रेमाची' या मराठी सिनेमातून गावसकर यांनी अभिनयाची इनिंग सुरु केली. यानंतर 1988 साली आलेल्या 'मालामाल' या सिनेमातही त्यांनी नसिरुद्दीन शाह यांच्यासह काम केलं.


 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मित्र आणि भारतीय क्रिकेट टीमचा आणखी एक क्रिकेटर विनोद कांबळीनंही बॉलिवुडच्या सिनेमातून आपली नवी इनिंग सुरु केली. 2002 साली रुपेरी पडद्यावर आलेल्या 'अनर्थ' सिनेमातून कांबळीनं हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री केली. संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्यासारख्या कलाकारांसह काम करत कांबळीनं आपली वेगळी छाप पाडली.


 
भारतीय क्रिकेट टीममध्ये फार काळ स्थान मिळवू न शकलेल्या क्रिकेटर सलील अंकोलाची अभिनयाची इनिंग मात्र हिट ठरली. 'कुरुक्षेत्र', 'पिता', 'चुरा लिया है तुमने' अशा सिनेमांमध्ये अंकोलानं काम केलंय. शिवाय 'करम अपना अपना ही' मालिका तसंच रियालिटी शो आणि म्युझिक अल्मबमध्येही अंकोलाची जादू पाहायला मिळाली.


 
मॅच फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यामुळं क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आल्यानं क्रिकेटर अजय जडेजानं आपला मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला. सेलिना जेटली, सनी देओल आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'खेल' या सिनेमातून जडेजानं बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं.

 
1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनाही रसिकांनी बॉलिवुडच्या रुपेरी पडद्यावर पाहिलंय. 'स्टम्प्ड', 'इक्बाल', 'चैन खुली की मैन खुली' या सिनेमातून कपिल देव यांनी छोटीशी भूमिका साकारली होती.याशिवाय 'मुझसे शादी करोगी' या सिनेमात नवज्योतसिंग सिद्धू, हरभजन सिंग, इरफान पठाण, आशिष नेहरा, पार्थिव पटेल, मोहम्मद कैफ, जवगल श्रीनाथ या क्रिकेटर्सनी गेस्ट अपिएरन्स दिला होता.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :