‘मी सुपरस्टार होईन’ - सयानी गुप्ता

अडचणींचा सामना करत करत अखेर ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ चित्रपट मिळवण्यात यशस्वी ठरते. यात तिने साकारलेल्या अंध मुलीच्या भूमिकेमुळे ती सर्वांच्या मनात ‘सयानी गुप्ता’ हे नाव कायमचे कोरते. इथेच तिचा स्ट्रगल संपत नाही तर हळूहळू ती तिच्या अभिनय कौशल्यासह ‘फॅन’,‘बार बार देखो’,‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटांमध्ये स्वत:चे वेगळेपण सिद्ध करते.

‘मी सुपरस्टार होईन’ - सयानी गुप्ता
Published: 29 Jun 2017 06:39 PM  Updated: 29 Jun 2017 06:40 PM

अबोली कुलकर्णी

कोलकाताहून एक मुलगी मुंबईत नव्या आशेने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी येते.. ग्लॅमरच्या या दुनियेत स्वत:ला यशस्वी पाहण्यासाठी धडपडते, हरते, उठते, पुन्हा संघर्ष सुरू करते. अडचणींचा सामना करत करत अखेर ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ चित्रपट मिळवण्यात यशस्वी ठरते. यात तिने साकारलेल्या अंध मुलीच्या भूमिकेमुळे ती सर्वांच्या मनात ‘सयानी गुप्ता’ हे नाव कायमचे कोरते. इथेच तिचा स्ट्रगल संपत नाही तर हळूहळू ती तिच्या अभिनय कौशल्यासह ‘फॅन’,‘बार बार देखो’,‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटांमध्ये स्वत:चे वेगळेपण सिद्ध करते. अशी ही गुणी अभिनेत्री आता पुन्हा एकदा  ‘जग्गा जासूस’ च्या निमित्ताने ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्याशी केलेल्या या गुजगोष्टी...

प्रश्न : सयानी, तुझ्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटातील भूमिकेविषयी काय सांगशील? 
- ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात मी एका १४ वर्षाच्या मुलीची भूमिका करते आहे. छोटीशी, निरागस अशी ती मुलगी आहे. मला ही भूमिका करताना मजा आली. काहीतरी वेगळं करायला मिळालं, याचा आनंद आहे.

प्रश्न : ‘जॉली एलएलबी २’ मधील तुझ्या अभिनयाचे समीक्षकांनी खुप कौतुक केले. याविषयी काय सांगशील? 
- ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटात मी हिनाची भूमिका केली आहे. भूमिका करताना सयानी म्हणून नव्हे तर हिना म्हणून प्रेक्षकांना दिसणे गरजेचे असते. ही भूमिका समीक्षकांसह प्रेक्षकांनाही खूप आवडली. लोक मला थांबून विचारतात की, मला तुमचा अभिनय खूपच आवडला. त्यावेळेस हिनाच्या भूमिकेला न्याय मिळाल्याचे समाधान वाटते.

प्रश्न : बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसताना तू करिअर सुरू केलेस. किती कठीण असतं एका न्यूकमरसाठी इंडस्ट्रीत सेटल होणं?
-  इंडस्ट्रीत आल्यावर सुरूवातीच्या काळात स्ट्रगल तर असतोच. फक्त स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असते. प्रत्येक कामासह तुम्हाला तुमच्या गुणांना सर्वांसमोर पे्रझेंट करावं लागतं. तसंही माझे इंडस्ट्रीत खूप मित्र आहेत. त्यांना कधीकधी फोनही करावा लागतो. चित्रपटात काम मिळणं फार कठीण गोष्ट आहे. इंडस्ट्रीत प्रत्येकाचा शेवटपर्यंत स्ट्रगल हा सुरूच असतो.

प्रश्न : तूला दिग्दर्शक बनायचं होतं असं ऐकिवात आहे, हे खरंय का?
- मला पहिल्यापासूनच अभिनेत्रीच बनायचे होते. ती मी झाले. मला दिग्दर्शन करण्याची देखील इच्छा आहे. पण, आता असे वाटतेय की, त्यासाठी चांगल्या वेळेची गरज आहे. 

प्रश्न : ‘फॅन’ चित्रपटात तू शाहरूख खानसोबत काम केलं आहेस. शाहरूखसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
-  खरंच खूप चांगला होता. शाहरूख खान हा अभिनेता एक कलाकार म्हणून फारच नम्र आहे. सेटवर देखील तो खूपच रिलॅक्स वातावरण ठेवतो. बॉलिवूडचा किंग असूनही त्याने त्याच्या यशाला गृहित धरलेले नाहीये. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच चांगला, अविस्मरणीय होता. 

प्रश्न : स्क्रिप्ट निवडण्याअगोदर तू कोणत्या गोष्टींची काळजी घेतेस?
- ‘स्क्रिप्ट’ वर मी पहिल्यांदा लक्षकेंद्रित करते. त्यानंतर याकडे लक्ष देते की, या स्क्रिप्टमधून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही नवीन कथानक आहे का? मला या भूमिकेतून काही नवे शिकायला मिळेल का? याची मी काळजी घेते. 

प्रश्न : आत्तापर्यंतच्या तुझ्या प्रवासात कुणाला तू स्वत:चे प्रेरणास्थान मानतेस?
-  मुंबईत अनेक तरूण अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन येतात. शाहरूख खानकडे पाहून त्यांनाही बॉलिवूडचा किंग व्हायचे असते. खरंतर मी यालाच प्रेरणा मानते. मात्र, तुमच्यात जर टॅलेंट असेल तर तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता. मला विचाराल तर माझ्या आयुष्यात नवाजुद्दीन सिद्दीकी, कल्की कोचलिन, राधिका आपटे हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. तसेच आयुष्यात विचाराल तर दलाई लामासारख्या व्यक्ती जगण्याचं बळ देतात.

प्रश्न : आगामी पाच वर्षांच्या काळात तू स्वत:ला कुठे पाहू इच्छितेस?
- आगामी काळात मी स्वत:ला सुपरस्टार झालेले पाहू इच्छिते. मुंबईतील दिग्दर्शक, निर्माते माझ्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असतील. मी स्वत:हून योग्य स्क्रिप्टची निवड करेल आणि स्क्रिप्ट नाकारू शकण्याचीही माझ्यात धमक असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरही मी स्टार होऊ इच्छिते. मुंबईत माझं एक पेंटहाऊस असावं. मला ट्रॅव्हलिंगची आवड असल्याने मी जगाच्या पाठीवर कुठेही फिरायला जाऊ शकते, अशी माझी संपन्नता असावी.

प्रश्न : आत्तापर्यंतच्या तुझ्या बेस्ट कॉम्प्लिमेंटविषयी?
- ‘फॅन’ चित्रपटासाठी जेव्हा मी शाहरूखसोबत काम करणार होते. तेव्हा पहिल्या दिवशी सेटवर त्याने येऊन मला ‘हग’ केले. तो म्हणाला,‘तू एक उत्तम अभिनेत्री आहेस.’ तसेच ‘जॉली एलएलबी २’ वेळी मला अक्षय कुमारही म्हणाला एका सीनदरम्यान तू आम्हाला खूप रडवलेस. खरंतर हा सीन सुरू असताना सेटवरचे सर्व जण रडत होते, टाळ्या वाजवत होते. माझ्या मते, तीच माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट होती.

प्रश्न : तू मूळची कोलकाताची आहेस. बंगाली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली का?
- मी  एका बंगाली चित्रपटात काम केले होते. पण, त्याला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यानंतर कुठला चांगला प्रोजेक्ट मला मिळाला देखील नाही. आता जर एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर नक्कीच करायला आवडेल.

प्रश्न : संधी मिळाल्यास मराठी चित्रपटात काम करण्याची तुझी इच्छा आहे का? 
- होय, नक्कीच मी काम करू इच्छिते. मराठी इंडस्ट्रीत सध्या एवढे गुणी कलाकार काम करत आहेत की, ते आता अमराठी कलाकारांना घेतीलच की नाही? ही शंका आहे. सध्या नागराज मंजुळेसह इतर मराठी कलाकार अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यामुळे संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचं सोनं करीन.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :