​सुपरस्टार नव्हे; मी केवळ एक सामान्य माणूस- सलमान खान

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रश्न-उत्तरांच्या स्वरूपातील सलमानची ही मुलाखत खास आमच्या वाचकांसाठी...

​सुपरस्टार नव्हे; मी केवळ एक सामान्य माणूस- सलमान खान
Published: 14 Jun 2017 01:49 PM  Updated: 14 Jun 2017 01:49 PM

-जान्हवी सामंत

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानने
सीएनक्स मस्तीच्या संपादक जान्हवी सामंत यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिलीत. प्रश्न-उत्तरांच्या स्वरूपातील सलमानची ही मुलाखत खास आमच्या वाचकांसाठी...

प्रश्न : सलमान, तुझा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा लवकरच येतोय. काय वेगळे असणार आहे यात?
सलमान :
‘ट्यूबलाईट’ हा माझ्या आत्तापर्यंत आलेल्या चित्रपटांपेक्षा संपूर्णत: वेगळा चित्रपट आहे. वेगळी कथा, वेगळी भूमिका. भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट मुळात दोन भावांची कथा आहे. लहानपणापासून सावलीसारखे एकत्र राहणारे आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोन भावांची ताटातूट होते. मी यात लक्ष्मण नावाचे पात्र रंगवले आहे. लक्ष्मणचा भाऊ भरत भारतीय सैन्यात भरती होतो. मात्र त्याचा काही ठावठिकाणा लागत नसल्याचे पाहून लक्ष्मण त्याच्या शोधात निघतो. लोक त्याला ‘ट्यूबलाईट’म्हणून हिणवतात, तुझा भाऊ परत येणार नाही असे सांगतात, परंतु लक्ष्मणचा विश्वास असतो की, तो त्याच्या भावाला परत आणणारच. केवळ भावालाच नाही. युद्ध संपेल आणि सगळे जवान आपआपल्या घरी परततील, हा त्याला विश्वास असतो. याच विश्वासाची, नात्यांची, भाव भावनांची कथा ‘ट्यूबलाईट’मध्ये दिसणार आहे.

प्रश्न :  ‘बजरंगी भाईजान’ या तुझ्या चित्रपटातून एक वेगळा संदेश दिला गेला होता. मानवता हा खरा धर्म आहे, हे तू मानतोच. याबद्दल आणखी काय सांगशील?
सलमान :
बिल्कुल, मानवता हाच खरा धर्म आहे. देशांच्या सीमेवर एकमेकांच्या छातीत गोळ्या झाडून, एकमेकांना ठार मारून, युद्ध करून काहीही हशील होणार नाहीय. कारण सीमेवर एक जवान मरत नाही तर त्याच्यासोबत त्याचे कुटुंबही मरते. जवान आपले असोत वा त्यांचे. त्यांच्यामागे उरणारे त्यांचे कुटुंब पोरके होते. आपल्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख हे मरणापेक्षा कमी नसते.

प्रश्न : तू तुझ्या कुटुंबाप्रति कमालीचा प्रोटेक्टिव्ह आहेस. असे का?
सलमान :
मी एकटा नाही तर प्रत्येक पुरूष आपल्या कुटुंबाप्रति प्रोटेक्टिव असतो. माझ्याकडे खूप आहे, म्हणून मी सगळ्यांची काळजी करतोय, अशातलाही भाग नाही. माझ्याकडे काहीही नाही. ऊलट मला माझ्या कुटुंबाने घडवलेय. माझ्यातील किंचित काही चांगले असेल तर ती माझ्या कुटुंबाची पुण्याई आहे. मी जसा माझ्या कुटुंबाप्रति प्रोटेक्टिव आहे. तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती माझ्याप्रति कमालीची प्रोटेक्टिव्ह आहे.

प्रश्न : भाऊ-बहिणीच्या नात्यावर अनेक सिनेमे आलेत. त्यातुलनेत भावांच्या नात्यांवर आधारित सिनेमे तसे मोजकेच. तुला दोन भाऊ आहेत. त्यांच्या तू बराच जवळ आहेस. दोन भावांमधील नाते शब्दांत कसे मांडशील?
सलमान :
 आम्ही सगळी भावंडं कशी मोठे झालोत, हे आम्हालाही कळले नाही. आम्ही भाऊ भाऊ असण्यापेक्षा एकमेकांचे मित्र म्हणूनच अधिक वाढलो. तुझे मित्र, माझे मित्र असे आमच्यात काहीही नव्हते, आजही नाही. आमच्या घरी कायम, पाहुण्यांचा राबता असायचा,आजही असतो. वडिलांना फारसे नातेवाईक नाही. पण माझ्या आईचे म्हणाल तर महाराष्ट्राच्या कानाकोपºयात तिचे नातेवाईक आहेत आणि हे सगळे आठवड्यातून दोनदा तरी भेटतातच भेटतात. आम्ही अशा गोतावळ्यात मोठे झालोत आणि कदाचित म्हणून मित्र म्हणून वाढलोत.

प्रश्न : आज तू स्टार आहेस. या प्रवासात कुठली अशी एक गोष्ट तुला पे्ररणा देत आलीयं?
सलमान :
चाहत्यांचे प्रेम. माझा चित्रपट रिलीज होतो आणि चाहते ते पाहायला चित्रपटगृहांत येतात, ही माझ्यासाठी सगळ्यांत प्रेरणादायी बाब आहे. चाहत्यांचे प्रेम मला नवनवे चित्रपट करण्याची, त्यासाठी कठोर मेहनत करण्याची प्रेरणा देते. चाहते आहेत, म्हणून मी आज इथे आहे.

प्रश्न : ‘मैनें प्यार किया’ या सुपरहिट सिनेमाने तुझ्या करिअरची सुरुवात झाली. पण तरिही कुठला एक सिनेमा तुझ्या करिअरचा टर्निंग पॉर्इंग  होता, असे तुला वाटते?
सलमान :
टर्निंग पॉर्इंग, असे म्हणता येणार नाही.‘करण अर्जून’, ‘वॉन्टेड’,‘वीर’, ‘तेरे नाम’ तर ‘बजरंगी भाईजान’पर्यंत असे सगळेच चित्रपट अनेकार्थाने माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरलेत. या प्रत्येक चित्रपटाने अभिनेता म्हणून मला घडवले. मला शिकवले.

प्रश्न : आता तुझ्या पुढच्या प्लानमध्ये काय काय नवे असणार आहे?
सलमान :
‘ट्यूबलाईट’नंतर माझा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट येतो आहे. या चित्रपटासाठी मी बरीच मेहनत घेतलीय. अनेक अ‍ॅक्शनदृश्यांची भरमार असलेला हा सिनेमा तुम्ही  पाहू शकाल. यानंतर मी एक डान्स मुव्ही करतोय. मला डान्स येत नाही, हे अख्ख्या जगाला माहितीय. तरिही मी रेमो डिसूजाचा हा चित्रपट करणार आहे.

सुपरस्टार असण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असे, तुला वाटते?
सलमान :
मी कुठला आलोय सुपरस्टार. मी केवळ एक सामान्य माणूस आहे. मी काही नासाचा कुणी शास्त्रज्ञ नाही, जो चंद्रावर जावून आलाय. ही प्रसिद्धी, ग्लॅमर यामागे अनेकांची मेहनत आहेत. अनेकांचे मदतीचे हात आहे. माझ्यामते, पडद्यावर तुम्ही फक्त दिसता. त्या दिसण्यात माझे नाही तर माझा डारेक्टर, स्टोरी रायटर, साऊंड डिझाईनर, ड्रेस डिझाईनर, टेक्निशिअन, माझे को-स्टार, स्पॉट बॉय अशा सगळ्यांचे योगदान असते. त्याचे योगदान आणि देशातील अब्जावधी लोकांचे प्रेम ही माझी प्रेरणा आहे. हेच खरे सुपरस्टार आहेत.

प्रश्न : मराठी सिनेमाबद्दल तू काय सांगशील?
सलमान :
मी अलीकडे महेश मांजरेकरच्या एका चित्रपटासाठी गाणे गायले. रितेश देशमुखच्या एका मराठी चित्रपटात मी अतिथी भूमिकेतही दिसलो. मराठी चित्रपट निर्मितीची माझी योजना आहे. मराठी सिनेमाचे अलीकडे बरीच झेप घेतली आहे. यॅलो, बालक पालक असे अनेक मराठी सिनेमे मी पाहिलेत. मराठी सिनेमा येत्या काळात याहीपेक्षा अधिक उंचीवर जाईल, याचा मला विश्वास आहे.

प्रश्न : आमच्या ‘www.cnxmasti.lokmat.com’ या संकेतस्थळाला भेट देणा-यांमध्ये अनेक अनिवासी भारतीय आहे. भारताबाहेरच्या तुझ्या या चाहत्यांना काय संदेश देऊ इच्छितोस?
सलमान :
भारताबाहेरही भारताची संस्कृती जिवंत ठेवणाºया या चाहत्यांबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. आपल्या मायभूमीतील कलाकार, त्यांच्या कलाकृती, भारतीय सिनेमे यावर भरभरून प्रेम करणाºया जगभरातील या चाहत्यांचे मी मनापासून आभार मानेल.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :