​सगळ्या गोष्टींचा उबग येतो, तेव्हा गझलच जवळची वाटते - पंकज उधास

आपल्या मलमली आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...

​सगळ्या गोष्टींचा उबग येतो, तेव्हा गझलच जवळची वाटते - पंकज उधास
Published: 22 Mar 2017 01:29 PM  Updated: 22 Mar 2017 03:06 PM

-रूपाली मुधोळकर

आपल्या मलमली आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील डोळ्यांच्या कडा ओलावणाºया ‘चिठ्ठी आई है...’ या गाण्याने पंकज उधास घराघरांत पोहोचले. यानंतर पंकज उधास यांनी ‘साजन’, ‘यह दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आई’ अशा अनेक चित्रपटांत आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. येत्या २५ मार्चला मुंबईत आयोजित ‘द गजल सिंफनी’ या गझल महोत्सवात पंकज उधास यांच्या सूरांची बरसात होणार आहे. या महोत्सवात पंकज यांच्याशिवाय सुप्रसिद्ध गायक अनुराग शर्मा, व्हायोलियन वादक दीपक पंडित, ‘मेरे ढोलना’ फेम गायिका अन्वेशा आदी प्रस्तूती देणार आहेत. 
यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा...
 

प्रश्न : पंकजजी, ‘द गजल सिंफनी’बद्दल काय सांगाल?
पंकज उधास : ‘द गजल सिंफनी’ एक अभिनव कॉन्सेप्ट आहे.   लाईव्ह आॅर्केस्ट्रासोबत गझल, असा एक अनोखा प्रयोग यानिमित्ताने श्रोत्यांना आणि गझलप्रेमींना अनुभवता येणार आहे. आधी कधीही कुणी ऐकली नसेल अशा नव्या ढंगात आणि रंगातील गझल याठिकाणी ऐकायला मिळणार आहे.

प्रश्न : आपल्या मते, गझल काय आहे?
पंकज उधास :  गझल माझा आत्मा आहे. गझल ऐकायची नसते तर ती अनुभवायची असते. गझल रोमांरोमांत भिनते. गझल कानापर्यंत नाही तर थेट हृदयाला जाऊन भिडते. गझलचे दुसरे नाव आहे, ‘असर’.  ऐकणाºयावर गझलेचा परिणाम होणार आणि होणारच. कोई भी गजल के असर से बच नहीं सकता.

प्रश्न : गझल नसती तर आयुष्याचा प्रवास पंकज उधास यांना कुठल्या मुक्कामावर घेऊन गेला असता?
पंकज उधास : (हसत हसत) हे तर ठाऊक नाही. आज मी जे काही आहे, ते केवळ आणि केवळ गझलेमुळे आहे. गझल नसती तर कदाचित माझे अस्तित्व नसते. पण गझल गायक झालो नसतो तर मी डॉक्टर असतो. मी विज्ञानात पदवी घेतली आहे. मला डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि म्हणून मी जाणीवपूर्वक विज्ञान शाखा निवडली होती. पण एका वळणावर गझलेने असे काही मोहित केले की, मी नकळत तिच्या सौंदर्यात वाहावत गेलो.प्रश्न:  पंकजजी, संघर्षाचा एक मोठा काळ आपण अनुवला आहे. या काळात कुठल्या एका गोष्टीने आपल्याला बळ दिले?
पंकज उधास :  माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आणि शिकवण या एका गोष्टींनी मी संघर्षाचा तो काळ पचवू शकतो. आयुष्यात कधीही निराश होऊ नको. एक दिवस तू खूप मोठा गायक होशील, हे माझ्या आई-बाबांचे शब्द मला आजही आठवतात. त्यांचा माझ्यावरचा हा विश्वास मला सार्थ करून दाखवायचा होता. कदाचित त्याचमुळे मी तगलो आणि सगळ्या संकटांना पुरून उरलो.

प्रश्न : ‘चिठ्ठी आई है...’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले. या गाण्याशी जुळलेली एखादी आठवण सांगू शकाल?
पंकज उधास : ‘चिठ्ठी आई है...’ या गाण्याशी जुळलेल्या इतक्या आठवणी आहेत, की मी त्यावर एक वेगळे पुस्तक लिहू शकेल. पण एक आठवण सांगितलीच पाहिजे. अभिनेता राजेंद्र कुमार यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. एकदिवस मला त्यांचा फोन आला. तुला माझ्या चित्रपटात अ‍ॅक्टिंग करायची आहे, असे ते मला म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर हो म्हणावे की नाही, हेच मला कळत नव्हते. कारण अ‍ॅक्टिंग म्हटल्यावर मला दरदरून घाम फुटला होता. फोन करतो, म्हणून मी त्यावेळी वेळ मारून नेली. पण जाणीवपूर्वक फोन करणे टाळले. यानंतर काही दिवसांनी राजेंद्र कुमार यांनी माझ्या मोठ्या भावाला फोन केला. तुझा लहान भाऊ पंकज अतिशय उद्धट आहे रे. तो मला फोन करणार होता आणि त्याने केलाच नाही, असे त्यांनी माझ्या भावाला सांगितले. हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला आणि मग मी असली नसली सगळी हिंमत जुटवून राजेंद्र कुमार यांना फोन केला. मग कुठे, या गाण्यामागची पार्श्वभूमी त्यांनी मला समजावून सांगितली. तू चित्रपटात पंकज उधास म्हणूनच दिसशील,असे त्यांनी मला सांगितले आणि मी हे गाणे केले.

प्रश्न : बॉलिवूडमध्ये संगीताचे महत्त्व शून्य झाले आहे, हे आपलेच शब्द आहेत. काय सांगाल?
पंकज उधास : एकेकाळी चित्रपटांत आठ-आठ गाणी असायची. अलीकडच्या चित्रपटात  दोन-तीन गाणी खूप झालीत.  बॉलिवूडमधील पार्श्वगायनाची परंपराच पूर्णपणे बदलली आहे.  माझ्यामते,याचे मुख्य कारण आजचे चित्रपट आहे. ज्या प्रकारचे चित्रपट आज बनत आहेत, त्यात संगीतासाठी फार काही जागा नाही. 

प्रश्न : पॉप, रिमिक्सच्या या युगात नवी पिढी गझलेकडे कशी बघतेयं? आपला अनुभव काय?
पंकज उधास : माझ्यामते, नवी पिढी गझलेत इंटरेस्ट घेतेय, हाच माझा अनुभव आहे. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हजारो यंगस्टर्स पुढे बसलेले मी पाहतो. खरे तर सगळे काही ऐकल्यानंतर माणसाला जेव्हा उबग येतो, त्याला शांती हवी असते, तेव्हा तो गझलेकडेच वळतो. याला नवी पिढीही अपवाद नाही.

प्रश्न : आपल्याकडून येत्या काळात आम्हाला काय नवीन ऐकायला मिळणार आहे?
पंकज उधास :  गेल्याच आठवड्यात माझा ‘मदहोश’ नावाचा अल्बम रिलीज झाला. सध्या मी एका सिंगलवर काम करतोय. हे सिंगल श्रोत्यांना आवडेल, अशी आशा आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :