बाहुबली 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 1000 करोड रुपये मिळवले आहेत. केवळ भारतातच नव्हे तर देशभर हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या चित्रपटात दाखवण्यात आलेले छोटेसे बाळ हे चित्रपटात केवळ काही मिनिटांसाठी असले तरी हे बाळ प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. शिवगामी अमरेंद्र बाहुबलीच्या मुलाचा जीव वाचवते असे चित्रपटात दाखवण्यात आले होते. स्वतः पाण्यात बुडत असली तरी त्या बाळाला बुडू देत नाही असे आपल्याला पाहायला मिळाले होते. या दृश्यात आणि कटप्पा आपल्या डोक्याला या बाळाचे चरण लावतो या दोन दृश्यात तर बाळ एकदमच व्यवस्थित दिसले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हे बाळ कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
हेच छोटे बाळ मोठे होऊन महेंद्र बाहुबली बनते असे आपण पाहिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का हे बाळ मुलगा नसून मुलगी आहे. या मुलीचे नाव अक्षिता वल्सन आहे आणि ही चिमुकली चित्रपटाच्या टीमसोबत चित्रीकरणासाठी तब्बल पाच दिवस राहिली होती.
अक्षिताचे वडील हे बाहुबली या चित्रपटात प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. या चित्रपटाचे चित्रीकरण केरळमध्ये सुरू असताना अक्षिताच्या वडिलांना अक्षिताने या चित्रपटात काम कऱण्याबद्दल विचारण्यात आले आणि त्यांनी देखील लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला.
अक्षिता या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी केवळ 18 महिन्यांची होती. पण आता ती थोडी मोठी झाली असून चालायला, बोलायला देखील लागली आहे.